साहेब, द्याना टोचून लस

- अभिजित देशमाने, न्यू इंग्लिश स्कूल पोफळी    11-Jun-2021
Total Views |
गावात मोबाईल रेंज नसते आणि तुमचं काय ते ऑनलाइन फिनलाईन नाही जमत आपल्याला. बघा जरा काय होतय का” गेले काही दिवस हा डायलॉग दिवसातून दोनचार वेळातरी ऐकायला मिळायचाच. खरं तर त्या वयोवृद्ध लोकांच्या तोंडातून आपल्याला साहेब हा शब्द ऐकताना सुद्धा खूप वाईट वाटायचं, आम्ही तरी कोण? त्यांच्यामधीलच एक, त्यांना मदत करायला म्हणूनच सरकारने आमची नेमणूक केली होती.
 
vaccine55_1  H  
 
कोरोना आला- नवीन नवीन निर्बंध लागू झाले, लसींचा शोध लागला, लसीकरण सुरू झालं आणि त्याबरोबर आल्या त्या सरकारी कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या ड्युट्या. कोरोना ड्युटी म्हणलं की भीती वाटायची. कारण या ड्युट्या पण अशा विचित्र असायच्या, कुठे कशेडी घाटात तर कुठे कुंभार्ली घाटमाथ्यावर, दिवसा पण रात्री पण, पावसात सुद्धा आणि उन्हात सुद्धा. अशा अनेक ड्युट्या केलेले लोक समोरून पाहिले होते. त्यांचे अनुभव- त्यांचे किस्से ऐकले होते. त्यामुळे या कोरोनाच्या ड्युटीपासून चार हात लांब राहिलेलं बरं असं वाटायचं. पण शेवटी सरकारी नोकरी त्यामुळे ड्युटी कधी ना कधीतरी यायचीच. आणि 31 मे ला मेसेज आला आणि ड्युटी आली. ती पण कुठे तर चिपळूणच्या एल टाइप शॉपिंग सेंटरला लसीकरण केंद्रावर. लसीकरण म्हणजे गर्दी, कोण कुठला माणूस कसा असेल काय सांगावं. पण कर्तव्य म्हणून एक तारखेला हजर झालो. काम तसं फारसं विशेष नव्हतं. कॉम्प्युटरला माहिती ऑनलाईन केली की ती व्यक्ती आमच्याकडे यायची, त्याचं नाव - व्यवसाय - वय रजिस्टर मध्ये नोंद करायचे आणि त्यांना टोकन द्यायचं. टोकन घेऊन ती व्यक्ती लसीकरणासाठी पुढे जायची. तिथेच आमच्यातला एक माणूस बसलेला असायचा. तो टोकन घ्यायचा, पुन्हा रजिस्टरला नाव - पत्ता - वय लिहून घ्यायचा आणि पुढे लसीकरणाला पाठवायचा. विशेष जबाबदारीचं काही काम नव्हतं. पहिल्या दिवशी कोव्हीशिल्डचे चारशे डोस होते. सकाळी नऊ वाजता सुरू झालेलं काम संध्याकाळी सात वाजता संपलं. बरेच दिवसांनी काम केल्यामुळे खरंतर खूप दमायला झाल्यासारखा वाटलं. घरी आल्यानंतर शांत झोप लागली. दुसऱ्या दिवशी लसीकरण नसल्यामुळे सुट्टी पुन्हा तिसऱ्या दिवशी लसीकरण ड्युटी. एकूण दहा दिवसांच्या कालावधीमध्ये पाचच दिवस प्रत्यक्ष कामकाज झाले. या १० दिवसांच्या कर्तव्यकाळात अनेक अनुभव आले काही चांगले, काही कटू आणि काही आश्चर्यकारक सुद्धा.
 
दिनांक सात जून - त्यादिवशी कोव्हॅक्सीनचा दुसरा डोस होता, कुपन आदले दिवशीच वाटलेली होती, दुपारी २-२.३० च्या दरम्यान एक तरुण आला. नोंदणी करताना कळले की तो कुवेत ला जॉब ला होता, सुशिक्षित होता, नोंदणी करताना त्याने विचारले, “सर, मला या डोसनंतर कोव्हीशिल्डचा डोस घेता येईल का?” मी याबाबत त्याला वैद्यकीय अधिकाऱ्यांशी बोलायला सांगितलं आणि टोकन दिले. थोड्यावेळाने बघितलं तर तो मुलगा टोकन घेऊन बाहेर घुटमळत होता. त्याने अजून लस घेतली नव्हती. मी त्याला सहज विचारलं “काय रे, लस नाही घेतलीस?” तो म्हणाला “नाही अजून”. त्याने मला विचारलं “सर एक विचारू का, लोक म्हणतात, ही दुसरी लस घेतल्यावर दोन वर्षांनी माणसाची डेथ होणार”. त्याचं हे वाक्य ऐकून पहिल्यांदा मला हसायलाच आलं. मी त्याला म्हणलं, “अरे दादा, कोरोना येऊन अजून दोन वर्षे झालेली नाहीत. लस तर आत्ता सहा महिन्यांपूर्वी आलीय. मग हे २ वर्षानंतरचं भविष्य कोणी सांगितलं”. तर तो म्हणाला, त्या दाभोळमध्ये घरोघरी सांगताहेत की यात डेड व्हायरस वापरलाय, म्हणून जो कोणी ही लस घेईल त्याची दोन वर्षांनी डेथ होणार”. मग त्याला बरंच समजावलं आणि त्याला बहुतेक पटलंदेखील म्हणून त्याने शेवटी दुसरा डोस घेतला.
 
रोज लसीकरणासाठी राजकीय सामाजिक तसेच विविध क्षेत्रातील अनेक व्यक्ती येत असत. बहुतेक सर्वजण व्यवस्थेविषयी समाधानी वाटत होते. बरेच जण त्याविषयी कौतुकदेखील करत. आमच्या चहा-नाश्त्याबाबत चौकशी करत, अगदी स्वखुशीने चहा-नाश्ता देण्याची इच्छादेखील व्यक्त करत. पण खरं तर त्याच्या चेहऱ्यावरचं समाधानच आमच्यासाठी लाखमोलाचं असायचं.
३-४ तास रांगेत उभं राहून आपला नंबर आल्यावरदेखील काही तांत्रिक कारणांमुळे जर लसीकरण होत नसेल तर चिडचिड तर होणारच. असंच झालं, ८५ वर्षांच्या आपल्या वडिलांना घेऊन एक इसम लसीकरणासाठी आला, त्या आजोबांनी आधारकार्ड आणलेलं नव्हतं. त्यांना सांगण्यात आलं की आधारकार्ड नंबर नमूद केल्याशिवाय सर्टिफिकेट जनरेट नाही करता येणार, तर तो मुलगा वाद घालू लागला, आम्ही पॅनकार्ड ने लॉगइन केले आहे, आधारकार्ड कशाला पाहिजे, त्याला समजावले तरी तो काही केल्या ऐकेना, शेवटी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीसांनी सांगितले तेंव्हा तो शांत झाला, घरी जाऊन आधारकार्ड आणले आणि आजोबांचं लसीकरण झालं. पण अशावेळी कमाल वाटते ती तिथल्या कॉम्प्युटर ऑपरेटर महिलांची आणि नर्सेसची. अतिशय संयमाने त्या परिस्थिती हाताळत होत्या.
 
याचकाळात सोशल मीडियामध्ये एक पोस्ट फिरत होती, लसीकरण करताना अनेकवेळा व्हाईल(बाटली) मध्ये लस शिल्लक राहते, आणि ती शेवटी वाया घालवली जाते, पण माझ्या कर्तव्यकाळात मला लसीचा एक थेंबही वाया गेलेला दिसला नाही. अगदी ठरलेल्या डोसनंतरदेखील व्हाईलमध्ये लस शिल्लक असल्यास अचानक आलेल्या आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर किंवा एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला लस दिली जात होती.
 
आपल्याकडे लसीकरणासाठी अजूनदेखील व्यापक प्रमाणात जनजागृतीची गरज आहे. विशेषकरून ग्रामीण भागात लसीकरणांच महत्व जोपर्यंत पटत नाही तोपर्यंत लसीकरणाचा उद्देश सफल होणं कठीण आहे.
सरकारी नोकरीमुळे मला या व्यवस्थेचा भाग व्हायची संधी मिळाली. या उपक्रमाची नव्याने ओळख झाली. शासनस्तरावर लसीकरणासाठी उत्तम प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रशासनाबरोबर आपणदेखील आपली जबाबदारी समजून यामध्ये सहभाग नोंदवला पाहिजे. स्वतः तर लस घेतली पाहिजेच शिवाय लस न घेतलेल्या किंवा न घेऊ इच्छिणाऱ्या किमान एका व्यक्तीलातरी लस घेण्यास प्रोत्साहित करून लस घेण्यास मदत करावी. खरं तर केवळ १० दिवस लसीकरण केंद्रावर जुजबी काम करून आपण कोव्हीड योद्धे होऊ शकत नाही याची मला पूर्ण जाणीव आहे. तिथे निरंतर काम करणारे नगरपालिकेचे कर्मचारी, नर्सेस, पोलीस कर्मचारी यांनाच हे पद शोभून दिसतं. या सर्वांच्या कार्याला माझा सलाम आणि या व्यवस्थेच्या अंगाचा एक भाग होण्याची संधी दिलीत याकरिता प्रशासनाचे आभार.....