स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीत राजगड किल्ल्यावर फिरण्यासाठी आलेल्या भिवंडीतील तरुण पर्यटकांचा किल्ल्यावरील तळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. अजय मोहनन कल्लाप्पा पारा (वय ३३, रा. मानस पार्क, भिवंडी) असे मृत पर्यटकाचे नाव आहे. हा प्रकार काल (दि.१५) सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. या प्रकरणी वेल्हे पोलीस तपास करत आहेत.
अजय पारा हा भिवंडीतील एका खासगी कंपनीत अधिकारी म्हणून काम करत होता. स्वातंत्र्यदिनाची कंपनीला सुट्टी असल्याने अजय हा पाच सहा मित्रांसह सोमवारी (दि.१४) दुपारी तीन वाजता राजगडावर फिरण्यासाठी आले होते. सर्वांनी गडावर फेरफटका मारला. छत्रपती शिवरायांच्या राजसदरेच्या जवळील तटबंदीवर अजय उभा राहिला. त्यावेळी मित्रांनी त्याचा फोटो काढला. हा त्याचा अखेरचा फोटो ठरला.
अजय व त्याचे मित्र रात्री गडाच्या पद्मावती माचीवरील पद्मावती मंदिराजवळ एका तंबुत मुक्कामी थांबले होते. काल मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अजय झोपेतून उठला. प्लास्टिकची बाटली घेऊन बाहेर गेला. मात्र, त्यानंतर तो परत आला नाही. सकाळी त्याच्या मित्रांनी शोध घेतला असता मंदिराजवळील तळ्याच्या काठावर अजय याच्या चप्पल, बॅटरी तसेच बाटली सापडली. अजय तळ्यात मृतावस्थेत आढळून आला. त्यामुळे त्याचे मित्र भयभीत झाले.
त्यावेळी गडावर ध्वजारोहणासाठी आलेले वेल्हे पोलीस ठाण्याचे जवान युवराज सोमवंशी तसेच स्थानिक पाहरेकरी बापू साबळे, आकाश कचरे, योगेश दरडिगे, विशाल पिलवारे आदींनी तळ्यावर धाव घेतली. अजय याचा मृतदेह बाहेर काढला. तेथून स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह संततधार पावसात गडावरून खाली आणण्यात आला.
मृतदेह शवविच्छेदनासाठी पुण्यात ससुन रुग्णालयात नेण्यात आला. वेल्हे पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रणजित पठारे यांच्या देखरेखीखाली पोलिस हवालदार औदुबंर आडवाल, हवालदार सुरेश मोरे, ज्ञानदीप धिवार आदींनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी वेल्हे पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार योगेश जाधव तपास करत आहेत.