टाइम्स स्क्वेअरवर मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ पाहून अमेरिकेतील मराठी तरुणाची छाती अभिमानाने फुलली!

व्हिडिओ पाहताच उच्चशिक्षित मराठी तरुणाने थेट टाइम्स स्क्वेअरमधूनच दिल्या मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

जनदूत टिम    10-Feb-2024
Total Views |
 Maharashtra : Mumbai
 
टाइम्स स्क्वेअरवर मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ पाहून अमेरिकेतील मराठी तरुणाची छाती अभिमानाने फुलली!
 
व्हिडिओ पाहताच उच्चशिक्षित मराठी तरुणाने थेट टाइम्स स्क्वेअरमधूनच दिल्या मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 
 
"गरीब घरातून मेहनतीने वर आलेल्या मुख्यमंत्र्यांचा मला अभिमान"; भावुक होत तरुणाकडून शिंदे यांना शुभेच्छा 
 
न्यूयॉर्क : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी यंदाचा वाढदिवस विशेष ठरला. मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील दिग्गज मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. त्यासोबतच दिवस संपता संपता मुख्यमंत्री शिंदे यांना थेट अमेरिकेत राहणाऱ्या एका मराठी तरुणाने दिलेल्या शुभेच्छाही खास ठरल्या. एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी सकाळी अमेरिकेच्या प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअर इथं युवासेना पदाधिकारी राहुल कनाल यांच्या माध्यमातून शुभेच्छा देणारा व्हिडिओ झळकला. या व्हिडिओची महाराष्ट्रात जितकी चर्चा झाली, तितकीच चर्चा अमेरिकेतही झाली. मूळचा जळगाव जिल्ह्यातील असणारा आणि सध्या नोकरीनिमित्त अमेरिकेत राहणाऱ्या सुहास महाजन या तरुणाच्या दृष्टीस मुख्यमंत्री शिंदे यांच्या वाढदिवसाचा आला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देणारा व्हिडिओ थेट सातासमुद्रापार असणाऱ्या अमेरिकेत झळकल्याने सुहासची छाती अभिमानाने फुलून आली. त्यानंतर सुहासनेही त्याच चौकातून आणखी एक व्हिडिओ तयार करत मुख्यमंत्र्यांचं अभिष्टचिंतन केलं आहे.

मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना  वाढदिवसाच्याशुभेच्छा
 
आपल्या मायभूमीतील मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ अमेरिकेत पाहून भावुक झालेल्या सुहास महाजन या तरुणाने व्हिडिओ करत म्हटलं की, "मी आज सकाळी इथं टाइम्स स्क्वेअरला महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसाचा व्हिडिओ बघितला. ते बघून मला फारंच कौतुक वाटलं. एका गरीब घरातून खूप मेहनत करून वर आलेले आणि कठीण परिस्थितीत माझ्या महाराष्ट्राची धुरा सांभाळणारे महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा," अशा शब्दांत सुहास महाजन यांनी आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांवरील प्रेम व्यक्त केलं.
 
टाइम्स स्क्वेअर हा अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील प्रसिद्ध चौक असून या चौकात जगभरातील दिग्गज व्यक्तींचे फोटो किंवा व्हिडिओ झळकत असतात. अशा ठिकाणी यंदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचाही व्हिडिओ दिसल्याने महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसासाठी हा अभिमानास्पद क्षण ठरला. त्यातच हा व्हिडिओ पाहून भावुक झालेल्या उच्चशिक्षित मराठी तरुणाने त्याच टाइम्स स्क्वेअर येथून पुन्हा आपुलकीच्या शब्दांत मुख्यमंत्र्यांवर व्यक्त केलेलं प्रेम, हे एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता दाखवून देणारे ठरले आहे.
 
दरम्यान, टाइम्स स्क्वेअर येथे शुक्रवारी सकाळी झळकलेल्या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा विजयी क्षण, मुख्यमंत्र्यांचे पुत्र व खासदार श्रीकांत शिंदे, युवासेना पदाधिकारी राहुल कनाल आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी व मराठा आंदोलनावेळी सरकार आणि आंदोलक यांच्यात संवाददूताची भूमिका बजावणाऱ्या मंगेश चिवटे यांचाही फोटो पाहायला मिळाला होता.