यॉर्कर किंगची निवृत्ती

श्याम ठाणेदार    15-Sep-2021
Total Views |
श्रीलंकेचा महान गोलंदाज, यॉर्कर किंग लसीत मलिंगाने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतल्याची घोषणा केली. मलिंगाने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर जगभरातील आजी माजी खेळाडूंनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. क्रिकेट रसिकांसाठी मात्र त्याची निवृत्ती चटका लावणारी ठरली कारण लसीत मलिंगा हा क्रिकेट विश्वातील महान गोलंदाज म्हणून ओळखला जातो. क्रिकेट विश्वातील सर्वोत्तम गोलंदाजात त्याची गणना होते. यॉर्कर गोलंदाजी ही त्याची खासियत होती.
 
malinga44_1  H
राऊंड आर्म म्हणजे स्लिंग ऍक्शनने गोलंदाजी करत त्याने जगातील सर्व दिग्गज फलंदाजांच्या दांड्या गुल केल्या आहेत. आपल्या कुरळ्या केसांसाठी तो महिला वर्गात देखील लोकप्रिय होता. २८ ऑगस्ट १९८३ रोजी श्रीलंकेतील गॉल येथे त्याचा जन्म झाला. श्रीलंकेतील स्थानिक क्रिकेट गाजवून त्याने श्रीलंकेच्या मुख्य संघात प्रवेश मिळवला. १ जुलै २००४ रोजी त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी पदार्पण केले. पहिल्याच सामन्यात त्याच्या अनोख्या ऍक्शनने ऑस्ट्रेलियाचे दिग्गज गोलंदाज चक्रावून गेले. त्यानंतर १७ जुलै २०१४ रोजी त्याने यूएई विरुद्ध एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले. तेंव्हापासून लसीत मलिंगा हे नाव क्रिकेट विश्वात प्रसिद्ध झाले. कसोटी, एकदिवसीय व टी २० अशा क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात त्याने धडाकेबाज कामगिरी केली.
 
आपल्या अप्रतिम गोलंदाजीने त्याने श्रीलंकेला अनेक विजय मिळवून दिले होते. तो खराखरा मॅच विनर गोलंदाज होता म्हणूनच केवळ श्रीलंकेत नाही तर जगभर त्याचे चाहते होते. आपल्या सतरा वर्षाच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याने अनेक विक्रमही आपल्या नावे केले. क्रिकेटमधील सर्व प्रकारात सर्वाधिक हॅट्ट्रिक घेण्याचा विश्वविक्रम त्याच्या नावे आहे. एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक तीनवेळा हॅट्ट्रिक घेणारा तो जगातील एकमेव गोलंदाज आहे. तसेच विश्वचषकात दोनदा हॅट्ट्रिक घेणाराही तो एकमेव गोलंदाज आहे. विश्वचषकात चार चेंडुवर चार बळी घेणाराही तो जगातील एकमेव गोलंदाज आहे. कुठलाही सामना एकहाती फिरवण्याची क्षमता त्याच्याकडे होती.
 
२०११ साली भारतात झालेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताविरुद्ध त्याने सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग या सलामीवीरांना स्वस्तात बाद करून सामना श्रीलंकेकडे फिरवला होता मात्र त्याला अन्य गोलंदाजांकडून पुरेशी साथ न मिळाल्याने तो श्रीलंकेला विश्वचषक मिळवून देऊ शकला नाही पण अवघ्या तीन वर्षाने म्हणजे २०१४ साली झालेल्या टी २० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताविरुद्धच त्याने अप्रतिम गोलंदाजी करुन श्रीलंकेला विश्वचषक जिंकून दिला. त्यावेळी तो श्रीलंकेच्या कर्णधारही होता. या स्पर्धेत त्याने देशाचे कुशलतेने नेतृत्व केले. २००७ साली वेस्ट इंडिज मध्ये झालेल्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेला जिंकण्यासाठी पाच ओव्हरमध्ये पाच धावा आवश्यक होत्या. त्यांच्याकडे पाच फलंदाज शिल्लक होते अशावेळी मलिंगाने सलग चार चेंडूत चार फलंदाज बाद करून सामना फिरवला होता.
 
विशेष म्हणजे हे चारही बळी त्याने यॉर्करवर मिळवले होते. इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलमध्येही मलिंगाने अप्रतिम कामगिरी केली आहे. २००८ पासून तो मुंबई इंडियन्स या संघाचा अविभाज्य भाग होता. मुंबई इंडियन्सने अनेक खेळाडूंना रिलीज केले पण मलिंगाला मात्र कधीही रिलीज केले नाही. लसीत मलिंगाने एका मुलाखतीत म्हटले होते की मी श्रीलंकेसाठी ज्या भावनेने खेळतो त्याच भावनेने मुंबई इंडियन्ससाठी खेळतो. मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांचा तो आवडता खेळाडू आहे. मुंबईने सर्वाधिक पाच वेळा आयपीएलचे अजिंक्यपद मिळवले त्यात मलिंगाचा सिंहाचा वाटा आहे. २०१९ साली झालेला आयपीएलचा अंतिम सामना कोण विसरेल? या सामन्यात राजस्थान रॉयलला विजेतेपदासाठी केवळ दोन धावांची गरज होती. समोर स्टीव्हन स्मिथसारखा दिग्गज फलंदाज होता पण मलिंगाने त्याला बाद करून मुंबई इंडियन्सला विजेतेपद मिळवून दिले. आता त्याने सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने त्याचा तो फेमस यॉर्कर क्रिकेट रसिकांना पुन्हा पाहायला मिळणार नाही. त्याचा सारखा यॉर्कर किंग पुन्हा होणार नाही. म्हणूनच क्रिकेट रसिक म्हणत आहेत we miss u yorker king....