मेट्रो-२ अ, मेट्रो-७ प्रकल्पाचा नऊ लाख प्रवाशांना फायदा होणार

08 Jun 2021 12:34:01

  • मुंबई उपनगरातील प्रवास आणखी सुखकर अन् वेगवान

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) सुरू असलेले ‘मेट्रो-२ अ’ आणि ‘मेट्रो-७’ प्रकल्प चाचणीच्या पर्वात आहेत. या दोन्ही मार्गावर पुढील चार महिने चाचण्या होऊन ऑक्टोबर महिन्यात प्रवाशांच्या सेवेत मेट्रो दाखल होण्याची शक्यता आहे. 
 
09_09_2019-mumbai_metro_1
 
रस्ते आणि लोकलवरील ताण कमी होऊन पश्चिम उपनगरातील प्रवास वेगवान होण्यास मदत होणार आहे. या दोन्ही मेट्रो प्रकल्पांमुळे अंधेरी ते दहिसर पट्ट्यातील नऊ लाख प्रवाशांना जलद प्रवास सेवा उपलब्ध होणार आहे. डहाणूकरवाडी ते आरे स्थानकांदरम्यानच्या मार्गिकांच्या चाचणीचा आरंभ ३१ मे रोजी करण्यात आला. मेट्रोच्या सहा डब्यांची एका रेकद्वारे चाचणी सुरू राहणार आहे.
 
पुढील चार महिने सिग्नलिंग, टेलिकॉम आणि प्लॅटफॉर्म स्क्रीन डोअरसह एकत्रीकरणाची चाचपणी वेगवेगळ्या सुरक्षा चाचण्यांसह केली जाणार आहे. चालकविरहीत ट्रेनशी अनुकूलता, ऊर्जा वाचवणारी पुनरुत्पादक ब्रेक सिस्टम, प्रत्येक बाजूला - चार दरवाजांची स्टेनलेस स्टील बॉडी आणि प्रवाशांना सायकलसह प्रवास करता येऊ शकेल, असे मेट्रोचे फायदे आहेत.
 
बीईएमएल (बेंगळूरु), हिताची (जपान) यांच्या तांत्रिक सहकार्यान मेट्रोचे सेट तयार केले जात आहेत. या ट्रेनची कमाल वेगमर्यादा ८० किलोमीटर प्रतितास अशी असणार आहे. मेट्रो-२ अ आणि मेट्रो ७ या दोन्ही प्रकल्पांतून दररोज सुमारे नऊ लाख प्रवासी प्रवास करतील, असे मेट्रो प्रशासनाकडून सांगण्यात आले. दोन्ही प्रकल्पांच्या मेट्रोचे एसी कोच, स्वयंचलित दरवाजे, प्रत्येक डब्यात फायर फायटिंग यंत्रणा, सीसीटीव्ही कॅमेरे, प्रवाशांना मदतीसाठी डब्यात स्वीच, प्रत्येक डब्यात दोन सायकल ठेवण्याची यंत्रणा आदी सुविधा असणार आहेत.
 
मेट्रो-२ अ
  • कॉरिडोर - दहिसर पूर्व ते डी.एन. नगर
  • लांबी-१८.६ कि.मी.
  • आगार-चारकोप
  •  एकूण स्थानके-अंधेरी (पश्चिम), लोअर ओशिवरा,ओशिवरा, गोरेगाव (पश्चिम), पहाडी गोरेगाव, लोअर मालाड, मालाड (पश्चिम),वळनाई, डहाणूकर वाडी, कांदिवली (पश्चिम),पहाडी एकसर, बोरिवली (पश्चिम), एकसर, मंडपेश्वर, कंदरपाडा, अप्पर दहिसर आणि दहिसर (पूर्व)
  • खर्च-६ हजार ४१० कोटी

    मेट्रो-७
    • कॉरिडोर-अंधेरी ते दहिसर
    • लांबी-१५.५ कि.मी.
    • आगार-चारकोप
    • एकूण स्थानके-गुंदवली, मोगरा, जोगेश्वरी (पूर्व), गोरेगाव (पूर्व), आरे, दिंडोशी, कुरार, आकुर्ली, पोईसर,मागठाणे, देवीपाडा, राष्ट्रीय उद्योग आणि ओवरीपाडा
    • खर्च-सहा हजार २०८ कोटी
Powered By Sangraha 9.0