विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक ६ जुलैला

01 Jul 2021 11:59:13
मुंबई : नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे गेले पाच महिने रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आगामी दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनात होणार आहे. अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार असून संग्राम थोपटे यांच्याबरोबरच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाचीही या पदासाठी चर्चा आहे. ६ जुलैला निवड होणार आहे.
 
Vidhanbhavan_1  
 
विधानसभा निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या महाविकास आघाडीच्या सत्तावाटपात विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडे आहे. नाना पटोले यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती; परंतु मध्यंतरी संघटनात्मक बदल करताना पटोले यांच्याकड़े प्रदेशाध्यक्षपद सोपवण्याचा निर्णय झाल्याने त्यांनी ५ फेब्रुवारीला विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. अर्थसंकल्पीय अधिवेशनात नवीन अध्यक्षाची निवड करण्याचा काँग्रेसचा आग्रह होता. पण कोरोनाच्या संसर्गामुळे आमदारांची उपस्थिती कमी असल्याने ही निवडणूक घेतली गेली नव्हती.
 
पावसाळी अधिवेशनही. अवघ्या दोन दिवसांचे होणार असल्याने यावेळी तरी निवडणूक होणार का? अशी शंका व्यक्त होत होती; परंतु अलीकडच्या काळात सुरू असलेल्या गाठीभेटींमुळे अस्वस्थ झालेल्या काँग्रेसने याच अधिवेशनात निवडणूक घ्यावी,
अशी ठाम भूमिका घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या चर्चेनंतर अखेर याच अधिवेशनात अध्यक्षांची निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून सोमवारी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी याची घोषणा होण्याची शक्यता आहे. सरकारकडून याबाबतचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवून त्यांच्या औपचारिक मान्यतेनंतर ही प्रक्रिया सुरू होईल.
 
आघाडीकडे पुरेसे संख्याबळ
सर्वसाधारण परिस्थितीत विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक बहुतांश वेळा बिनविरोध होते; पण आघाडीतील सध्याच्या कुरबुरी पाहता भाजपा आपला उमेदवार उतरवणार का?
याबाबत उत्सुकता आहे. आघाडीकडे १७१ आमदारांचे पाठबळ असल्याने निवडणूक झाली तरी फारशी अडचण येणार नाही. अधिवेशनाला उपस्थित राहण्याबाबत शिवसेनेने आमदारांसाठी व्हिप जारी केला आहे. दोन्ही काँग्रेसकडूनही व्हिप जारी केला जाणार आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मात्र भाजपा व्हिप काढणार नसल्याचे आज स्पष्ट . केल्याने अध्यक्षपदासाठी प्रत्यक्ष मतदान होणार नाही, असे संकेत मिळत आहेत.’
 
थोपटे यांचे नाव आघाडीवर
अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून संग्राम थोपटे यांचे नाव आघाडीवर आहेत. माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे अनुभवी नेते पृथ्वीराज चव्हाण यांसह ऊर्जामंत्री नितीन राऊत, आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांच्याही नावांची चर्चा होती; परंतु पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला राष्ट्रवादीची फारशी अनुकूलता नाही. तर मंत्रिमंडळात कुठलेही फेरबदल करण्याला काँग्रेस नेतृत्व फारसे उत्सुक नाही. त्यामुळे थोपटे यांचे नाव अंतिम होण्याची
शक्यता आहे.
Powered By Sangraha 9.0