भारताची महिला बॉक्सर लवलीना बोरगेहेन हिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून भारताला तिसरे पदक मिळवून दिले. मीराबाई चानू, पी व्ही सिंधू यांच्यानंतर भारताला पदक मिळवून देणारी लवलीना ही तिसरी खेळाडू ठरली आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये भारताला मिळालेले हे तिसरे पदक आहे. याआधी मेरी कोम आणि विजेंद्र सिंग यांनी अशी कामगीरी केली आहे.
लवलीनाचा जन्म २ ऑक्टोबर १९९७ रोजी आसामच्या गोलाघाट येथे झाला. तिच्या वडिलांचे नाव टिकेम बोरगेहन असे आहे. तिच्या दोन मोठ्या बहिणी लीचा आणि लिमा या देखील राष्ट्रीय स्तरावर बॉक्सिंग खेळल्या आहेत. तिच्या बहिणी बॉक्सर असल्याने तिनेही बॉक्सिंगमध्येच करियर करण्याचे ठरवले. तिच्या शाळेत बॉक्सिंगसाठी चाचणी शिबीर घेण्यात आले त्यात ती सहभागी झाली. त्यात प्रशिक्षक पदूम बोरो यांनी तिची निवड केली. २०१२ सालापासून तिचे बॉक्सिंगचे प्रशिक्षण सुरू झाले. प्रख्यात बॉक्सिंग प्रशिक्षक शिव सिंह यांच्याकडून तिने प्रशिक्षण घेतले. राष्ट्रीय स्तरावर तिने दर्जेदार कामगिरी केली त्यामुळे २०१७ व्हिएतनाम येथे झालेल्या आशिआई स्पर्धेसाठी तिची निवड झाली. या स्पर्धेत तिने कांस्यपदक जिंकले याच कामगिरीच्या जोरावर तिची २०१८ च्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी निवड झाली. या स्पर्धेत ती पदक मिळवू शकली नाही पण त्याची कसर तिने मंगोलिया आणि पोलंड येथे झालेल्या स्पर्धेत भरुन काढली. या दोन्ही स्पर्धेत तिने कांस्यपदक जिंकले.
२०१९ साली रशिया येथे झालेल्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेतही तिने कांस्यपदक मिळवले याच पदकाच्या जोरावर तिने टोकियो ऑलिंपिकचे तिकीट मिळवले. लवलीनाने टोकियो ऑलिंपिकची तिने जोरदार तयारी सुरू केली. टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकायचेच असा निश्चय तिने केला पण ऑक्टोबर २०२० मध्ये तिला कोरोनाने गाठले. तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. रुग्णालयातुन आल्यावर काही दिवस तिला विलगिकरणात राहावे लागले त्यामुळे तिचा सरावात खंड पडला. आता सर्व संपले ऑलिम्पिक पदकाचे आपले स्वप्न अपुरेच राहणार असे तीला वाटले यावेळी तिच्या कुटुंबीयांनी आणि प्रशिक्षकाने तिला खूप धीर दिला. कोरोनातून बरी झाल्यावर तिने पुन्हा सरावाला सुरवात केली. भरपूर सराव केला. खूप मेहनत घेतली. फिटनेस टिकवण्यावर भर दिला. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकायचेच या निश्चयाने ती झपाटून गेली. तिने दिवस रात्र एक केले आणि टोकियो गाठले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिला खडतर ड्रॉ मिळाला तिचे सर्व प्रतिस्पर्धी मातब्बर होते त्यामुळे ती ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकेल अशी आशा कोणालाही नव्हती पण तिला मात्र स्वतःवर खूप विश्वास होता. या विश्वासाच्या जोरावरच ती रिंगमध्ये उतरली. सुरवातीचे सामने तिने लीलया जिंकले.
उपांत्यपूर्व फेरीत चीनची मी चेन ही तिची प्रतिस्पर्धी होती. मी चेन ही जगातील सर्वोत्तम बॉक्सर म्हणून ओळखली जाते. या मी चेन ने लवलीनाला याआधी चार वेळा पराभूत केले आहे त्यामुळे हा सामना देखील मी चेनच जिंकेल असेच भाकीत जाणकारांनी केले होते. मी चेन देखील लवलीनाला आपण सहज हरवू या भ्रमात होती. रिंगमध्ये उतरण्यापूर्वी तिने तशी वलग्नाही केली होती मात्र रिंगमध्ये उतरल्यावर वेगळेच घडले. मी चेनला फाजील आत्मविश्वास नडला. लवलीनाने तिला चारी मुंड्या चित केले. उपांत्य फेरीत मात्र लवलीनाला पराभव स्वीकारावा लागला. या पराभवाने ती निराश झाली मात्र हिंमत हरली नाही. उपांत्य फेरीतील पराभवानंतरही देशासाठी पदक मिळवायचेक हा तिचा निश्चय ढळला नाही. कांस्य पदकाच्या लढतीत ती जीव तोडून खेळली आणि तिने देशासाठी पदक जिंकलेच. तिचा निश्चय पूर्ण झाला. तिने कांस्यपदक जिंकले आणि देशवासीयांना जल्लोष करण्याची आणखी एक संधी मिळाली. हारकर भी जितने वालों को बाजीगर कहते है! असा एका चित्रपटात डायलॉग आहे. लवलीनाचा बाबतीत हा डायलॉग तंतोतंत लागू पडला. उपांत्यफेरीत पराभूत होऊनही ती शेवटी जिंकलीच त्याअर्थी ती खरीखुरी बाजीगर ठरली. कांस्यपदक विजेत्या बाजीगर लवलीनाचे मनापासून अभिनंदन!