नैसर्गिक शेतीतून भाताच्या दहा जातींचे संवर्धन

जनदूत टिम    01-Jul-2021
Total Views |

  • चिंचघरी येथील हेमंत फाटक यांच्या प्रयत्नांना यश

रत्नागिरी : नैसर्गिक पद्धतींचा अवलंब करीत रत्नागिरी तालुक्यातील चिंचघरी येथील हेमंत फाटक यांनी गेली पाच वर्षे भाताच्या विविध जातींचे संवर्धन करणारा शेतकरी म्हणून नाव मिळवले आहे. अधिक उत्पादनापेक्षा कसदार आणि दर्जेदार तांदूळ उपलब्ध करण्याचा ध्यास त्यांनी घेतला आहे. नैसर्गिक शेती व्यवस्थापनातून ही शेती त्यांनी यशस्वी केली.
 
hemany44_1  H x
 
रासायनिक खतांमुळे मनुष्याच्या आरोग्यावर होणारा परिणाम लक्षात घेऊन त्यांनी हा वसा घेतला आहे. इंद्रायणी, वाडाकोलम, घनसाळ, काळा भात, सारथी, खारल (स्थानिक लाल भात), दोडक (लाल भात), रत्नागिरी ७ आणि यंदा प्रथमच लागवड केलेले डायबेटिस रुग्णांसाठी उपयुक्त असे भात अशा दहा जातींचे ते संवर्धन करत आले आहेत. डायबेटिससाठीच्या भाताचा तांदूळ १५० रुपये किलोने विकला जात असल्याचे फाटक यांनी सांगितले. शेतीची आवड असल्यामुळे १९८२ साठी दहावीनंतर शिक्षणाला रामराम केला. वडिलोपार्जित शेतीमध्ये त्यांनी लक्ष घालण्यास सुरुवात केली. पूर्वी वाघसाळ जातीच्या भात बियाण्याचा वापर करून शेती केली जात होती.
 
कालांतराने कोकण कृषी विद्यापीठाकडून तयार केलेल्या बियाण्यांचाही वापर केला. उत्पादनासाठी रासायनिक खतांसह सेंद्रिय पद्धतीचाही अवलंब केला. जमिनीचा कस आणि आरोग्यासाठी रासायनिक खत त्रासदायक असल्याचे लक्षात आल्यानंतर विषमुक्त अन्नासाठी नैसर्गिक शेती व्यवस्थापन पद्धत प्रत्यक्षात आणली. यामध्ये कंपोस्ट, गांडूळ खताचा वापरत नाहीत. घन जिवामृत, जिवामृत व आंबट ताकाचा ते वापर करतात. अडीच एकर जमिनीमधून वर्षाला सुमारे ५०० किलो तांदूळ मिळतो. तांदूळ किंवा भातासाठी १०० रुपये किलो दर मिळतो. पूर्णतः नैसर्गिक शेती करत असल्याने प्राणी व पक्ष्यांचा त्रासही तेवढा आहे. तरीही त्यावर मात करत शेती करत असल्याचे त्यांनी सांगितले.