एक बहुआयामी नेतृत्व - श्यामबाबा परदेशी

जनदूत टिम    30-Aug-2021
Total Views |
समाजात अनेक कर्तृत्ववान मोती जन्माला येत असतात. आपल्या कर्तृत्वातून जगाला हेवा वाटावा अशी त्यांची वाटचाल असते. जनसामान्यांना आपलं करून त्यांच्याशी एकरूप होऊन जगणं फार कमी लोकांना जमतं. असेच अगदी विद्यार्थिदशेपासून समाजसेवेचा लळा लागलेले एक नेतृत्व म्हणजे श्याम बाबा परदेशी. श्याम बाबांचं जन्मस्थळ जरी खर्डी असेल तरी त्यांचं कर्तृत्व ते अवघ्या शहापूर तालुक्याला व्यापलेला आहे. त्यामुळेच त्यांना शहापूर तालुक्याच भूषण म्हणून संबोधले जाते. श्याम बाबा परदेशी यांनी अनेक वर्ष सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन जनसेवेचे काम केलं.
 
pardeshi_1  H x
 
खर्डी विभागात महात्मा गांधी तंटामुक्त मोहीम यशस्वी करून दाखवली. जातीय सलोखा अभियान राबवून त्यांनी खर्डी विभागात विचार मोतीच जणू पेरले आहेत. श्याम बाबा परदेशी यांची खर्डी येथील व्यापारी मंडळाचे अध्यक्ष, पंचवीस वर्ष आठवडी बाजार समितीचे अध्यक्ष म्हणून, खर्डी देवालय ट्रस्ट चे विश्वस्त प्रमुख म्हणून ,पंचवीस वर्ष ठाणे जिल्हा महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष म्हणून ,ओबीसी दलित शोषित घटकांचे उत्तम संघटक म्हणून एक यशस्वी वाटचाल आहे. तसेच कार्यकारी सेवा सोसायटीचे उपाध्यक्ष म्हणून, शहापूर तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक म्हणून कार्यरत राहून श्याम बाबांनी शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी योगदान दिलेला आहे.
 
या सगळ्या पदांचा भार सांभाळत जनतेच्या सेवेसाठी वेळोवेळी धावून जाणं. जनतेच्या समस्या जाणून घेणे. श्याम बाबांना अगदी सहज जमतं. श्याम बाबांनी पद मिळवून कधीच त्या पदांचा गर्व मनाशी बाळगला नाही. अगदी जनमाणसात सामान्य होऊन जगत राहिले. प्रत्येक माणसाला आपलंसं करून त्यांच्या मनावरती अभी राज्य गाजवण श्याम बाबांच्या जणू रक्तातच आहे.
खर्डी चा पाणी पुरवठा सोडवण्यास सिंहाचा वाटा श्याम बाबांनी घेतला. पोलीस पाटील म्हणून पंधरा वर्ष सर्वांना सर्वसमावेशक अशी वागणूक दिली. कोरोना च्या भयंकर परिस्थितीत स्वतः प्रकृती शी लढत असताना सुद्धा त्याची पर्वा न करता ग्रामपंचायत आरोग्य व पोलिस यंत्रणेला सोबत घेऊन कोरूना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी खूप झटले.
 
स्वतःच्या मुलीचे लग्न मोठ्या थाटामाटात व्हावं असं कोणत्या बापाला वाटत नाही? पण श्याम बाबा ह्या सगळ्यात अपवाद ठरले. आपल्या लाडक्या मुलीचे लग्न समारंभ मोठ्या प्रमाणात खर्चिक न करता तो पैसा गोरगरीब जनतेला जीवन जगण्यासाठी देऊन सार्थकी लावला. जवळजवळ तीन हजार कुटुंबांना अन्नधान्याचे किट वाटप करून समाजापुढे एक सुसंस्कृत आणि परोपकारीतेचा आदर्श उभा केला. कोरोनामुळे जेव्हा सगळीकडे बंद पाळला गेला तेव्हा अनेक परप्रांतीय आपला मोडका संसार डोक्यावर घेऊन भयभीत होऊन जगण्यासाठी घाबरलेल्या अवस्थेत पायी निघाले होते. त्यांचे अतोनात हाल पाहून श्याम बाबांच्या हृदयाला वेदना झाली आणि त्यांना शक्य होईल याप्रमाणे रस्त्यावर उतरून त्यांच्या मदतीला धावून गेले. रस्त्यावरून जाणाऱ्या त्या प्रवाशांना पाणी व जेवणाची सोय केली आणि श्याम बाबा म्हणजे माणुसकीचा झरा देव माणूस अशा उपमा देण्यासारखं दातृत्व त्यांनी समाजापुढे ठेवला.
 
पण ह्या अशा कर्मयोगी माणसांच्या आयुष्यात नेहमीच आव्हान उभे राहत असतात. श्याम बाबांच्या आयुष्यत देखील शारीरिक प्रकृतीचं एक मोठ आव्हान उभ राहील त्यांच्या हृदयाचे तीन ऑपरेशन झाले तरीही हा माणूस खचला नाही त्यातूनही माणसानं आत्मबल सांभाळत आव्हानांना कसं सामोरं जावं याचे उदाहरण समाजापुढे ठेवल. स्वतः आजारी असताना सुद्धा या माणसानं समाजकार्य सोडलं नाही. हा सेवा यज्ञ आजही सुरू आहे. पक्ष, पंथ, समाज यांना कधीच थारा न देता साळी, माळी, कोळी ,तेली, आदिवासी ,दलित अशा सर्व जातिधर्मातील लोकांना एकत्र आणून, जातीजातीतील वैमनस्य कमी करून श्याम बाबांनी स्वतःचं व्यक्तिमत्व विचारवंत म्हणून फुलवल आहे जनसेवेचे व्रत घेतलेला एक जिगरबाज योद्धा निस्वार्थी व्यक्तिमत्व अशी या माणसाची ओळख आहे. आणि म्हणूनच त्यांचा आदर्श शहापुरातील अनेक नवतरुनाच्या समोर आहे.
 
अशा त्यांच्या या चिकाटीला, त्यांच्या कार्यप्रणालीला, प्रेरणादायी भावी वाटचालीला, वाढदिवसा निमित्ताने लाख लाख शुभेच्छा ईश्वर त्यांना निरोगी व उदंड आयुष्य देवो आणि जगदंबेचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी कायम राहो हीच आमची प्रार्थना