अंबरनाथमध्ये हॉटेल चालकाकडून दुसऱ्यांदा वीजचोरी; गुन्हा दाखल

28 Sep 2021 10:23:17
कल्याण: महावितरणच्या पथकाने अंबरनाथ पश्चिमेतील नेताजी मार्केट परिसरातील नवाब हॉटेलमध्ये रिमोटच्या साह्याने सुरु असलेली वीजचोरी उघडकीस आणली आहे.
 
meter_1  H x W:
 
विशेष म्हणजे वीजचोरी प्रकरणी या हॉटेलविरुद्ध 2017 मध्ये कारवाई करून चोरीच्या विजेचे 2 लाख 95 हजार 720 रुपयांचे वीजबिल व 55 हजार रुपयांचा दंड वसूल केला होता. आता नुकत्याच केलेल्या कारवाईत 25 हजार 350 रुपयांची 1202 युनिट वीज चोरून वापरल्या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
 
नवाब हॉटेलचा सध्याचा वीज वापरकर्ता अब्दुल शब्बीर बद्रुद्दीन व हॉटेलचा मालक सलीम शेख अशी याप्रकरणी वीज कायदा-2003 च्या कलम 135 व 138 नुसार गुन्हा दाखल झालेल्या आरोपीची नावे आहेत. हॉटेलच्या मीटरची तपासणी केली असता मीटरला तडा गेल्याचे निदर्शनास आले. संशयित मीटर जप्त करून तपासणी केली असता मीटरमध्ये रिमोट कंट्रोल सर्किट बसवल्याने आढळून आले. आरोपींकडून वीज चोरीसाठी वापरण्यात आलेला रिमोट कंट्रोलही जप्त करण्यात आला आहे. नोव्हेंबर 2017 मध्ये नवाब हॉटेलविरुद्ध वीजचोरीची कारवाई करून त्याच महिन्यात साडेतीन लाख रुपये वसूल करण्यात आले होते.
 
महावितरणकडून ग्राहकांच्या वीज वापरावर विशेष लक्ष ठेवण्यात येत असून उपलब्ध माहितीच्या आधारे वीज चोरांवर कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई नियमितपणे सुरू राहणार असून कोणतीही युक्ती वापरून विजेचा अनधिकृत वापर करू नये, असे आवाहन मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांनी कल्याण परिमंडलातील ग्राहकांना केले आहे. सहायक अभियंता मनीषा मुऱ्हे, प्रकाश हरद, तंत्रज्ञ अजित पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.
Powered By Sangraha 9.0