🔸कोजागरीची कथा🔸

🌺🙏।।श्री स्वामी समर्थ।। 🙏🌺

जनदूत टिम    28-Oct-2023
Total Views |
एका गावात एक अत्यंत गरीब माणूस होता... एक दिवस त्याचे पत्नीबरोबर भांडण झाले. त्यानंतर तो माणूस पैसे मिळवण्यासाठी घराबाहेर पडला. दिवसभर उपाशीपोटीच फिरत संध्याकाळी समुद्राच्या काठा काठाने तो एका अरण्यात आला. तिथे त्याला तीन नागकन्या दिसल्या.
 
त्या विचार करीत होत्या, चिंतेत होत्या. त्यांना सोंगट्या खेळण्यासाठी एका चवथ्या गड्याची गरज होती. त्या माणसाला पाहिल्यावर त्या नागकन्यांना आनंद झाला. त्यांनी त्याला खेळायला बोलाविले. दिवसभराच्या भटकंतीने तो थकला होता. नागकन्यांनी त्याला नारळाचे पाणि प्यायला दिले. त्याला बरे वाटले. त्या नागकन्यांबरोबर तोही सोंगट्या खेळायला बसला, पण का कुणास ठाऊक, खेळतांना तो सारखा हरत होता.....

कोजागरीची कथा 
त्या दिवशी आश्विन शुध्द पौर्णिमा होती... सर्वत्र गार वारा सुटला होता. सगळीकडे शुभ्र चांदणे पसरले होते. इतक्यात अक्काबाईचा फेरा आला, लक्ष्मी देवी आली, गरीबाला गरीबीमुळे दिवसभर ऊपवास घडलाच होता, आणि खेळामुळे जागरण चालुच होते. त्याच्या हातून सहजपणे कोजागरी व्रताचे पालन झाले होते. लक्ष्मी त्या गरीबावर प्रसन्न झाली. तो गरीब खेळात जिंकु लागला. तो देखणा, उत्साही, राजबिंडा दिसू लागला. राजकन्यांनीही त्याला अमाप संपत्ती दिली. नागकन्यांबरोबर त्याचा विवाह झाला. सर्व संपत्ती आणि नागकन्यांना घेऊन तो घरी आला. तेव्हापासून तो कोजागरीच्या व्रताचे पालन करू लागला, अशी ही कथा आहे.....
 
🔸कोजागरी पौर्णिमा.🔸
कोजागरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा, ही आश्विन पौर्णिमेला एक हिंदू सण म्हणून साजरी करतात... ही शरद ऋतूतील आश्विन महिन्यात येते. इंग्रजी दिनदर्शिकेनुसार कोजागरी पौर्णिमा बहुधा सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये असते. कृषी संस्कृतीत ह्या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या पौर्णिमेला माणिकेथारी (मोती तयार करणारी) असेही संबोधिले जाते.....
 
या पौर्णिमेच्या दिवशी साक्षात लक्ष्मीदेवी चंद्रमंडळातून येऊन पृथ्वीवर उतरते आणि मध्यरात्री (संस्कृतमध्ये) 'को जागर्ति' (म्हणजे 'कोण जागत आहे') असे म्हणत मनुष्याचे प्रयत्न पहात पृथ्वीतलावर संचार करीत असते अशी धारणा आहे... कोण जागे आहे, याचा मतितार्थ आहे कोण सजग आहे आणि ज्ञानासाठी आतुर आहे असे देवी विचारत येते.....
 
आश्विन पौर्णिमेस होणारा प्राचीन लोकोत्सवाला वात्स्यायनाने कौमुदीजागर व वामन पुराणाने दीपदानजागर म्हटले आहे... बौद्धकाळात हा उत्सव कशा प्रकारे साजरा होत असे, त्याचे वर्णन उन्मादयंती जातकावरून कळते. या दिवशी बळीराजाची पूजा करावी असे वामन पुराणात सांगितले आहे.....
 
लक्ष्मीपूजन श्लोक...
सुरासुरेंद्रादिकिरीटमौक्तिकैर्युक्तं सदा यत्तव पादपंकजम्।
परावरं पातु वरं सुमंगलं नमामि भक्त्याखिलकामसिद्धये।।
भवानि त्वं महालक्ष्मी: सर्वकामप्रदायिनी।।
सुपूजिता प्रसन्ना स्यान्महालक्ष्मि नमोस्तु ते।।
नमस्ते सर्वदेवानां वरदासि हरिप्रिये।
या गतिस्त्वत्प्रपन्नानां सा मे भूयात् त्वदर्चनात्।।
ॐ महालक्ष्म्यै नम:, प्रार्थनापूर्वकं समस्कारान् समर्पयामि। या श्लोकाने लक्ष्मी देवतेची पूजा केली जाते...
 
धार्मिक महत्त्व...
या दिवशी करायच्या व्रतात रात्री लक्ष्मीची आणि ऐरावतावर बसलेल्या इंद्राची पूजाही केली जाते... उपोषण, पूजन व जागरण या तीनही अंगांना या व्रतात सारखेच महत्त्व आहे. या व्रतात रात्रीच्या पहिल्या प्रहरी लक्ष्मी व इंद्र, बळीराजा यांच्या प्रतिमांची पूजा करतात व मग त्या दोघांना पुष्पांजली समर्पित करतात. अशी पूजा झाल्यावर पोहे व नारळाचे पाणी देव-पितरांना समर्पून व आप्तेष्टांना देऊन स्वतः सेवन करतात. चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवतात. दुसऱ्या दिवशी प्रात:काळी बळीराजा-लक्ष्मीची पूजा करून व सर्वांना भोजन घालून पारणे करतात.....
 
ब्रह्मपुराणात या व्रताची कृत्ये थोडी निराळी सांगितली आहेत... रस्ते झाडावेत. घरे सुशोभित करावीत. दिवसा उपवास करावा. गृहद्वाराजवळ अग्नी प्रज्वलित करून त्याची पूजा करावी. चंद्राची पूजा करून त्याला दूध व खिरीचा नैवेद्य दाखवावा. भार्येसह रुद्र, स्कंद, नंदीश्वर, ज्यांच्याकडे गायी असतील त्यांनी सुरभी, मेंढे बाळगणाऱ्यांनी वरुण, हत्ती बाळगणाऱ्यानी विनायक व घोडे बाळगणाऱ्यांनी रेवंत व निकुंभ या देवतांची पूजा करावी.....
 
पौराणिक कथानुसार शरद पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्मदिवस मानला जातो, ज्या दिवशी ती समुद्र मंथनातून प्रकट झाली होती... कोजागरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण १६ कलांमध्ये असतो. चंद्राची किरणं विशेष अमृतमयी गुणांनी युक्त असतात. श्रीकृष्ण १६ कलांचे अवतार मानले जातात. द्वापार युगात वृंदावनमध्ये (व्रजमंडळ) भगवान श्रीकृष्णाने गोपिकांसोबत रात्री रासक्रीडा (महारासलीला) केली होती. वृंदावनात निधीवनात आजही श्रीकृष्ण आणि गोपिका रासलीला रचतात अशी मान्यता आहे. त्या विशेष प्रसंगाची आठवण करुन वैष्णव संप्रदायाचे भक्त रासोत्सव साजरा करतात. श्रीकृष्ण आणि राधाची विशेष उपासना केली जाते.....
 
आरोग्यशास्त्र दृष्ट्या महत्त्व...
दमा किंवा अस्थमा यासारख्या आजारांच्यावरील औषधे खिरीमध्ये मिसळून कोजागरीच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात ठेवली जाते... चंद्राचे किरण या खिरीवर पडल्याने त्याचा गुणधर्म बदलतो आणि अशी खीर आजारी व्यक्तीला दिल्यास तिला आराम मिळतो असे मानले जाते.....
 
पौर्णिमेची रात्र, चंद्राची रात्र सर्वांना आनंद देते... आश्विन शुध्द पौर्णिमा म्हणजे "कोजागरी पौर्णिमा". अशा या रात्री शरदाच्या चांदण्यात जे लोक आनंदात रमत, खेळत जागरण करतात, त्यांच्यावर देव प्रसन्न होतात असा समज आहे.....
 
हा उत्सव आश्वीन शुध्द पौर्णिमा या दिवशी रात्री ठीक १२.०० ते १३.३९ या ३९ मिनिटात करायचा असतो... भगवान इंद्र, लक्ष्मि, कुबेर यांची वर्षातून सेवा करण्याची हीच एकमेव वेळ असते. शक्यतो हा उत्सव प्रत्येकाने आपल्या घरीच करावा. उपरोक्त वरील देवता या दिवशी पृथ्वीतलावर आशीर्वाद देण्यासाठी येत असतात. त्यांना अमृताचा (दूध) नैवैद्य लागतो.....
 
🌹पूजाविधी मांडणी.🌹
मांडणी करतांना एका पाटावर किंवा चौरंगावर,
🌼१) लक्ष्मीचे प्रतीक म्हणून विड्याच्या जोडपानावर सुपारी ठेवावी...
🌼२) कुबेराचे प्रतीक म्हणून विड्याच्या जोडपानावर सुपारी ठेवावी...
🌼३) तांदुळाच्या राशीवर पाण्याने भरलेला तांब्याचा तांबा / गडवा, त्यात पाणी भरून त्यावर आंब्याच्या पानांचा डगळा इंद्राचे प्रतीक म्हणून ठेवावा...
🌼४) चंदनाचा भरीव गोल चंद्राचे प्रतीक म्हणून बनवावा...
अशी मांडणी रात्री बारा वाजेपर्यंत करून ठेवावी... रात्री ठीक १२ ते १२.३० या ३० मिनिटात दुधाचे भांडे चंद्रकिरणांत ठेवावे. जेणे करून चंद्र देवता शलाका रूपात अमृताचा प्रसाद देतात...
🌼५) १२.३० वाजता पूजेच्या पाटासमोर दुधाचे भांडे ठेवून चारही देवतांची हळद कुंकू, पांढरी फुले, अक्षता, अष्टगंध वाहून पूजा करावी. दुपारीच तुलसीपत्र तोडून ठेवावे... दुधात एक तुलसीपत्र टाकावे व त्याचा नैवेद्य अर्पण करावा, व प्रार्थना म्हणावी, "ऋण रोगादी दारिद्र्यम् अपमृत्यु भय । शोक मनस्ताप। नाशयंतु मम सर्वदा ।।"
 
नैवेद्य फक्त घरातील व्यक्तींनीच घ्यावा... उपरोक्त सुपाऱ्या जपून ठेवून दरवर्षी पूजेला वापराव्यात. १२ ते १२.३० या काळात लक्ष्मीप्राप्तीची सेवा करावी... त्यात,
 
🌹श्री स्वामी समर्थ मंत्र ११माळा जप...
🌹श्री लक्ष्मी गायत्री मंत्र १माळ जप...
🌹श्री विष्णु गायत्रीमंत्र १ माळ जप...
🌹श्री कुबेर मंत्र १ माळ जप...
🌹१६ वेळा श्री सूक्त...
🌹श्री व्यंकटेश स्तोत्र १ वेळा...
🌹गीतेचा १५ वा अध्याय १ वेळा.... एवढी सेवा करावी. (सहकुटुंब एकत्रीत केली तर सर्व सेवा वेळेत होते...)
हा अतिशय महत्वाचा लक्ष्मी प्राप्तीचा कार्यक्रम आहे... लक्ष्मी म्हणजे 'श्री'. लक्ष्मी अनेक प्रकारची आहे. वित्तलक्ष्मी, गुणलक्ष्मी, लक्ष्मी, भावलक्ष्मी वगैरे. सर्वच प्रकारची लक्ष्मी जागृत माणसाला मिळते. आळशी, प्रमादी किंवा झोपाळू माणुस प्रत्यक्ष समोर आलेल्या लक्ष्मीलाही ओळखू शकत नाही. देवी महालक्ष्मी ही परमदयाळु आहे, कृपाळु आहे, हित करणारी आहे पण या देवीची मोठी बहिण मात्र संकटे आणते, त्रास देते, कटकटी निर्माण करते अशी कल्पना आहे.....
 
या मोठ्या बहीणीस 'अक्काबाई' म्हणतात... तिची अवकृपा झाली की लोक म्हणतात की 'अक्काबाईचा फेरा आला.' ही अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक घरावरून फिरते. कोण झोपले आहे, कोण जागे आहे, हे ती पहाते. झोपलेल्या आळशी लोकांवर ती रागावते. पण जे सेवा-उपासना, जागरण करतात त्यांना सुख-समाधान, संपत्ती लाभते असे म्हणतात. कोण जागतोय ? को जागर्ती ? .. यावरून या पौर्णिमेला "कोजागरी" हे नांव पडले. याच पौर्णिमेच्या रात्री देवांचा राजा इंद्रही पृथ्वीवर फिरत असतो. आणि पूजा कोण करीत आहे किंवा नाही हे तो पहात असतो. वारंवार तो "कोजागर्ती" असे विचारतो. यावरून हे नांव रूढ झाले.....
 
🌹कोजागरी पौर्णिमा🌹
कोजागिरी म्हणजे जागृतीचा उत्सव, वैभवाचा उत्सव, आनंदाचा उत्सव, ऊल्हासाचा ऊत्सव... या दिवशी चंद्र स्वत:च्या १६ व्या कलेने फुललेला असतो. ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने त्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अधिकाधीक जवळ असतो. संपूर्ण वर्षात त्या दिवसाचा चंद्र सर्वात मोठा वाटतो. कोजागरी पौर्णिमेचा चंद्र अधिक आकर्षक वाटतो.....
 
चंद्राचा प्रकाश शांत व शीतलही आहे... एवढेच नाही, तर तो उपयोगी व उपकारकही आहे. शेतात पडून असलेल्या धान्याला तसेच अनेक प्रकारच्या औषधींच्या गुणांना पुष्ट करण्यात चंद्राचा फार मोठा भाग आहे. भगवान गीतेत सांगतात की, " रसात्मक सोम बनून मी सर्व औषधींना पुष्ट करतो । पुष्पामिचौषधि: सर्वा: सोमी भुत्वा रसात्मक: ।
 
या दिवशी सर्वात मोठा मुलगा किंवा मुलगी यांची आश्विनी करतात... सकाळी रांगोळी काढून मुलाला - मुलीला सुवासिक तेल लावून स्नान घालतात. भोजनासाठी गोड पदार्थ करतात. संध्याकाळी देवाला, चंद्राला औक्षण करतात. मुलाला ओवाळतात. " चंद्राप्रमाणे चांदणे शिंपीत जीवनाची वाटचाल करावी ' हा बोध आजच्या दिवसापासून घ्यावा.....
 
🔸संकलन- सदानंद पाटील, रत्नागिरी.
आपल्या जिवलग व्यक्तींनच्या आठवणी, आभास वास्तविकता स्वीकारून आनंदाने जगा. स्वतःची व कुटुंबाच्या जीवनाची व आरोग्याची काळजी घ्या. सरकारी सुचनांचे, नियमांचे व कायद्याचे पालन करा, पण लोकशाही व संविधान सुरक्षित ठेवा.
एकमेकांना अडचणीत आणु नका, त्यापेक्षा मदत करा, जमत नसेल तर निदान गप्प तरी बसा, नकोत्या उठाठेवी करू नका. समाजातील खोट्या, राजकारणी, मतलबी, स्वार्थी, गर्विष्ठ, लबाड, लोकांपासुन दूर रहा, अफवानवर विश्वास ठेवण्या आधी प्रथम खात्री करा, नेहमी सुखी, समाधानी व आनंदी राहा. नेहमी सावध रहा, सुरक्षित रहा व सतर्क रहा.
 
"प्रत्येकाचे जीवन, आयुष्य फार सुंदर आहे ते आनंदात जगा व दुसऱ्यांलाही आनंदी जगु द्या. स्वार्थ व अहंकार कधीही मनात ठेऊन वागू नका, वाईट व कठीण प्रसंगाची वेळ कधी कुणावर येईल हे सांगून शकत नाही हे लक्षात ठेवा".🙏