महिला क्रिकेटची तेंडुलकर मिताली राजचा विश्वविक्रम

- श्याम ठाणेदार    05-Jul-2021
Total Views |
भारताची महिला क्रिकेटपटू मिताली राज हिने आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. मिताली राज ही महिलांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणारी क्रिकेटपटू ठरली आहे. तिने इंग्लंडची कर्णधार शेर्लोट एडवर्डला मागे टाकले आहे. मिताली राज हिने महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक १०, ३३७ धावा करून इंग्लंडची कर्णधार शेर्लोट एडवर्डचा १०,२७३ धावांचा विक्रम मागे टाकला आहे.
 
mithali-raj-37_1 &nb
 
३८ वर्षीय मितालीने काही दिवसांपूर्वीच भारताचा महान माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या विक्रमाशी बरोबरी करताना सर्वाधिक काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी क्रिकेटपटू ठरली. मिताली राज ही गेली २३ वर्ष आंतराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. तिचा हा विक्रमही खूप मोठा आहे कारण इतकी वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणे सोपे नाही त्यासाठी जबरदस्त फिटनेस आणि सातत्य हवे असते. इतकी वर्ष स्वतःचा फॉर्म टिकवून ठेवणे सोपे नाही मितालीने ही गोष्ट साध्य केली आहे. मितालीचे हे विश्वविक्रम कौतुकास्पद असेच आहेत. अनेक आजी माजी दिग्गज खेळाडूंनी तिचे या विश्वविक्रमाबद्दल कौतुक केले आहे.
 
विश्वविक्रमाबद्दल मितालीचे जितके कौतुक करावे तितके कमी आहे. भारतात महिला क्रिकेटला लोकप्रिय करण्यात मिताली राजचा मोठा वाटा आहे. भारतात महिला क्रिकेट दुर्लक्षितच होते. महिला क्रिकेटला कोणीही गंभीरतेने घेत नव्हते. २६ जून १९९९ रोजी मितालीने आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला. त्याला आज २३ वर्ष पूर्ण झाली आहेत. इतकी वर्ष क्रिकेट खेळणे, आपला फॉर्म टिकवणे, फिटनेस राखणे सोपे नाही मितालीने ते साध्य केले याबाबतीत मिताली राजची तुलना फक्त सचिन तेंडुलकर यांच्याशीच होऊ शकते. सचिन तेंडुलकर यांचे पुरुषांच्या क्रिकेटमध्ये जे योगदान आहे तेच योगदान मिताली राजचे महिला क्रिकेटसाठी आहे. सचिन प्रमाणेच मितालीनेही लहान वयातच भारतीय क्रिकेटची धुरा सांभाळली.
 
सचिनप्रमाणेच मितालीनेही सोळाव्या वर्षीच भारतीय संघात प्रवेश मिळवला. म्हणूनच मितालीला महिला क्रिकेटची तेंडुलकर असे म्हणतात. सर्वाधिक काळ भारतीय क्रिकेटची कर्णधार राहिलेल्या मिताली राजचा जन्म राजस्थानमधील जोधपूर येथे झाला. तिचे कुटुंब मूळचे तामिळी. तिचे वडील डोराज राज हे इंडियन एअर फोर्स मध्ये अधिकारी होते त्यामुळे त्यांची सारखी बदली व्हायची त्यांच्या वडिलांची हैदराबादला बदली झाल्यानंतर हे कुटुंब तिथेच स्थायिक झाले. मिताली राजचे शिक्षणही हैदराबाद येथेच झाले. तिथे तिने दहा वर्षाची असतानाच क्रिकेट खेळायला सुरवात केली. स्थानिक क्रिकेटमध्ये अप्रतिम कामगिरी करून १९९९ मध्ये भारतीय क्रिकेट संघात प्रवेश मिळवला. आर्यलंड विरुद्ध तिने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. पहिल्याच सामन्यात तिने तडाखेबंद नाबाद ११४ धावा केल्या. म्हणजे पदार्पणाच्या पहिल्याच सामन्यात तिने शतकी खेळी केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दमदार पदार्पण केल्यापासून मितालीने मागे वळून पाहिले नाही.
 
२००१ मध्ये मितालीने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. १९ ऑगस्ट २००२ या दिवशी मितालीने कसोटीत द्विशतक झळकावले. कसोटीत द्विशतक झळकावणारी मिताली ही पहिलीच महिला खेळाडू ठरली. यावेळी ती अवघ्या १९ वर्षाची होती. कसोटी, एकदिवसीय आणि टी २० या तिन्ही प्रकारांमध्ये मितालीने आपला दबदबा निर्माण केला आहे. आज ती भरताचीच नाही तर जगातील सर्वाधिक यशस्वी फलंदाज बनली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढून ती आज यशाच्या शिखरावर पोहचली आहे. तिच्या या कामगीरीने देशवासीयांची छाती अभिमानाने फुगली आहे. मिताली राजचे विश्वविक्रमाबद्दल मनापासून अभिनंदन!