पदवीसाठी अभ्यासक्रम आराखडा तयार...

बीए, बीकॉम, बीएससीच्या तीन आणि चारवर्षीय अभ्यासक्रमांना मंजुरी...

जनदूत टिम    03-Nov-2023
Total Views |
Maharashtra : Mumbai ; 
नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार (एनईपी) मुंबई विद्यापीठाच्या अखत्यारीतील सर्व बिगर स्वायत्त कॉलेजांमध्ये पुढील वर्षापासून तीन आणि चार वर्षांचे पदवी अभ्यासक्रम घेतले जाणार आहेत.

पदवीसाठी अभ्यासक्रम आराखडा तयार 
 
मुंबई विद्यापीठाच्या विद्या परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत बीए, बीकॉम आणि बीएससीच्या तीन आणि चारवर्षीय पदवी अभ्यासक्रमांना मंजुरी मिळाली असून त्यासाठी विद्यापीठाने पदवीचे अभ्यासक्रम आणि श्रेयांक आराखडा तयार केला ८ आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या अखत्यारीतील सर्व कॉलेजांमध्ये पुढील वर्षी एनईपीची अंमलबजावणी करण्याचा मार्ग खुला झाला आहे. मुंबई विद्यापीठाशी ८७४ संलग्नित कॉलेज आहेत. त्यातील ६२ स्वायत्त कॉलेजांमध्ये चारवर्षीय पदवी अभ्यासक्रम राबविण्यास मुंबई विद्यापीठाने यावर्षीपासून सुरुवात केली आहे.
 
आता विद्यापीठाकडून अन्य ८१२ बिगर स्वायत्त कॉलेजांमध्ये एनईपीची अंमलबजावणी करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणून विद्यापीठाने तीन आणि चारवर्षीय पदवीचा अभ्यासक्रम आणि श्रेयांक आराखडा तयार केला आहे. त्यानुसार विद्यापीठांतर्गत येणाऱ्या प्रमुख आणि समूह कॉलेजच्या नेतृत्वाखाली अन्य ते १० कॉलेजांना दिले जाणार आहे. यानुसार तीन आणि चार वर्षांच्या बहुविद्याशाखीय अभ्यासक्रमाची सहा व्हर्टिकल अतंगर्त अंमलबजावणी केली जाणार आहे.
 
समूह कॉलेजांतर्गत विविध व्हर्टिकल अंतर्गत बहुउद्देश्शीय आणि नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्यासाठी एकमेकांची संसाधने अन्य कॉलेजांना वापरता येणार आहेत. यामध्ये मायनर कोर्सेस, ओपन इलेक्टिव्स, मूल्याधारित शिक्षण आणि को-करिक्युलर कोर्सेसचा समावेश असेल. या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष नियोजन केल्याचे मुंबई विद्यापीठाने नमूद केले आहे. एनईपीच्या अनुषांगाने लवकरच उर्वरित व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमही तयार केले जाणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.
 
सर्वंकष विचार
 
'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीसाठी मुंबई विद्यापीठाने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल पुढे टाकले आहे. पदवीच्या या अभ्यासक्रमांची आणि श्रेयांक आराखड्याची रचना करताना सर्वंकष विचार करण्यात आला आहे. यातून विद्यापीठाशी संलग्नित सर्व बिगर स्वायत्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रगत, कौशल्याधिष्ठीत, बहुउद्देश्शीय, बहुआयामी आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रम शिकता येतील,' असे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी नमूद केले