बोगस बियाणे, खते विक्री विरोधात कडक कायदा करणार - धनंजय मुंडे.

18 Jul 2023 10:19:45
मुंबई : -

बोगस बियाणे खते विक्री विरोधात कडक कायदा करणार 
 
राज्यात बोगस बियाणे, खते, कीटकनाशके यांची विक्री करणाऱ्या काहीजणांवर अलीकडे कारवाई झाली आहे, मात्र बोगस बियाणे, औषधे विक्री करणाऱ्यांविरोधातील अधिक कडक कायदा करण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने घेतला असून, चालू पावसाळी अधिवेशनातच बोगसगिरी करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याचा कडक कायदा अस्तित्वात आणला जाईल, अशी माहिती राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज मुंबई येथे पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचे कामकाज संपल्यानंतर माध्यमांशी बोलताना दिली. 
 
ज्याप्रमाणे बीटी-कापूस बियाण्यांच्या बाबतीत बोगस बियाणे वितरित करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल होतो, त्याच धर्तीवर तोच कायदा अन्य बियाण्यांच्या, खतांच्या व कीटकनाशकांच्या बाबतीतही लागू करण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.
 
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात संपन्न झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी एक विशेष समितीही स्थापन करण्यात आली असल्याची माहितीही धनंजय मुंडे यांनी दिली. 
दरम्यान असा कायदा अस्तित्वात आणण्यासाठीचे प्रारूप तयार करण्याचे काम सुरू असून, समितीचा निर्णय होताच, चालू पावसाळी अधिवेशनातच हा कायदा लागू करण्यात येईल, असेही धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले.
Powered By Sangraha 9.0