ग्रामपंचायत निवडणुकीमुळे मतदारांची चंगळ...

जनदूत टिम    02-Nov-2023
Total Views |
Maharashtra : elections ;
ग्रामपंचायतींचा निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार वॉर्डा-वॉर्डात जेवणावळी वेळोवेळी देत असून दारू, मटण, बिर्याणीला मागणी वाढली आहे . ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा उडाला असून, उमेदवार यांच्याकडून हायटेक प्रचार सुरू असून, उमेदवार घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी देण्यावर देखील भर देत आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकीमुळे मतदारांची चंगळ
 
अनेक उमेदवारांनी मतदारांच्या खाण्या-पिण्याची सोय केली आहे. प्रत्येक वॉर्डानुसार व्हेज, नॉनव्हेज जेवणाचे नियोजन केले जात असून, अनेकांना दारू, चिकन, मटण, बिर्याणी पार्सलद्वारे घरपोच पुरवली जात आहे. अनेक मतदारांच्या मुलांना नोकरीचे, कामधंद्याचे आश्वासन दिले जात आहे. रात्रीच्यावेळी ढाबा, हॉटेल याच्यावर कार्यकर्त्यांची गर्दी पाहावयास मिळत आहे.
 
दिवाळी जवळ आल्याने या निवडणुकीमुळे अनेक मतदारांची दिवाळी गोड होणार आहे. अनेक उमेदवारांकडून चिन्ह असलेल्या वस्तू वाटल्या जात आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत एकेका मताला किंमत असल्याने मतदारांचे लाड पुरवले जात असून, त्यांचे मन राखण्यासाठी उमेदवार मन मोकळे करून खर्च करत आहे.
 
बिर्याणी, बकर्‍याच्या मटणाला अधिक पसंती
निवडणुकीच्या धामधुमीत मतदारांकडून उमेदवाराकडे बकर्‍याच्या मटणाची, बिर्याणीची मागणी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. उमेदवारही मतदारांनी नाराज होऊ नये म्हणून वॉर्डनुसार बकर्‍याच्या मटणाच्या पार्टी देत आहे. उमेदवारांचा प्रचार करणारे कार्यकर्ते दररोज रात्री चिकन, मटण, बिर्याणी या विविध पदार्थांवर मनसोक्त ताव मारत आहेत.
 
प्रचाराच्या रणधुमाळीला गती
ग्रामपंचायतींच्या सरपंच व सदस्यपदासाठी अनेक उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मतदानाची तारीख जवळ येत असल्याने प्रचाराच्या रणधुमाळीला गती आली आहे.