"शब्दसम्राट" हा अज्ञानसम्राट नसावा!

"स्वयंघोषित "कार्याचे सम्राट"

जनदूत टिम    11-Nov-2024
Total Views |

आज्ञानसम्राट "शब्दसम्राट" हा अज्ञानसम्राट नसावा!
"मुरबाड विधानसभेत अजूनही पवारांविरोधात वातावरण आहे" असं चित्र आपले 'मुरबाडी मीडियामास्टर्स' आणि त्यांना वापरणारे स्वयंघोषित "कार्याचे सम्राट" आपल्या पूर्वग्रहदूषितवृत्तीतून गेली काही दिवस रंगवत होते, ते साफ चुकीचे असल्याचा साक्षात्कार सुभाषदादांच्या नामांकन रॅलीच्या अपूर्व - अलोट - रेकॉर्ड ब्रेक लोकगर्दी - दर्दीने घडवलाय. तद्वत, काय छापायचं आणि काय लपवायचं? याबाबत मुरबाडातील मीडियाची म्हणून एक विशिष्ट नीती बनली आहे किंबहुना आत्मकेंद्री राजकारणाभोवती जाणीवपूर्वक बनवली गेली आहे. अर्थातच ती अस्सल व्यक्तिनिष्ठ आहे. त्याला पुन्हा जाहिरात व्यवसायातल्या कलमकसाइंची... धर्म - जातीनिष्ठांची... "अर्थ" पूर्ण साथ - संगत आहेच.
या भयावह व स्थिती, परिस्थिती आणि मन:स्थितीच्या पार्श्वभूमीवर "पत्रकार" हा "लोकशिक्षक" असतो. त्याने वृत्तपत्रिय साहित्याची शेती नांगरत राहावी आणि कर्म - धर्म - सहयोगाने चालून आलेल्या संधीतील सत्याचं धान्य... पीठ... घ्यावं, ज्यामुळे वाचक - नागरिकांचा निद्रावस्थेतील "विवेक" जागा होईल आणि एकदा का मला अपेक्षित असलेला प्राप्त परिस्थितीत संपूर्ण परिवर्तनातील हा विवेक जागा झाला की, तो कुठल्याही सत्तेला चरचरा वाकवील. मात्र इथे याबाबत हा लेख लिहितोय तोपर्यंत तरी, प्रथमदर्शनी प्रचंड विरोधाभास वाटतो आहे. तथापि, काही अपवादात्मक जुने - जाणते पत्रकार वगळता प्रच्छन्नपणे इथल्या पत्रकारितेचा राजरोसपणे लिलाव होत आहे.
कारण मागील महिन्यात म्हणजेच 15 ऑक्टोबर पूर्वी कोटीच्या-कोटी उड्डाणे करणारी... लोकार्पण, भूमिपूजन करणारी... त्या अनुषंगाने अनपेक्षित दिशाभूल आणि फट - फजिती करणारी... ओम गाजराय नमः च्या नामयज्ञात "नारळ फोडा - फोडी मोहीम" राबविली गेली आणि आमच्या "शब्दांच्या सम्राटांनी" रकानेच्या- रकाने भरून "कार्याच्या सम्राटावर" स्तुतीसुमनांचा वर्षाव केला आणि आपल्या उपसुंभवृत्तीतील या आभासी विकासाच्या 'अच्छे दिन' जुमल्याला अत्यंत प्रामाणिकपणे आपल्या शाब्दिक कुवतीच्या बळावर हातभार लावण्याचे काम केले. कारण, त्यातील एकही बातमी शोधपत्रकारितेला साजेशी म्हणजे त्या कामांची... प्र.मा. कार्यारंभादेश किंवा संबंधित बांधकाम विभाग प्रमुखाची अथवा ठेकेदार - कम - नेत्याची प्रतिक्रिया वाचनात आली नाही. थोडक्यात, काय तर त्या तथाकथित वृत्तसंकलनामध्ये "संदर्भ मूल्य" कायम ठेवणारा संग्रहीपणा वाटलाच नाही. (एका विद्वानाने तर चक्क समाजसेवक सुरेश बांगर यांच्या प्रयत्नाने... असा आपल्या अर्धवट बातमीचा मथळा देऊन आपल्या अल्पबुद्धीला साजेशा सामाजिकत्त्वाच्या चिंधड्याच उडवल्या होत्या.)
गांभीर्याची बाब म्हणजे... या भानगडबाजांचे शिरोमणी पत्रकार - कम - राजकीय पुढारी अशी संस्कृती मुंढे - महाजनांच्या पक्षात धुमाकूळ घालणाऱ्या प्रस्तुत राजकीय नेत्यांचे मूळ शोधावं तर ते माध्यमांचच निघतं. आणि उलटपक्षी एखाद्या समाज माध्यमाच्या अभिव्यक्तीची निष्ठा तपासावी तर ती राजकीय परंपरेतीलच निघते, जे भविष्यातील पत्रकारितेच्या दिखाऊ आणि टिकाऊपणावर अधोरेखित करणारी पर्यायाने हीच धंदेवाईक पत्रकारिता अदखलपात्र ठरवेल, अशी धास्ती वाटून राहते.
सहाजिकच, मुरबाडातील लोकशाहीच्या "चार स्तंभ" तील हा स्तंभ निकोप राहावा; यासाठी कोणत्याच स्तरावर अपेक्षित प्रयत्न नाहीत. उलटपक्षी पत्रसृष्टीत माजलेल्या पेड न्यूज म्हणजेच पैसे देऊन आणि घेऊन बातम्या - लेख छापून आणण्याचे गैरप्रकार सर्वच स्तरावर निषेधार्य ठरत आहेत. कारण, ज्यांनी ढोंगी आणि स्वार्थी राजकारण्यांच्या भानगडी काढाव्यात; त्यांच्याच चौथ्या स्तंभातील विकाऊपणाच्या भानगडी बिनदिक्कतपणे बघायला... ऐकायला... मिळतात. तेव्हा मात्र मनस्ताप होतो आणि होतोच. त्यातच, कार्यान्वित पत्रकारांची संख्या आणि दिवसेंदिवस वाढत चाललेली संख्या ही तर एक आत्मचिंतन करायला लावणारी गंभीर बाब ठरत आहे. (त्यातच, ठाणे जिल्ह्यात राजकीय क्षेत्रात मुक्त संचार असलेल्या... "शहापूरचे रवि चंदे यांना त्यांचा राजकीय पक्ष कोणता!?!? त्यांची सामाजिक संघटना कोणती!?!? हे विचारायचं नाही; तसंच पत्रकारालाही त्याचे वृत्तपत्रीय - साहित्यिक अस्तित्वातील योगदान विचारायचं नाही.
तूर्तास, मुरबाडातील नव-शिकव्या स्वयंघोषित पत्रकारांना लिहिण्याची प्रेरणा मिळण्यासाठी... केव्हा आणि काय लिहिले पाहिजे? याचं "आत्मभान" मिळवून देण्यासाठी हा माझ्या या प्रारंभीच्या प्रामाणिक प्रयत्नांचा हा छोटेखानी शब्दप्रपंच!
उचलेगिरी एस एल पाटील