भाजपला निवडणुकीतच आमदार किसन कथोरे यांची आठवण कशी येते?

जनदूत टिम    17-May-2024
Total Views |
भिवंडी लोकसभा मतदार संघाची निवडणूक 20 मे रोजी होत आहे. निवडणूक जशी जवळ येत आहे तस तशी चुरशीची होत आहे. भिवंडी मध्ये महाविकास आघाडी, महायुती आणि अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांच्यात जोरदार लढाई होत आहे.
 
K kathore and kapil patil
 
आमदार किसन कथोरे व खासदार कपिल पाटील यांच्यामध्ये विस्तवही जात नाही हे गेल्या सात आठ वर्षापासून आपण पाहत आहोत.दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांच्या सभांना, बैठकीला जात नसल्याचे चित्रही लपून राहिले नाही, इतकेच काय तर दोन्ही गटाच्या बॅनर वर एकमेकांचा फोटो सुद्धा नसल्याचे आपण पाहिले आहे. मात्र लोकसभेची निवडणूक जशी जवळ आली तशी मात्र भारतीय जनता पार्टी आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार कपिल पाटील यांना आमदार किसन कथोरे यांची आठवण झाल्याचे दिसत आहे.
 
भारतीय जनता पार्टी आणि कपिल पाटील यांच्या विरोधात भिवंडी लोकसभा मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी असल्याने त्याचा फटका बसून आपली उमेदवारी धोक्यात येऊ नये म्हणून आता आमदार किसन कथोरे भारतीय जनता पार्टी आणि कपिल पाटील यांना आठवू लागले आहेत. प्रचाराच्या सुरुवातीला किसन कथोरे यांना डावलण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र त्यानंतर प्रचंड प्रमाणात वातावरण बिघडत गेल्याने आता पर्याय म्हणून किसन कथोरे आठवू लागले आहेत. किसन कथोरे यांच्या शिवाय पर्याय नाही हे भारतीय जनता पार्टीला समजू लागल्याने आता त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न जोरदारपणे भारतीय जनता पार्टी कडून सुरू करण्यात आले आहेत. भारतीय जनता पार्टीचे राज्य लेव्हलचे पदाधिकारी आता किसन कथोरे हे कसे पक्षनिष्ठ आहेत हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर त्यांची भाषणे मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल करण्याचे कामही कपिल पाटील गटाचे कार्यकर्ते करताना दिसत आहेत. मात्र या अगोदर किसन कथोरे यांचे बॅनर वर फोटो न टाकणारे कोण आहेत ? किसन कथोरे मित्र मंडळाच्या विरोधात कपिल पाटील फाउंडेशन चे कार्यक्रम राबवणारे कोण आहेत? किसन कथोरे यांचे जिल्हा अध्यक्ष पद घालवणारे कोण आहेत? किसन कथोरे यांना मंत्रिपदापासून सातत्याने दूर ठेवण्याचे प्रयत्न कोणी केले? या प्रश्नांची उत्तरे आता त्यांचे समर्थक मागत आहेत.
 
K kathore and kapil patil
 
आमदार किसन कथोरे हे भाजपचे असल्याने त्यांना भाजपचा प्रचार करावा लागेल मात्र गेल्या सात आठ वर्षापासून आमदार किसन कथोरे यांना कपिल पाटील व भारतीय जनता पार्टीकडून जी वागणूक मिळत आहे ती वागणूक पाहता किसन कथोरे कदाचित प्रचारामध्ये दिसत असतील परंतु समर्थक मात्र प्रचंड नाराज असल्याचे चित्र स्पष्ट आहे. मुळात किसन कथोरे हे भाजपचे जरी आमदार असले तरी त्यांचे समर्थक विविध राजकीय पक्षांमध्ये आहेत त्यामुळे त्यांच्या सर्व समर्थकांच्याकडून कपिल पाटील यांचे काम होईल ही अपेक्षा करणे मुळातच चुकीचे आहे .काही कार्यकर्ते तर अपमानाचा बदला घेण्याची वेळ आली असल्याचे बोलताना ठिकठिकाणी पाहायला मिळत आहेत. निवडणूक पूर्ण झाल्यानंतर पाच वर्ष सातत्याने किसन कथोरे यांचा अपमान करायचा, किसन कथोरे यांच्या माध्यमातून निधी मागण्यात आल्यानंतर सातत्याने डीपीडीसीमध्ये डावळण्याचे प्रयत्न करणे या गोष्टी लपून राहिल्या नाहीत. किसन कथोरे यांचे शासकीय अधिकारी व भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ पदाधिकारी यांच्याशी चांगले संबंध असल्याने त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणला असला तरी मात्र ते मंत्री झाले असते तर मात्र मोठ्या प्रमाणामध्ये मुरबाड विधानसभा मतदारसंघांमध्ये विकास कामे करता आली असती. तसेच त्यांनी केलेल्या कामाचेही कपिल पाटील यांच्या समर्थकांनी श्रेय घेतल्याचा राग आमदार किसन कथोरे यांच्या समर्थकांमध्ये दिसून येत आहे.
 
असे असले तरी भिवंडी लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपचा विजय करायचा असेल तर किसन कथोरे यांच्या शिवाय पर्याय नाही ही बाब भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ पदाधिकारी आणि कपिल पाटील यांच्या समर्थकांच्या लक्षात आल्यामुळे आता कथोरेंच्या शिवाय पर्याय नाही,नाहीतर आपला पराभव होईल या भीतीने धास्तावलेली भारतीय जनता पार्टी किसन कथोरे यांच्याकडे भाजपचे एकनिष्ठ आमदार या भूमिकेतून पाहत असून त्यांनीच आता हा मतदारसंघ जिंकून द्यावा अशा विनवण्या वरिष्ठ पातळीवरून सुरू झाल्याचे दिसत आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे जे आमदार निवडून आले त्या सर्व आमदारांच्या मध्ये सर्वात जास्त मताधिक्य घेऊन आमदार किसन कथोरे हे निवडून आले असताना सुद्धा त्यांना मंत्रिपदापासून वंचित का ठेवण्यात आले असा सवाल आता किसन कथोरे समर्थक करत आहेत तर केवळ पराभव दिसत असल्यामुळेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आमदार किसन कथोरे यांच्यापुढे थेट नतमस्तक झाल्याचे चित्र दिसत आहे. प्रचारात खूपच मागे पडलेल्या कपिल पाटलांना वाचवण्यासाठी समर्थक पुढे सरसावतील की आमदार किसन कथोरे यांना सातत्याने डावळण्यात येत असल्याने बदला घेण्यासाठी पुढे सरसावतील हे आता लवकरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान आमदार किसन कथोरे यांनी त्यांच्या समर्थकांना वेगळे आदेश दिल्यास भाजप उमेदवार कपिल पाटील यांना रात्री आकाशात दिसणारे तारे दिवसाच दिसतील हे सांगण्यासाठी पंचागाची गरज लागणार नाही.