गोष्ट एका लोकनेत्याची !!!

संपत मोरे,    07-Jun-2023
Total Views |
मंचरला जाताना एक घाट आहे. या घाटात एसटी पोहोचली. जोरदार पाऊस पडत होता. हा पडता पाऊस पाहून माजी खासदार किसनराव बाणखेले यांची एका कार्यकर्त्यांने सांगितलेली गोष्ट आठवली.खासदार बाणखेले पाबळ परिसरात होते.पावसात भिजत रस्त्याने निघालेले. पाठीमागून एसटी आली.त्यांनी बसला हात केला पण चालक नवीन होता.त्यांन न ओळखल्याने गाडी थांबवली नाही.तोवर एका प्रवाशाने खासदारांना पाहिले.त्यान बेल ओढली.बेल वाजल्याचे लक्षात आल्यावर वाहकाने मागं बघून विचारलं,"कोणी बेल ओढली?"असं विचारलं.
"मी.अहो अण्णा गाडीला हात करत हुते."
"कोण अण्णा?"
"आपल खासदार किसनराव बाणखेले."
हा संवाद चालू होता तोवर दार उघडून अण्णा आत आले.
"आर पोरानु,मला पावसात भिजत ठेवता का?"असं म्हणाले.अगदी हसत हसत.गाडी न थांबवल्याचा राग नव्हता.आण्णा गाडीत आल्यावर वाहक आणि काही प्रवाशी'या आण्णा बसा बसा.'म्हणू लागले. एक रिकामी जागा पाहून ते बसले.

neta 
किसनराव बाबुराव बाणखेले.सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, आमदार आणि खासदार या पदावर काम केलेले लोकनेते.मंचर गावचा सरपंच व्हायच्या अगोदर ते जिल्हा परिषदेवर निवडून गेले.पुन्हा सरपंच झाले.सरपंच होते तेव्हाच आमदार झाले.आणि आमदार पदावर असतानाच लोकसभा निवडणूक लढवली.विजयी झाले.एवढ्या पदावर काम करूनही त्यांनी साधेपणा सोडला नाही.नेहमी लोकांच्यात राहिले. सामान्य माणसाच्यासारख आयुष्य जगले म्हणून आज त्यांच्या जगण्यातील अनेक प्रसंग कथा बनल्या आहेत. याच बाणखेले आण्णाच्या आठवणी ऐकायला मी निघालो आहे.
मंचरला पोहोचलो.दुपार झालेली. पाऊस उघडला होता.बाणखेले यांच्या घरी गेलो. एकदम साधं घर.दोन चौकटी.कौलारू घर.या घरावर इतर राजकारणी लोकांच्या घरावर असतात तशा खुणा नव्हत्या.एका माजी आमदार खासदार यांचं हे घर.घरात त्यांच्या सुनबाई आणि पत्नी होत्या.त्यांच्याकडून या खासदारांचे अनेक किस्से ऐकायला मिळाले.
किसनराव बाणखेले यांचा जन्मच मुळी समाजकार्य करण्यासाठी झाला होता. त्यांना स्वतःच्या संसाराची काळजी नव्हती."मी कृष्ण(किसन)आहे.त्यांन कुठं त्याच्या संसाराची काळजी केली होती.?"असं विचारायचे.
"मग बायकापोरांचं काय होणार?"असा प्रश्न विचारताच ते वर बोट करायचे.
"तो सगळं बघेल.त्याला सगळ्यांची काळजी असते."असं ते म्हणायचे. मग विचारणारा गप्प बसायचा.

neta 
किसनराव 1972साली आंबेगाव मतदारसंघाचे आमदार झाले.त्याअगोदर ते जिल्हा परिषद सदस्य आणि सरपंच होते.1972 साली सगळीकडे दुष्काळ पडला होता. आमदारांचा तालुकाही दुष्काळी झळा सोसत होता.लोकांच्यावर उपासमारीची वेळ आलेली.लोकांना काम मिळावे म्हणून दुष्काळी कामे सुरू केली होती. या कामावर गरजू लोकांच्यासोबत आमदार बाणखेले यांचे कुटूंबीय सुद्धा होते.आमदारांच्या पत्नी मथुराबाई कामावर होत्या.एका आमदारांची पत्नी दुष्काळी कामावर आहे ही आज मोठी बातमी होऊ शकते पण आमदार किसनराव आणि तिथल्या लोकांना यात काही विशेष वाटत नव्हतं.कारण किसनराव एवढे साधे होते आणि आमदार झाले तरी त्यांच्या पदाचा रुबाब कधी त्यांनी दाखवला नव्हता,जसे किसनराव वेगळे वाटत नव्हते.तशा त्यांच्या पत्नी कामावर आहेत यात लोकांना आश्चर्य वाटलं नाही.
 
त्यांच्या पत्नी म्हणाल्या,"आम्ही एकदा कामावर होतो तेव्हा भेट द्यायला आमदार आले.त्यांनी आमच्याकडे पाहिले. काहीही बोलले नाहीत.थोडा वेळ थांबले.मस्टर कारकून जवळ चौकशी केली आणि निघून गेले."
बाणखेले यांच्या घराजवळ मी गेलो तेव्हा मथुराबाई तांदूळ निवडत बसल्या होत्या.त्यांचं काम करत त्या माझ्याशी बोलत होत्या.नवऱ्याबद्दल बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर कौतुकाचे भाव होते."माझी पहिली पोरगी जन्मली तेव्हा त्यांनी मॅट्रिकची परीक्षा पास झाले.त्यावर्षीच त्यानी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली.तेव्हापासून त्यांचं घराकडं लक्ष कमी झालं.कधीतरी घरी यायचे.माणसं काम सांगायची.हे त्या माणसांच्या सोबत गेलेच."असं त्या सांगत होत्या.
 
"सुरुवातीला त्रास झाला.मला राग यायचा पण पुन्हा माझ्या लक्षात आले. या माणसावर रागावल तरी यांच्यात बदल होणार नाही. घरखर्च चालवायला मी गोधड्या शिवू लागले. त्यातून मिळालेल्या पैशातून घराला हातभार लागला.ते आमदार होते.त्यांना जो पगार मिळत होता त्यातील ते आम्हाला काही देत नव्हते."
 
किसनराव बाणखेले घरी येत नव्हते तर राहायचे कुठे?असा प्रश्न आपल्याला पडला असेल.त्यांच्या मुक्कामाची गोष्ट थक्क करणारी आहे. मुंबईवरून उशिरा पुण्याला आलेले आमदार बाणखेले हे पुणे शिवाजीनगरच्या एसटी स्टँडवर धोतर पांघरून निवांत झोपलेले अनेक वाहकांनी पाहिले आहे. सकाळी वाहक चालक त्यांना उठवायचे.चूळ भरायला पाणी द्यायचे.तिथंच चहा पिऊन अण्णा पुढच्या प्रवासाला जायचे.मंचरच बस स्टँड तर त्यांचं ऑफिस असल्यासारख होतं. उशिरा आल्यावर तिथंच त्यांचा मुक्काम असायचा.पिशवी उशाला घेऊन अण्णा झोपलेले असायचे.तिथं असलेल्या धर्मादाय दवाखान्यातही ते असायचे.
आंबेगाव मतदारसंघ दूरवर पसरलेला. जेव्हा आमदार मतदारसंघाच्या दौऱ्यावर निघायचे तेव्हा ते सायकलीने जायचे.कार्यकर्त्याच्या घरी त्यांचा मुक्काम.लसणाची चटणी आणि बाजरीची भाकरी खायला मिळाली तरी आमदार खुश असायचे.वाटेत काही कार्यकर्ते भेटायचे.ते सोबत यायचे मग सायकल एका ठिकाणी ठेवून चालतच सगळे जायचे.कारवा बनायचा.भेटीगाठी घेत आमदारांचा दौरा व्हायचा.खिशात एक छोटी वही. त्यात ते लोकांच्या अडचणी लिहून घ्यायचे.ते प्रश्न सोडवायचे.जेव्हा एसटी आली तेव्हा ते एसटीने जाऊ लागले.नंतर त्यांनी स्कुटर घेतली तेव्हा ते स्कुटरने जाऊ लागले.पुढे लोकांनी त्यांना वर्गणी काढून जीप दिली.ते स्वतः गाडी चालवायचे.जाताना लोकांना बसवून घेऊन जायचे.अगदी बसतील तेवढे प्रवाशी ते घेऊन जायचे.
पायी,सायकल,स्कुटर,एसटी अशा मिळेल त्या वाहनांनी त्यांनी प्रवास केला.मतदारसंघाशी संपर्क ठेवला. आंबेगाव खेड जुन्नर भागातील लोक आजही या आठवणी सांगतात.
सुलतान भेटले ते सांगू लागले."मला कोणीही नव्हतं.मी अनाथ होतो.मी जुन्नरच्या अनाथआश्रमात बारावीपर्यंत शिकलो.बारावी झालो आणि मला एसटी खात्यात नोकरीचा कॉल आला.मला राजकीय नेत्यांच्या शिफारशीची गरज होती.मला एकजणाने किसनराव बाणखेले यांचे नाव सांगितले. त्यांना मी पाहिलेलेही नव्हते.मी जुन्नरवरून त्यांना भेटायला मंचरला आलो.ते जिथं असतात असं मला सांगितलं होतं त्या दवाखान्याजवळ आलो.तिथं एक माणूस उभा होता.मी त्यांना विचारलं,"मला आमदारांना भेटायचं आहे."
"काय काम आहे?"
"आमदारांना भेटायचं आहे"
"मीच आमदार आहे."
मग मी त्यांना माझी सगळी परिस्थिती सांगितली.ते म्हणाले."दहा मिनिटं थांब.मी आलोच."ते गेले आणि दहा मिनिटात परत आले.त्यांच्या अंगावर आता जरा चांगले कपडे होते.ते कपडे बदलायला गेले होते. मग आम्ही दोघे एसटी स्टँडवर आलो.पुण्याला जाणारी गाडी उभी होती. जाणाऱ्या गाडीत बसलो.मला ते म्हणाले,"मला तिकीट नसतं. तुझं तिकीट तू काढ."माझ्याकडे मोजकेच पैसे होते.पुण्याला जावं लागेल हे मला माहित नव्हतं.त्यामुळे मी गोंधळलो होतो.त्यांनी माझ्या देहबोलीवरून ओळखलं.ते वाहकाला म्हणाले,"याला एसटीत नोकरी लावायला निघालोय.तिकीट दे त्याला एक."मग वाहकाने मला तिकीट दिले. आम्ही दापोडीत उतरलो.बसच्या थांब्यापासून एसटीचे ऑफिस तीन किलोमीटरवर होते.रखरखीत उन्ह होतं.मी आणि आमदार तसल्या उन्हात चालत गेलो.तिथं साहेबांच्या केबिनमध्ये गेल्यावर आमदारांनी डायरेक्ट साहेबांचे पाय धरले.
"अहो, आमदारसाहेब असं का करता?आम्हीच तुमचे पाय धरायला पाहिजेत."
आमदार त्या साहेबांना म्हणाले,"साहेब काहीही करा.या पोराला नोकरीवर घ्या.त्याला कोण न्हाई.आपल्याशिवाय त्याला कोण नाही.आपण मदत करा साहेब."मग साहेबांनी आम्हाला चहा दिला.आम्ही तिथून बाहेर पडलो.आणि काही दिवसातच मी नोकरीत रूजू झालो.मला आमदारांच शिफारसपत्र हवं होतं मात्र स्वतः आमदार माझ्यासोबत आले आणि मला नोकरी मिळाली.
नोकरीला लागताना मी हेल्पर म्हणून लागलो आणि सेवानिवृत्त होताना साहेब झालो.माझ्यासारख्या अनाथ पोराच्या आयुष्यात किसनराव आण्णा आले. माझं जीवन बदललं."
बाणखेले यांचे जावई बबनराव साकोरे म्हणाले,"त्यांनी घरचा संसार कधीच केला नाही.पण लोकांच्या अडचणीत ते धावत जायचे.ते राजकारणातील कर्मयोगी होते.एका कुटुंबाचे प्रमुख नव्हते.सगळ्या मतदारसंघाचे ते कुटूंबप्रमुख होते.त्यांच्याकडे लोक सामाजिक कामे घेऊन यायचे पण काही लोक पैसेही मागायला यायचे.आणि ते नाही म्हणायचे नाहीत."
बबनराव साकोरे यांनी बाणखेले आमदार असतानाचा मुंबईतला एक प्रसंग सांगितला."आम्ही दोघे मुंबईला गेलो. मुक्कामासाठी आमदार निवासातील त्यांच्या खोलीकडे गेलो.खोलीचं दार उघडलं की आत बरेच लोक झोपले होते.जागा मिळेल तिथं लोक झोपलेले. आत दोन बेड होते.त्या बेडवर लोक झोपले होते.त्या गर्दीत त्यांनी दोन जागा शोधल्या. मला म्हणाले,'तुम्ही तिथं झोपा. मी हिथ झोपतो.मी त्यांना म्हणालो.'तुम्ही खाली झोपू नका.बेडवर झोपा.मी उठवतो यांना.' ते लगेच म्हणाले,'नको.झोप लागलेल्या माणसाला उठवू नका.'अस म्हणत त्यांनी धोतर खाली अंथरल आणि झोपले.मी त्याना विचारलं,'हे लोक तुमच्या ओळखीचे आहेत का?
'आपल्या खोलीत आलेत म्हणजे आपलेच असणार कोणीतरी' ते म्हणाले. बघता बघता त्यांना झोप लागली.सकाळी उठलो तर तेच लोक अण्णांना विचारत होते.'कुठलं गाव?'त्यांना माहिती नव्हतं. याच आमदारांच्या खोलीत आपण झोपलो आहे आणि आपल्यामुळे आमदाराना भुईवर धोतर अंथरून खाली झोपावे लागले आहे.अण्णा काहीच बोलले नाहीत.फक्त हसत राहिले.."
किसनराव खासदार होते तेव्हा त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी सुद्धा लोकसेवा आयोगाचा अभ्यास करणारी महाराष्ट्रातील 35 मुले राहत होती.तिथही त्यांची गैरसोय व्हायची पण ते काहीही बोलत नव्हते.
"आपण लोकांच्यामुळं इथं आलोय.हे लोकांचं आहे."असं ते म्हणायचे.
किसनराव बाणखेले यांच्या आगळ्यावेगळ्यापणाच्या सत्यकथा या दंतकथा वाटाव्यात अशाच आहेत.आमदार असताना ते यादवराव पडवळ यांच्या दुकानात गप्पा मारत बसत.जेव्हा यादवराव सायकल दुरुस्तीचं काम करत तेव्हा त्यांना एखादी वस्तू लागली तर ते आमदारांना म्हणायचे. 'मला ती वस्तू द्या.'आमदार ती वस्तू द्यायचे.काम सांगताना यादवराव यांना काही वाटत नव्हतं आणि आमदारांना सुद्धा ते आपल्याला काम सांगत आहेत असं वाटत नव्हतं.
बाळासाहेब थोरात यांनीही एक प्रसंग नोंदवून ठेवला आहे.त्यांचा भाजीपाला पाठवायचा व्यवसाय होता.एका रात्री उशिरा त्यांच्याकडे माल न्यायला गाडी आली.दहा पोती वर ट्रकमध्ये ठेवायची होती.ड्रायव्हर खाली उतरेना.मग तिथं जवळच्या घरात खासदार बसले होते. त्यांच्या लक्षात आल्यावर ते पुढे आले आणि त्यांनी दहा पोती ट्रकमध्ये ठेवली.
किसनराव बाणखेले यांच्यावर प्रेम करणाऱ्या बी एल शिंदे यांनी खासदारांच्या 'अविस्मरणीय आठवणी'संपादित केल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी काही लोकांच्या आठवणी शब्दबद्ध केल्या आहेत.
केशवराव काऱ्हाळे यांनी एक आठवण नोंदवली आहेत. ते आणि त्यांचा मित्र मुंबईला बघायला गेले होते.विधिमंडळात अण्णा एका विधेयकावर बोलणार होते.पण या दोघांच्या दाढ्या वाढल्या होत्या.त्यांची अडचण लक्षात आल्यावर स्वतःजवळील दाढीच्या सामानाने त्यांच्या दाढ्या केल्या आणि सोबत घेऊन गेले.
मंचर परिसरात फिरताना बाणखेले यांच्या अनेक आठवणी लोक सांगत होते.मंचरचे सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, आमदार ,खासदार चारही सभागृहात त्यांनी काम केले होते. 1972,1980,1985 असे आमदार म्हणून आणि 1989 साली त्यांनी लोकसभा निवडणुकीत उमेदवारी केली.त्यांच्याविरोधात काँग्रेसकडून प्रा रामकृष्ण मोरे होते.काँग्रेसचा देशात जोर होता.त्यामुळे या निवडणुकीत मोठा चमत्कार होईल अशी परिस्थिती नव्हती पण लोकांनी ही निवडणूक हातात घेतली.आणि जनता दलाकडून उभे असलेल्या किसनराव बाणखेले यांचा विजय झाला.सरपंच ते आमदार म्हणून त्यांनी जे काम केले होते.त्या कामाची पोहोचपावती लोकांनी दिली.तेव्हा खेड लोकसभा मतदारसंघात एकच घोषणा होती.'धोतर गेलं दिल्लीला.'
सरपंच ते लोकसभा या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व निवडणूक त्यांनी लोकांच्या वर्गणीतून लढवल्या होत्या..
खेड लोकसभा मतदारसंघात किसनराव बाणखेले एखाद्याच्या लग्नाला ते हजर नसतील पण रक्षाविसर्जन आणि दशक्रिया विधीला ते आवर्जून उपस्थित राहायचे.त्यांना निरोप पोहोचला की ते वेळेत जायचे.'सुखात सगळे जातात पण माणसाला दुःखात आधाराची गरज असते.'अस ते म्हणायचे.त्यांच्यावर दशपिंडी खासदार अशी टिका झाली मात्र टीकाकारांना महत्व न देता ते लोकांच्या सुखात सहभागी होत राहिले.
डोक्यावर कडक टोपी.पांढरा शर्ट,धोतर,गळ्यात माळ आणि पायात स्लिपर असा त्यांचा वेष. त्यांनी चांगली चप्पल किंवा बूट वापरावा अस लोकांना वाटायचं पण ते म्हणायचे.'हे स्लीपर चांगलं.कुठं हरवत नाही आणि कुठेही मिळत."विधानसभा आणि लोकसभेत ते स्लिपरच वापरत.
बाणखेले विरोधी पक्षात असायचे.त्यामुळे त्यांना विकासकामे करताना अनेकदा आंदोलन करावी लागली. त्यांनी रस्त्यावर येऊन अनेक प्रश्न मार्गी लावले.त्यांना त्यांनी स्थापन केलेल्या बँकेला मंजुरी मिळावी म्हणून त्यांनी उपोषण केले.उपोषण केल्यावर त्यांना लाला बँकेची मंजुरी मिळाली. त्यांचे राजकीय गुरू माजी खासदार संभाजीराव काकडे यांच्या नावाने सुरू असलेली बँक आज प्रगतीपथावर आहे.
मी त्यांच्या घरात होतो. घरात शांतता होती.याच घरातील एक माणूस सरपंच, आमदार,खासदार होऊन गेलेले. यावर विश्वास बसणार नाही.त्यांचा मुलगा रामदास शेतातून आलेला.राजकारणात घराणेशाहीची चलती असताना रामदास मात्र राजकारणात नाही तो शेतात राबतोय. त्याला ते आवडतय.सकाळी उठून शेतात जावं,काम करावं.गुरढोर सांभाळावी.आईची सेवा करावी एवढंच त्यानं ठरवलं आहे. रामदास फारस बोलत नाही.खासदारांचा मुलगा म्हणून कसलाही रुबाब नाही.एकदम साधा आहे.एका खासदारांचा मुलगा म्हणून त्याला अभिमान आहे. खासदारांनी वापरलेली स्कुटर गाडी त्यांनी जपून ठेवली आहे. ती गाडी तो पुसतो.सणावाराला पूजन करतो.
खासदार किसनराव गेले.त्याअगोदर काही दिवस ते राजकारणापासून दूर झाले होते.एक राजकीय अपरिहार्यता म्हणून त्यांनी जनता दल सोडलं.शिवसेनेत गेले.भाजपमध्ये गेले मात्र त्यांचं पण राजकारणात रमले नाही.ते पूर्णपणे सामाजिक कामात रमले.त्यांच्याकडे अडचणी घेऊन येईल त्याला मदत करत राहिले.त्यानी तळहातावरच्या फोडासारखे जपलेले अनेक कार्यकर्ते त्यांना सोडून गेले पण त्यांनी कधीही त्यांच्याबद्दल कटुता बाळगली नाही.कधी तसा कार्यकर्ता भेटला तर त्याला मिठी घालून,'बरा आहेस का?"म्हणून विचारायचे.तसेच जुन्या कार्यकर्त्यांवर काही अडचण आली तरीही मदत करायचे. त्याला धीर द्यायचे.
राजकारण बदलत गेले मात्र किसनराव मात्र जुन्या जमान्यात राहिले. राजकारणातील व्यवहारवाद त्यांना आत्मसात करता आला नाही.त्यामुळे नाही म्हटलं तरी त्यांची राजकिय पीछेहाट झाला.पाया कुमकवत झाला.समाजकरणात मात्र त्यांचा घट्टपणे पाय रोवून उभे राहिले.ते जिथे जातील तिथं त्यांना सन्मान मिळायचा. मंचरच्या या आगळ्यावेगळ्या खासदारांची महती सर्वदूर पोहोचली होती.
किसनराव गेले त्यादिवशीची गोष्ट.त्यांचं अंत्यदर्शन घ्यायला माणसाचा महासागर आलेला.प्रत्येक माणूस रडत होता. अण्णांना डोळे भरून पहात होता.आपापल्या आठवणी सांगत होता. त्या गर्दीत सुल्तानही होता.आठवला का?तो अनाथ मुलगा.ज्याला एसटीत नोकरी लावण्यासाठी अण्णा तीन किलोमीटर चालत गेले होते भर उन्हात. आणि साहेबांच्या पाया पडले होते.तो सुल्तान आता अनाथ नव्हता.त्याला बायको पोर होती,घरदार होते.पण आज त्याला पुन्हा अनाथ झाल्यासारखं वाटत होतं.हमसून रडत होता.
मला सुल्तान म्हणाला,"अण्णा गेलेत. पण मला अजूनही ते मला हाक मारत आहेत असा भास होतो.सुल्तान सुल्तान अशा हाका माझ्या कानावर येतात.आता सुल्तान माझ्यासारख्या भेटेल त्या माणसाला भारत देशातील एका आगळ्यावेगळया खासदारांची गोष्ट सांगत बसतो आणि आम्ही ऐकत बसतो.