भुसावळ येथे स्वस्त धान्य दुकानदाराकडून आर्थिक लूट - नगरसेवक पिंटू ठाकूर

जनदूत टिम    31-Aug-2021
Total Views |
भुसावळ : शहरातील स्वस्त धान्य क्रमांक दुकान 42 व 43 चे चालक नारायण वाणी यांनी प्रभागातील नागरीकांकडून अन्न सुरक्षा योजनेत नाव समाविष्ट करण्यासाठी दोन हजारांची मागणी करीत लूट चालवली असल्याची तक्रार नगरसेवक महेंद्रसिंग (पिंटू) ठाकूर यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी व अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांकडे केली आहे.
 
bhusa4_1  H x W
 
नगरसेवक पिंटू ठाकूर यांच्या तक्रार अर्जानुसार दुकान चालक वाणी यांनी भुसावळ तहसील कार्यालयातील अधिकारी व पुरवठा अधिकाऱ्यांचे नाव सांगून अन्न व सुरक्षा योजनेत नाव समाविष्ट करण्यासाठी लाभार्थीकडून दोन हजार रुपये उकळले असून अद्यापही बेकायदा वसुली सुरू आहे.
 
या प्रकाराला पायबंद लावण्यासह स्वस्त धान्य दुकान क्रमांक 42 व 43 ची चौकशी करावी तसेच नव्याने सर्वे करून वंचित रेशन कार्ड धारकांचे अन्न सुरक्षा यादीत नाव समाविष्ट करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी तक्रारीची दखल न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा नगरसेवक पिंटू ठाकूर यांनी दिला आहे.