अवघ्या चार तासात खुनाचा गुन्हा उघडकीस तीन अटकेत: जव्हार पोलिसांची कामगिरी

पारस सहाणे    10-Jun-2021
Total Views |
जव्हार : जव्हार तालुक्यातील अळीवमाळ येथील देवराम नाकरे हा हरवला होता. त्याचा मृतदेह रविवारी हेदोलीपाडा जंगलात प्लास्टिकच्या पिशवीत सापडला असून अवघ्या काही तासातच तीन संशयित आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
 
javhar55_1  H x
 
जव्हार तालुक्यातील आळीवमाळ येथील देवराम नाकरे (३८) हा दि. ३१ मे रात्री १ वाजेपासून कोठेतरी निघून गेल्याबाबत जव्हार पोलीस ठाण्यामध्ये १५ जून रोजी हरवल्याची फिर्याद दाखल करण्यात आली होती. देवरामचा शोध सुरू असताना ६ जून रोजी सकाळी ११. वाजता झाप गावचे पोलीस पाटील यांनी जव्हार पोलीस ठाणे येथे फोन करून हेदोलीपाडा जंगलात गोणीमध्ये काहीतरी संशयित असल्याचे कळविले. पोलीस निरीक्षक आप्पासाहेब लेंगरे, उपनिरीक्षक सागर पाटील, पूनम सूर्यवंशी तसेच पोलीस पथकासह हेदोलीपाडा जंगलात गेले.
 
जंगलात साधारण ५० फूट खोल दरीत एका झाडाच्या बुंध्याखाली असलेल्या खोलगट भागात मनुष्याचे प्रेत टाकून ते कुणासही दिसू नये याकरिता त्यावर भरपूर दगड ठेवून ते प्लॉस्टिकच्या गोणीमध्ये भरून गाडण्यात आले होते. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने दगड बाजूला करून प्रेत बाहेर काढले. त्याची स्थानिकांच्या मदतीने ओळख पटवली असता ते देवराम नाकरे याचे असल्याचे निष्पन्न झाले.
 
गुन्ह्याची दिली कबुली
उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत परदेशी व पोलीस निरीक्षक ए.बी. लेंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील व पथकाने तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.