डहाणू तालुक्यातील विविध प्रकल्पांत पाच शाळा बाधित...

कंटेनर, तात्पुरत्या शेडमध्ये भरतेय शाळा; विद्यार्थ्यांचे हाल.

जनदूत टिम    04-Nov-2023
Total Views |
Palghar : Dahanu ; 
डहाणू तालुक्यातील सुरू असलेल्या मुंबई वडोदरा द्रुतगती मार्ग, बुलेट ट्रेन आणि फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पांमध्ये पाच शाळा बाधीत होत असून यातील दोन शाळा गेल्या ४ ते ५ वर्षांपासून निष्कासित केल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना कंटेनर आणि तात्पुरत्या पत्र्याच्या शेडमध्ये बसून शिक्षण घ्यावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत असून विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होत आहे.

डहाणू तालुक्यातील विविध प्रकल्पांत पाच शाळा बाधित 
 
दरम्यान नवीन इमारती बांधून देण्याची जबाबदारी प्रकल्प प्रशासनाची असून त्यांच्याकडून वरिष्ठ स्तरावरील परवानगी, जागा आणि इतर तांत्रिक कारणांमुळे शाळेच्या इमारती बांधून देण्यासाठी विलंब होत आहे. डहाणू तालुक्यातील सरावली मोरपाडा येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत रेल्वे फ्रेट कॉरिडॉर मध्ये बाधीत झाली आहे. त्यामुळे विद्यार्थांना तात्पुरत्या स्वरूपात एका कंटेनर ची व्यवस्था करून देण्यात आली असून त्यामध्ये शिक्षण दिले जात आहे.
 
याठिकाणी विजेची व्यवस्था नसल्याने एका सामाजिक संस्थेमार्फत जनरेटर उपलब्ध करून देण्यात आले असून त्यामधून विद्युत पुरवठा सुरू आहे. तर कंटेनरमधील पंखे ही बंद पडल्यामुळे विद्यार्थ्यांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. यावर उपाय म्हणून दुपारच्या वेळी शिक्षक परिसरातील झाडांच्या खाली विद्यार्थ्यांचे वर्ग घेत असल्याची माहिती देण्यात येत आहे. तसेच झरी पाटीलपाडा येथील जिल्हा परिषद शाळा बुलेट ट्रेन प्रकल्पात बाधीत झाली असून शाळेतील विद्यार्थांसाठी तात्पुरते शेड उभारून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सुविधा करण्यात आली आहे.
 
शाळेची इमारत उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात चिखल | माती आणि उकाड्याचा त्रास विद्यार्थ्यांना होत असून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक भवितव्यावर याचा परिणाम होत आहे. चार ते पाच वर्षांपासून इमारती अभावी विद्यार्थ्यांचे हाल होत असून परिणामी विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत घट होत आहे. तर इतर तीन शाळांच्या इमारती निष्कासित करण्यात शाळा प्रशासनाने मज्जाव केला असून इतरत्र सुविधा उपलब्ध झाल्याशिवाय शाळा इमारत ताब्यात देण्यास नकार देण्यात आला आहे.
 
नवीन इमारती बांधून देण्यासाठी प्रकल्प प्रशासनाशी पत्रव्यवहार सुरू आहेत. यातील एक शाळेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जमीन उपलब्ध करून देण्यात आली असून लवकरच याठिकाणी शाळेची नवीन इमारत उभारण्यास सुरुवात केली जाणार आहे.
 
  • शाळेच्या इमारतींसाठी प्रकल्प प्रशासनाशी वेळोवेळी पत्रव्यवहार करण्यात येत आहे. सरावली येथील शाळेसाठी जागेची उपलब्धता झाली असून याठिकाणी नवीन इमारत बांधण्यासाठी रेल्वे फ्रेट कॉरिडॉर प्रकल्प प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत. इतर बाधीत शाळांसाठी अगोदर सुविधा उपलब्ध करून देण्याची अट ठेवण्यात आली आहे.                    -माधवी तांडेल, गटशिक्षण अधिकारी, डहाणू
 
  • सरावली जिल्हा परिषद शाळेसाठी जागेची उपलब्धता नसल्यामुळे नवीन इमारत बांधण्यास विलंब होत होता. एका सामाजिक संस्थेकडून शाळेसाठी जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. नवीन इमारतीसाठी वरिष्ठ स्तरावर प्रस्ताव पाठवण्यात आला असून लवकरच याठिकाणी शाळेची नवीन इमारत बांधून देण्यात येणार आहे.                                  -देशपांडे, व्यवस्थापक, रेल्वे फ्रेट कॉरिडॉर
या प्रकल्पातील बाधित शाळा
 
  • मुंबई वडोदरा प्रकल्प
१. गणेश बाग जिल्हा
२. चिंचले बसरपाडा
 
  • बुलेट ट्रेन प्रकल्प
१. झरी पाटीलपाडा
२. गोवणे
 
  • फ्रेट कॉरिडॉर प्रकल्प
१. सरावली मोरपाडा