तंत्रशिक्षण मंत्री किती पाकीट घेतले ?

कोटी विद्या चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थाचालकांना अटक करा.

जनदूत टिम    06-Jun-2023
Total Views |
किरण निचिते,
मुंबई :- कोटी विद्या चॅरिटेबल ट्रस्ट ,६०४,स्नेहा अपार्टमेंट ,एस. एन. रोड ,तांबे नगर ,मुलुंड (प),मुंबई या संस्थेस भाषिक अल्पसंख्यांक दर्जा दिनांक १५ जून २००९ रोजी प्रदान करण्यात आला आहे.परंतु सदर संस्थेच्या संस्थाचालकांनी अलमूरी रत्नमाला इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी ,सापगाव ,ता.शहापुर,जि. ठाणे ,महाराष्ट्र ४२१ ६०१ या शैक्षणिक शाखेत प्रचंड मोठ्या प्रमाणात गैरकारभार करून शासनाची प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केलेली आहे.
 
ARMITE
 
सदर संस्थेने पुढीलप्रमाणे गैरकारभार व घोटाळे केलेले आहेत.
 
१) शुल्क घोटाळा :
 
संस्थेत शिकणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसह महाविद्यालयाच्या सर्वच विद्यार्थ्यांकडून मंजूर शुल्कापेक्षा जास्तीचे वाढीव शुल्क आकारून विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक केलेली आहे.
 
श्री. प्रमोद नाईक ,सहसंचालक तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय मुंबई यांच्या सचिव शुल्क नियामक प्राधिकरण यांना दिलेल्या पत्र क्र.२/विकामुं/तंशि/तांत्रिक-१/२०२२/४०२८ मध्ये असे नमूद केले आहे की " सन २०१५ च्या महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन) अधिनियम, क्र.२८ दि.१७ ऑगस्ट २०१५ च्या कलम १४ (५) नमुद शुल्क नियामक प्राधिकरणाने मान्यता दिलेल्या शुल्कापेक्षा अधिक शुल्क घेतल्यास संबंधित संस्थावर कारवाई करण्याची तरतूद नमुद आहे.यास्तव कोटी विद्या चॅरिटेबल ट्रस्टचे अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी,सापगाव ,शहापुर ,ठाणे महाराष्ट्र ४२१ ६०१ या संस्थेने विद्यार्थ्यांकडून शुल्क नियामक प्राधिकरणाने निश्चित केलेल्या शुल्कापेक्षा जादा शुल्क आकारले असल्याने नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी ही विनंती."
 
ARMITE
 
२) शैक्षणिक गैरकारभार आणि आर्थिक घोटाळा :
 
संस्थेच्या संस्थाचालकांनी विद्यार्थ्यांचे शुल्क बेकायदेशीरपणे महाविद्यालयाच्या व्यतिरिक्त इतर खात्यात जमा करून प्रचंड मोठा प्रमाणात आर्थिक अपहार केलेला आहे.तसेच संस्थाचालकांनी ताळेबंद व जमाखर्चाचे पत्रकामध्ये खोटी माहिती देऊन शुल्क नियामक प्राधिकरणास खोट्या माहितीचे शुल्क प्रस्ताव आणि बोगस ऑडिट रिपोर्ट सादर करून प्रचंड मोठी आर्थिक लूट केलेली आहे.
 
महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार मा. संचालक ,तंत्रशिक्षण संचालनालय यांनी दिनांक २९/०६/२०२२ रोजीचे पत्र क्रमांक २/तंशिसं/एनजीसी/तक्रार (३२१९)/२०२२/५११ सचिव, शुल्क नियामक प्राधिकरण यांना कार्यवाहीसाठी अग्रेषित केले होते. या पत्रात त्यांनी असे नमूद केले कि," सदर संस्थेविरुद्ध प्राप्त विविध तक्रारींच्या आधारे सहसंचालक,तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय यांचे स्तरावरून गठीत केलेल्या चौकशी समितीच्या अहवालात संस्थेमध्ये अखिल भारतीय तंत्रशिक्षण नवी दिल्ली यांचे मानकानुसार बांधकामक्षेत्र व इतर भौतिक सोयी सुविधांची कमतरता ,अपुरा शिक्षक वर्ग, निवडक अध्यापकांना सहावा वेतन व काही अध्यापकांना ठोक रकमेवर वेतन अदा करणे, विद्यार्थ्यांचे शुल्क महाविद्यालयाच्या खात्याऐवजी इतर खात्यात जमा करणे इ. विविध निरीक्षणे नोंदवली आहेत".
 
- तसेच सदर संस्थेने KVCT ह्या संक्षिप्त नावाचा गैरउपयोग करून विद्यार्थ्यांनी दिलेले शुल्क कलाश्री वेंकटेश्वर चॅरिटेबल ट्रस्टच्या नावे घेऊन प्रचंड मोठा अपहार केलेला आहे.
 
३) बांधकाम घोटाळा :
 
सदर संस्थेच्या संस्थाचालकांनी ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकासोबत संगनमत करून कोटी विद्या चॅरिटेबल ट्रस्टचे अलमूरी रत्नमाला इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी महाविद्यालयाचे अनाधिकृत बांधकाम असतानासुद्धा अधिकारांचा गैरवापर करून बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळविला व त्या आधारे त्या बोगस बांधकाम पूर्णत्वाच्या दाखल्याचा उपयोग करून अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद नवी दिल्ली ,तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई विद्यापीठ आणि महाराष्ट्र शासनाकडून बेकायदेशीरपणे विविध परवानग्या व मान्यता मिळवुन शासनाची आणि विद्यार्थ्यांची प्रचंड फसवणूक केलेली आहे. या प्रकरणी मा.गटविकास अधिकारी पंचायत समिती शहापुर यांनी तत्कालीन दोषी ग्रामसेवकांविरुद्ध मा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत),जिल्हा परिषद ठाणे यांचेकडे कार्यवाहीसाठी दिनांक ०९/०१/२०२३ रोजी दोषारोप पत्र जा.क्र.पंसश/ग्रापं/आस्था-१/वशि/२४ सादर केलेले आहे .
 
तसेच सदर संस्थेला अनाधिकृत बांधकाम प्रकरणी नगर रचना ठाणे कार्यालयाने सुमारे २ कोटींचा दंड ठोठावला आहे. आणि दंडाची रक्कम आणखी वाढावी म्हणून नगर रचना कोकण विभाग यांचे कडे तक्रार केल्याने याबाबत सखोल अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे.

ARMITE 
 
४) शिष्यवृत्ती घोटाळा :
 
महाविद्यालयाच्या संस्थाचालकांनी सन २०११-१२ ते २०२१-२२ ह्या काळात मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या कडून सक्तीने विकास शुल्क वसूल केले असल्याचे आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्यावर अन्याय केला असल्याचे सहा. संचालक (लेखा),प्रादेशिक उपायुक्त ,समाज कल्याण ,मुंबई विभाग ,मुंबई यांचे दिनांक १६/०३/२०२२ रोजीचे पत्र जा. क्र. प्राउसक /मुवि/लेप/खात्यांतर्गत/लेखापरिक्षण/२०२१-२२/707 नुसार स्पष्ठ झालेले आहे.
 
तसेच शुल्क नियामक प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत संगनमत करून बोगस शुल्क प्रस्तावांना मंजुरी मिळवून त्याद्वारे विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती मिळवून शासनाच्या समाज कल्याण विभाग ,आदिवासी विकास विभाग आणि अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती विभाग यांची व विद्यार्थ्यांची प्रचंड मोठी आर्थिक फसवणूक केलेली आहे.
 
५) पी. एफ. घोटाळा :
 
सदर संस्थेच्या संस्थाचालकांनी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी मध्ये देखील अफरातफर केल्याचे निदर्शनास आल्याने भविष्य निर्वाह निधी संघटन ठाणे यांचेकडून संस्थेची 7 A अंतर्गत चौकशी सुरू आहे.
 
६) शासकीय अधिकाऱ्यांसोबत संगनमत :
 
-वर नमूद करण्यात आलेले सर्व घोटाळे हे संबंधित खात्याने नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालांद्वारे समोर आलेले असताना संबंधित विभागाचे शासकीय अधिकारी आणि संस्थाचालक यांच्यात संगनमत असल्याने फौजदारी गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ केली जात आहे.सदर प्रकरणी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू, तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक ,शुल्क नियामक प्राधिकरणाचे अध्यक्ष व इतर संबंधित अधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंद करणे गरजेचे असताना त्यांच्याकडून दिरंगाई केली जात आहे.
 
वरील सर्व मुद्द्यांचा विचार करता असे निदर्शनास येते की सदर संस्थेने कायद्याची पायमल्ली करून प्रचंड मोठ्या प्रमाणात घोटाळे केलेले असल्याचे अधिकृत कागदपत्रांच्या आणि विविध चौकशी समितीच्या अहवालाच्या आधारे ठळकपणे सिद्ध झालेले आहे.त्यामुळे सदर संस्थेच्या संस्थाचालकांवर वरील नमूद घोटाळ्यांप्रकरणी फौजदारी गुन्हे नोंद करण्याची कार्यवाही व्हावी.