आता मुरबाडपर्यंत गोदामांच्या रांग !

कमीत कमी चटईक्षेत्राचा वापर करून गोदाम क्षेत्राला मान्यता देता येईल, असे नियोजन महानगर विकास प्राधिकरणाकडून सुरू आहे.

जनदूत टिम    12-Oct-2023
Total Views |
Thane : Murbad :
देशभरात ई-कॉमर्स तेजीत असून, ‘पिन पासून पियानो’पर्यंतच्या वस्तूंचा साठा करणाऱ्या भिवंडीतील गोदामांचा देशभरातील सर्वात मोठा पट्टा आता थेट शहापूर, मुरबाडपर्यंत विस्तारण्याचे संकेत आहेत. मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने या संपूर्ण व्यापार-उदिमाला कायदेशीर कक्षेत आणत थेट मुरबाडपर्यंत ‘लॉजेस्टिक पार्क’साठी आरक्षित क्षेत्र निर्माण करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

आता मुरबाडपर्यंत गोदामांच्या रांग
 
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या विस्तारीकरणाचा भाग म्हणून भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर, वांगणी आणि पनवेलपर्यंत मर्यादित असलेल्या या भागाचा विस्तार ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड आणि रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यापर्यंत करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे आतापर्यंत भिवंडी, पडघा, पनवेल, उरणपर्यंत मर्यादित असलेल्या गोदामांचा विस्तार या नव्या पट्टयात होऊ शकेल. शहापूरपुढे मुरबाडपर्यंतचा बराचसा भाग आता हिरव्या वनराईने बहरला आहे. काही भागांत हिरव्या क्षेत्राची आरक्षणे आहेत. या भागात कमीत कमी चटईक्षेत्राचा वापर करून गोदाम क्षेत्राला मान्यता देता येईल, असे नियोजन महानगर विकास प्राधिकरणाकडून सुरू आहे. प्राधिकरणातील वरिष्ठ प्रशासकीय सूत्रांनी या वृत्तास दुजोरा दिला.
 
कोंडीचे केंद्र :
मुंबईच्या वेशीवरील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, पडघा, नवी मुंबई, उरण, पनवेल पट्टय़ात गेल्या काही वर्षांपासून गोदामांचे मोठे क्षेत्र विकसित झाले आहे. उरणच्या जवाहरलाल नेहरू बंदराजवळ असलेल्या उरण, पनवेलबरोबरच अनेक कंपन्यांनी भिवंडी, पडघा भागात आपली व्यापार दळणवळण केंद्रे (लॉजिस्टिक पार्क) सुरू केली आहेत. लाखोंचा रोजगार निर्माण करणाऱ्या या केंद्रांमध्ये अत्यावश्यक रस्ते, इतर नागरी सुविधा नाहीत. अनेक वर्ष कोणत्याही ठोस नियोजनाशिवाय ही व्यापर केंद्र सुरु आहेत. ही व्यापार केंद्रे आता कोंडीची मोठी ठिकाणे झाली आहेत. त्याचा फटका भिवंडी, पडघा, उरण, पनवेल भागातील शहरांना बसत आहे. ही कोंडी फोडण्यासाठी या व्यापार दळणवळण केंद्रांचा विस्ताराचे नियोजन आहे.
 
महानगर प्रदेशाची हद्द मुरबाडपर्यंत वाढल्यास या भागाचा नियोजनबद्ध विकास शक्य आहे. हद्द वाढीमुळे विकासापासून दूर असलेला हा भाग विकासाच्या टप्प्यात येईल आणि या सर्व परिसराचा सर्वांगीण विकास होण्यास हातभार लागेल.
 
किसन कथोरे, आमदार, मुरबाड
 
विस्ताराचे नवे धोरण :
सध्या भिवंडी, पडघा भागात एक लाखाहून अधिक गोदामे आहेत. त्यातील सुमारे ४० हजार गोदामांना मान्यता देण्याच्या हालचाली सुरू आहेत. हा बेकायदा व्यापार असाच विस्तारण्यापेक्षा ठोस धोरणाद्वारे विस्ताराची आखणी केली जात आहे. भिवंडीपासून वाशिंद दिशेने व्यापार केंद्रे उभारणीसाठी चार किलोमीटर हद्द यापूर्वीच वाढवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. आता शहापूर, मुरबाड आणि वांगणीपुढे कर्जतपर्यंत मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाची हद्द वाढविण्याचे नियोजन केले जात आहे, असे समजते. त्यामुळे तिथपर्यंत गोदामांचा विस्तार होण्याची चिन्हे आहेत.