धबधबे, तलाव, धरणे, किल्ले व समुद्र किनारी मनाई आदेशाचे नागरीकांनी काटेकोरपणे पालन करावे

जनदूत टिम    11-Jun-2021
Total Views |
पालघर : जिल्ह्यामध्ये मान्सून कालावधीत धबधबे, तलाव, धरणे, किल्ले व समुद्र किनारी पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात व त्या ठिकाणी जिवीतहानी होण्याच्या घटना घडत असतात. तसेच सद्या कोरोना विषाणूंचा संसर्ग व प्रादुर्भाव लक्षात घेता, धबधबे, तलाव, धरणे, किल्ले व समुद्र किनारी जाण्यासाठी मनाई आदेश जारी करण्यात आला असुन मनाई आदेशाचे नागरीकांनी काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी डॉ.किरण महाजन यांनी केले.
 
dhabdhaba655_1  
 
पावसाळयात पालघर जिल्ह्यामध्ये असलेले धबधबे, तलाव, धरणे, किल्ले व समुद्र किनारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक पर्यटनासाठी आल्याने गर्दी होण्याची व सामाजिक अंतर राखले न जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची सुरक्षा अबाधित रहावी व कोणत्याही प्रकारची जिवीतहानी होऊ नये म्हणून दि.10/06/2021 रोजीच्या आदेशान्वये फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 51(b) अन्वये दि.11/06/2021 ते दि.08/08/2021 पर्यंत पालघर जिल्ह्यातील वसई तालुका वगळून उर्वरीत 7 तालुक्यांच्या क्षेत्रातील सर्व धबधबे, तलाव, धरणे, सर्व किल्ले व समुद्र किनाऱ्यावर जाण्यास मनाई आदेश लागू केलेला असल्याचे अपर जिल्हादंडाधिकारी डॉ.किरण महाजन यांनी सांगितले.
 
या मनाई आदेशाचे सर्व नागरीकांनी काटेकोरपणे पालन करावे, असे हि आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी डॉ.किरण महाजन यांनी केले आहे.