जिल्हा मुख्यालयात जनसंपर्क कार्यालय नाही

जनदूत टिम    28-Sep-2021
Total Views |
सफाळे : पालघर जिल्ह्याच्या भव्यदिव्य जिल्हा मुख्यालयांच्या इमारतीत जनसंपर्क कक्ष अजूनही स्थापन झालेले नाही. याचबरोबरीने पत्रकारांसाठीही कक्ष स्थापन नसल्याने माहिती घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसह पत्रकारांची कुचंबना होत आहे.
 
पालघर-जिल्हा-मुख्यालय_1&n
 
अलिकडेच भव्यदिव्य जिल्हा मुख्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन झाले. त्यानंतर सर्व मुख्यालयाच्या कार्यालयांचे स्थलांतर झाले असले तरी जनसंपर्क कक्षाबरोबरीने पत्रकार कक्षाबाबत जिल्हा प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येते. वारंवार जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद कार्यालयाकडे मागणी केल्यानंतर दोन्ही कार्यालयाच्या आराखड्यामध्ये जनसंपर्क अधिकारी कार्यालय व पत्रकारांसाठी कक्ष ठेवण्यात येतील, असे आश्वासन दिले गेले होते. मात्र जिल्हा मुख्यालय सुरू होऊन अनेक दिवस उलटून गेल्यानंतरही ही कार्यालय, कक्ष अजूनही सुरू झालेली नाही.
 
जिल्ह्याच्या विविध कार्यालयांची माहिती व प्रशासन संबंधाची माहिती जनसंपर्क अधिकारी कार्यालयाकडून मिळणे अपेक्षित आहे. त्यासाठी नागरिक याच कार्यालयाशी संपर्क साधत आहेत. मात्र हे कार्यालय सद्यस्थितीत पालघर पूर्वेकडील एका इमारतीत असल्यामुळे नागरिकांना जिल्हा मुख्यालय सोडून त्या ठिकाणी जावे लागत आहे. पत्रकारांनाही जिल्हा प्रशासनाच्या किंवा एखाद्या माहितीसाठी त्यांच्या कामासाठी तेथे जावे लागत आहे. याउलट जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये जनसंपर्क अधिकारी कार्यालय अस्तित्वात नाही. जनसंपर्क अधिकारी नेमकी बसतात कुठे हेच नागरिकांसह पत्रकारांना अजूनही माहित नाही.
 
या कार्यालयात जिल्हा परिषदेशी निगडित माहिती घ्यायला आलेल्या नागरिकांनी व पत्रकारांनी बसायचे कुठे, असा प्रश्न निर्माण होत आहे. पत्रकारांना जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यांच्या दालनात किंवा एखाद्या अधिकारीच्या दालनात बसावे लागत आहे. जिल्हा परिषदेच्या नवीन मुख्यालय इमारतमध्ये मुख्य प्रवेशद्वारातून आत जाताना उजव्या बाजूला असलेला कक्ष हा जनसंपर्क अधिकारी कार्यालयासाठी राखीव ठेवण्यात आला होता. मात्र, आराखड्यातील आरक्षण बदलून त्या कार्यालयाचे रूपांतर वाहन चालक कक्षामध्ये करण्यात आले आहे. आराखड्यात आरक्षण असताना जिल्हा परिषदेने या कक्षांमध्ये बदल का केला, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.