पालीतील भव्य क्रीडा संकुलाचे पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन

30 Jun 2021 12:22:03

  • सुधागडातील खेळाडूंमध्ये आनंदाचे वातावरण

पाली/गोमाशी : पालीतील भव्य क्रीडा संकुलाचे उद्घाटन पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते सोमवारी (ता.28) झाले. मागील अनेक वर्षांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेले क्रीडा संकुल अदिती तटकरे यांच्या पुढाकाराने सुरू झाले असल्याने येथील उदयोन्मुख खेळाडू व क्रीडाप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे.
 
pali44_1  H x W
 
यावेळी अदिती तटकरे यांनी बॅडमिंटन खेळले, तसेच परिसरात वृक्षारोपण देखील केले. सुधागड मधील खेळाडूंनी आपल्या अंगभूत कलाक्रीडा गुण व कौशल्याने राज्य व राष्ट्रीय पातळीवर जिल्ह्याचे नावलौकिक केले याचा सार्थ अभिमान असल्याचे आदिती तटकरे यावेळी म्हणाल्या. आदिवासी बहुल, दुर्गम व ग्रामीण भागात क्रीडाविषयक अत्याधुनिक साहित्य व प्रशिक्षणाचा अभाव असतो, मात्र येथील खेळाडू अपार कष्ट, जिद्द व सरावाच्या जोरावर क्रीडा क्षेत्रात दैदिप्यमान यश संपादन करीत आहेत. आता खेळाडूंना आवश्यक त्या सोयीसुविधा, साधने व प्रशिक्षण मिळणार असल्याने येथील खेळाडू येत्या काळात अधिक चमकदार कामगिरी करतील असा विश्वास देखील पालकमंत्री तटकरे यांनी व्यक्त केला. निसर्ग व तौक्ते चक्री वादळाने क्रीडा संकुल इमारतीचे प्रचंड नुकसान झाले होते, अशातच मुदत देऊन जलदगतीने इमारत दुरुस्तीचे काम पूर्ण केले.
 
भविष्यात या इमारतीत शासन नियमावलीच्या अधीन राहून देखभाल व दुरुस्तीच्या कामी आवश्यक निधीसाठी काही कार्यक्रम घेण्यास परवानगी दिल्यास अधिक उपयुक्त ठरू शकेल अशी सूचना तटकरे यांनी दिली. तालुका क्रीडा संकुलाचे उदघाटन पार पडल्यानंतर येथील खेळाडूंना कोरोना नियमांचे पालन करून सरावासाठी संकुल उपलब्द व्हावे असेही ना.तटकरे यांनी सूचित केले.त्यांनतर आदर्श क्रिडा शिक्षक सभाजी ढोपे यांचा विशेष सत्कार पालकमंत्री आदितीताई तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी जि. प .सदस्य सुरेश खैरे यांनी देखील आपले विचार मांडले.
 
पालीतील जनतेच्या सदृढ व निरोगी आरोग्यासाठी पालीत अद्ययावत व्यायामशाळा उपलब्द व्हावी अशी मागणी पाली सुधागड तहसीलदार दिलीप रायण्णावार यांनी पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याकडे केली. याबरोबरच लवकरच मरोथॉन स्पर्धा आयोजित करणार असल्याने रायन्नावार यांनी स्पष्ट केले. उद्घाटन कार्यक्रमास पालकमंत्री अदिती तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रायगड जिल्हा महिला अध्यक्षा गीता पालरेचा, जि. प .सदस्य सुरेश खैरे, रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती अंकिता मयेकर, उपविभागीय अधिकारी डॉ. यशवंत माने, तहसीलदार दिलीप रायण्णावार, संदेश शेवाळे, अभिजित चांदोरकर, आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडू आदी मान्यवर उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0