नवी मुंबई विमानतळाला नामांतर वादाविषयी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

विठ्ठल ममताबादे    09-Jun-2021
Total Views |

  • लोकनेते दि.बा पाटील यांचे नाव विमानतळाला देण्यात यावे अशी मागणी करत ऍडव्होकेट नित्यानंद ठाकूर यांनी दाखल केली जनहित याचिका 

उरण : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते, लोकनेते दि. बा. पाटील साहेब यांचे नाव दिले गेले पाहिजे, अशा मागणीसाठी पनवेल तालुक्यातील कोपर (गव्हाण) येथील ॲड. नित्यानंद राम ठाकूर यांनी ०८ जून रोजी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.

navi-mumbai-airport_1&nbs 
 
आंतरराष्ट्रीय विमानतळाला सुरुवात झाली तेव्हापासून, स्थानिक भूमिपुत्रांचे नेते माजी खासदार दि. बा. पाटील यांचे नाव या विमानतळाला देण्यात यावे, अशी मागणी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आदी जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधी, प्रकल्पग्रस्त शेतकरी, कष्टकरी जनता सुरुवातीपासून करीत आहे. त्याबाबतचा पत्रव्यवहार राज्य व केंद्र सरकारकडे करण्यात आला आहे. असे असताना अचानकपणे १७ एप्रिल रोजी सिडकोच्या संचालक मंडळाने लोकभावनेचा विचार न करता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर केला. त्यामुळे सर्व जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त, शेतकरी, कष्टकरी जनतेत प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
 
“२ जानेवारी २०१५ रोजी खासदार कपिल पाटील यांनी लोकभावनेचा विचार करून लोकसभेत ही मागणी केली. त्या संबंधीचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे. तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे तत्कालीन अध्यक्ष व सध्याच्या मंत्रीमंडळातील सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे दि. बा. पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव दिला असता त्यांनी तो तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे १९ जून २०१८ रोजी पाठवला. देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा तो प्रस्ताव उचित कार्यवाही करण्याच्या सूचनेसह प्रधान सचिव (विमानचालन) यांच्याकडे पाठविला होता. तसे ७ जुलै २०१८ रोजी अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्र्यांनी लेखी कळविलेही होते. तसेच अनेक स्थानिक आगरी-कोळी आणि दहा गाव संघटनांच्या वतीने सिडकोकडेही मागणीही केली होती. पण ही लोकभावना लक्षात न घेता सिडकोने आता जी कृती केली आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांमध्ये सिडकोविरुद्ध तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे”,
 
इथल्या भुमिपुत्रांना, प्रकल्पग्रस्तांना, कष्टकरी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आपले संबंध आयुष्य वेचले आहे. १९८४ साली शेतकऱ्यांच्या जमिनीला योग्य भाव मिळावा यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या व साऱ्या देशभर गाजलेल्या शौर्यशाली लढ्यातून शेतकऱ्यांना साडेबारा टक्के विकसित जमिन देण्याचे तत्त्व जे प्रस्थापित झाले ते पुढे संबंध महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना लागू झाले. त्यामुळे दि. बा. पाटील हे साऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे व प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते होते.
आपल्या बुलंद आवाजाने महाराष्ट्र विधीमंडळात तसेच खासदार म्हणून दिल्लीच्या सार्वभौमत संसदेत शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न त्यांनी पोटतिडकीने मांडले.
 
मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी आणि त्यानंतर ओबीसी समाजात जागृती करण्यासाठी त्यांनी सारा महाराष्ट्र पिंजून काढला. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, सीमाप्रश्न अशा अनेक जनलढ्यात त्यांनी हिरहिरीने भाग घेवून तुरुंगवास भोगला आहे. त्यामुळे त्यांचे हे कार्य नव्या पिढीला स्फूर्तीदायी ठरावे यासाठी त्यांच्या कर्मभूमीत त्यांची स्मृती जागृत राहावी यासाठी नवी मुंबईत होत असलेल्या विमानतळाला त्यांचेच नाव द्यावे, अशी मागणी सर्व पक्षाच्या नेत्यांनी, सामाजिक संघटनांनी तसेच प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी केली असताना, पनवेल तालुक्यातील कोपर गव्हाण येथील ॲड नित्यानंद राम ठाकूर यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.