प्रवीण महाजन यांना महाराष्ट्र शासनाचा जलभूषण पुरस्कार जाहीर

जनदूत टिम    11-Jul-2021
Total Views |
नागपूर : नागपूरचे सामाजिक कार्यकर्ते व जलअभ्यासक प्रवीण महाजन यांना राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांच्या स्मृत्यर्थ दिला जाणारा ‘जलभूषण पुरस्कार’ महाराष्ट्र शासनाकडून जाहीर करण्यात झाला आहे. जलसंपदा, मृद व जलसंधारण तसेच पाणी पुरवठा व स्वच्छता या क्षेत्रात रूट लेव्हलवर उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तिंना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. ‘जलक्रांतीचे जनक’ महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री डॅा. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीच्या पूर्व संध्येला दि. १३ जुलै रोजी मुबंईत मुख्यमंत्री ना. श्री उध्दव ठाकरे यांचे हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार असून, या समारंभासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्री अशोक चव्हाण, जलसंपदा मंत्री ना. श्री जयंत पाटील, जलसंपदा राज्यमंत्री ना. श्री बच्चू कडू, मुख्य सचिव श्री सिताराम कुंटे, जलसंपदा सचिव लाक्षेवि श्री अजय कोहीरकर व जलसंपदा सचिव प्रकल्प समन्वयक श्री ता. ना. मुंडे यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. या पुरस्काराने समाजात पाण्याचे महत्व व कार्याला निश्चितच गती मिळेल. तृतीय पुरस्काराचे स्वरूप हे रोख रूपये 2 लक्ष प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह असे आहे.
 
pravin mahajan_1 &nb
 
प्रवीण महाजन हे गेल्या २८-३० वर्षापासून पाणी या क्षेत्रात सातत्याने प्रबोधन कार्य करीत आहे. जागल्याच्या भूमिकेतून त्यांची अनेक कार्ये चालू आहे. लोकसंवाद, लोक शिक्षण व लोकसहभाग या माध्यमातून जलजागृती. सातत्याने जलकार्य लेखन. शेतक-याच्या बांधापर्यन्त पाणी पोहचावे यासाठी करीत असलेले कार्य, भविष्यातील पाण्याची उपलब्धता व पाणी वापर यातील तूट भरून काढण्यासाठी वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाची मागणी व मंजुरी पर्यन्तचा पाठपुरावा. गाळयुक्त शेती आणि गाळमुक्त धरण या संकल्पनेतून कार्य. गोसीखुर्द सुप्रमातील अयोग्य पायंडे बंद करून नियमित पध्दतीने सुप्रमा मंजुरीसाठी त्यांचे प्रयत्न राहिलेत. नंतरच्या काळात महाराष्ट्र राज्यात तीच पध्दत शासनाने स्वीकारल्याने मंaजूर झालेले अगणित सुप्रमाने अडगळीत पडलेले प्रकल्प पूर्णत्वाकडे पोहचले ही प्रवीण महाजनाच्या कार्यांची पावती आहे. नुकतेच १४ हजार कोटीच्या रेती निविदा असो की जिंगांव निविदा असो, जेथे अनियमितता असते तेथील अनिमियतता समोर आणून शासनाचे १५-२० हजार कोटी पेक्षा जास्त रक्कम वाचविण्याचे सत्कार्य प्रवीण महाजन यांच्या हातून घडले. यातूनच त्यांच्या कार्याची कार्यपध्दती दिसते.
 
सुक्ष्म सिंचन पध्दत विभागाने स्वीकारावी यासाठीचा त्यांचा रेटा, आज काही प्रकल्पां संदर्भात दिसून आला आहे. उपलब्ध पाण्यात जर शेती करायची असेल, तर पीक पध्दतीत बदल केल्याशिवाय पर्याय नाही, पिण्यासाठी पाण्याची कमतरता असताना, सिंचनासाठी जर पाणी आपण उपलब्ध करू शकलो नाही तर येत्या काही वर्षात उदभवणारी परीस्थिती गंभीर असणार आहे. उद्बोधन व उपाय यावरील कार्य, बोअरवेल व ओपनवेलला जल पुनर्भरण केल्यास पाणी पातळी उंचावते याबाबतचे जनजागृती कार्य. महाराष्ट्र राज्यातील सर्वच सरकारी कार्यालय परिसरात रेन वॅाटर हार्वेस्टिंग योजना असावी यासाठीचे प्रयत्न. पाणी वापर संस्थेचे जाळे अधिक विस्तारून सहकार पध्दतीने पाणी वापर करणे यासाठीच्या कार्यशाळेसाठीचा पुढाकार व नियोजन. शेतकरी मेळावे. सांडपाणी व्यवस्थापन यासाठी जल तज्ज्ञांची व्याख्याने आयोजनातील पुढाकार. “एक थेंब पाण्याचा” हा पाणी विषयक माहीती पट, जलसंपदा काल, आज आणि उद्या या संदर्भ ग्रंथाची निर्मिती. नागपूरातील अंबाझरी तलावांचे मजबुतीकरण व सौंदर्यीकरण यासाठीचा लढा, अश्या अनेक उपक्रमांमधून त्यांनी, जपून पाणी वापरा, पाणी वाचवा असा संदेश देत भरघोस कार्य केलेले आहे. आज त्यांना महाराष्ट्र शासनाने जलभूषण पुरस्कार जाहीर करून त्यांच्या कार्यांची दखल घेतली आहे.