जव्हारच्या संस्थान कालीन शालिमार हॉटेल होणार इतिहासजमा.!

पारस सहाणे    11-Jun-2021
Total Views |

  • ऐतिहासिक पाऊलखुणा पुसल्या जाणार
  • सार्वजनिक बांधकाम विभागाने केले पाडकाम सुरू

जव्हार : वर्तमान काळातील तहसीलदार कार्यालय असलेल्या संस्थान कालीन “ शालिमार हॉटेलचे पाडकाम नुकतेच जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. त्यामुळे जव्हारच्या संस्थान कालीन पाऊलखुणा पुसल्या जाणार असून इमारत इतिहासजमा होणार आहे तहसील कार्यालयाचे पाडकाम सुरू असल्याने जव्हारकारांनी आठवणींना उजाळा दिला आहे
जगामध्ये ‘जव्हार’ हे एकमेव संस्थान असे आहे की, ज्यामध्ये सलग ६३२ वर्षे एकाच कुटुंबाकडे राजसत्ता अबाधित राहिली आहे.
 
javhar44_1  H x
 
इंग्लंड, रशिया, जर्मन, फ्रान्स किंवा कुठलीही राज्यसत्ता १८० वर्षांपेक्षा अधिक काळ टिकलेली नाही. त्यामुळेच जगाच्या इतिहासात जव्हार संस्थानचे स्थान अभूतपूर्व, असेच मानावे लागेल. एकाच राजवंशाची राजसत्ता असलेला जव्हार संस्थानचा इतिहास आश्चर्यकारक व अद्वितीय आहे. ‘जव्हार’ नगरीच्या जडणघडणीला जव्हारचे अखेरचे अधिपती ‘ राजे कै. यशवंतराव मार्तंडराव मुकणे’ यांनी संस्थानी आमदानीत खरा आकार दिला. दूरदृष्टी असलेले जव्हारचे राजे खऱ्या अर्थाने जव्हारचे शिल्पकार आहेत. जव्हार नगरीवर त्यांच्या अतुलनीय कार्याचा, कर्तृत्वाचा ठसा उमटला आहे. त्यामुळे हे शहर सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व व्यापारीदृष्ट्या संपन्न झाले. त्यांच्या विकासात्मक कर्तृत्वाची साक्ष देणारी अनेक लोकोपयोगी स्मारके या शहरात दिमाखाने उभी आहेत.
 
जव्हार नरेश श्रीमंत यशवंतरावांना ‘प्लाईट लेप्टनंट’ चा पहिला मान मिळाला. इंग्लंडचे बादशहा सहावे जॉर्ज यांनी ‘हिज हायनेस’ हा बहुमानाचा किताब वंशपरंपरागत बहाल करून त्यांना गौरविले. त्याप्रीत्यर्थ या विजयाच्या क्षणाचे स्वागत ज्या ठिकाणी केले त्या ठिकाणाला ‘यशवंतनगर’ हे नाव देण्यात आले. म्हणजेच आजचे जव्हार नाशिक रस्त्यावरील यशवंतनगर मोर्चा असे म्हटले जाते. यशवंतराव महाराजांनी जव्हारवासीयांना यशवंत सार्वजनिक वाचनालय, कृष्ण विद्यालय माध्यमिक शाळा, आरोग्याच्या सुविधेकरिता पतंगशहा कुटीर रुग्णालय,नगरपरिषद कार्यालय, जुना राजवाडा, महालक्ष्मी मंदिर इ. अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या. विजयस्तंभ (टॉवर) हा ‘वाडा’ तालुक्यातील श महंमद धांगे यांनी स्वखर्चाने बांधून दिला.
 
जव्हार शहरातील वर्तमान तहसील कार्यालयाची इमारत ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात आहे. जव्हार संस्थानचे राजे कै यशवंतराव मुकणे यांनी त्या काळात पर्यटन विकासाची दूरदृष्टीने शालिमार नावाचे हॉटेल काढले त्यात जेवणाची व निवासाची सोय होती. वास्तुशास्त्राचा एक उत्तम नमुना असलेल्या शालिमार हॉटेल म्हणजेच आजचे तहसीलदार कार्यालयाची डोळ्यात भरणारी इमारत उभारली. संस्थान काळात हॉटेल शालिमार म्हणून नव्याने सुरू करण्यात आले. ‘जव्हार’ हे हिल स्टेशन म्हणून प्रसिद्ध झाले; तसेच पर्यटनासाठी येणाऱ्या किंवा व्यापार वगैरे कारणांमुळे येथे येणाऱ्या प्रवाशांची राहण्याची, जेवणाची उत्तम सोय शालिमार हॉटेलमुळे झाली.
 
राज्य सरकारने जव्हारला पर्यटनाचा दर्जा आता दिला असला तरी तत्कालीन राजे मुकणे यांनी तेव्हाच हॉटेल शालिमारची निर्मिती केली होती.त्यातून त्यांच्या दूरदृष्टीचा प्रत्यय येतो. इंग्लंडमध्ये शिक्षण झाले असल्याने जव्हारच्या राजेनी जव्हार शहराचा नगरविकास व रचना इंग्लंडमधील एखाद्या टाऊन सारखी केली होती. वास्तुशास्त्राचा ऊत्तम नमुना असलेल्या कित्येक इमारती त्यांनी जव्हार नगरपरिषदेला दिल्या मात्र देखभालसाठी पर्यायाने त्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे गेल्याने जव्हारचे वैभव इतिहासजमा होते की काय अशी चिंता जव्हारकरा व्यक्त करतांना दिसत आहेत. जव्हार नगरपरिषदेला जर ऐतिहासिक वास्तू जपायच्या असतील तर वारसा यादीत जव्हार मधील संस्थान इमारती नोंद करण्यात यावी असे इतिहासकार सांगत आहेत