श्री. क्षेत्र मलंगगडसाठी ‘विकास आराखडा’ तयार करणार

10 Jun 2021 15:21:18

ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी श्री. क्षेत्र मलंगगडची केली पाहणी

ठाणे : अंबरनाथ तालुक्यातील हाजीमलंगगड ग्रामपंचायतमधील श्री.क्षेत्र मलंगगड भागात विविध सोई-सुविधा निर्माण करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकास आराखडा तयार करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी दिली. त्यांनी बुधवारी विविध विभागाच्या विभागप्रमुखासह प्रत्येक्ष मलंगगडाची पाहणी करून नागरिकांच्या समस्याही जाणून घेतल्या.

मलंगगड_1  H x W 
 
प्रत्येक्ष पाहणी दौरा झाल्यानंतर ग्रामपंचायतमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपाध्यक्ष सुभाष पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे यांच्या उपस्थितीत विकासकामांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. येथील समस्या मार्गी लावण्यासाठी विविध विभागांचा एकत्रित विकास आराखडा तयार करून टप्याटप्याने येथील विकास कामे मार्गी लावण्यात येणार आहेत. श्री.क्षेत्र मलंगगड हे पर्यटन तसेच यात्रास्थळात मोडते. त्यामुळे या यात्रास्थळाला भेट देण्यासाठी येणाऱ्या भाविकांकडून ग्रामपंचायत अत्यल्प यात्राकर आकारते.मात्र ग्रामपंचायतचे उत्पन्न वाढविण्यासाठी आगामी काळात यात्राकरात वाढ करून गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायतीचे आर्थिक बळकटीकरण करण्यावरही भर देण्यात येणार आहे.
 
त्याचबरोबर येथील पाण्याचा प्रश्न, रेलिंगचे काम, पायऱ्यांचे काँक्रीटीकरणं आदी सुविधा उपलब्ध करण्याबरोबरच आरोग्य विषयकबाबी, शाळा- अंगणवाडी केंद्राच्या समस्या मार्गी लावण्यात येणार आहे.तसेच सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनही करण्यात येणार आहे. ही विकास कामे टप्याटप्याने केली जाणार असून नागरिकांचे जीवनमान उंचाविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वोतोपरी कार्यवाही करण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी सांगितले. प्रत्येक्ष पाहणी दौऱ्यास आरोग्य व बांधकाम समिती सभापती कुंदन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते, प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, मुख्य लेखा व वित्तधिकारी सुभाष भोर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रामपंचायत) चंद्रकांत पवार, कार्यकारी अभियंता (बांधकाम) नितीन पालवे, कार्यकारी अभियंता ( ग्रामीण पाणी पुरवठा) एच.एल. भस्मे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनिष रेंघे,शिक्षणाधिकारी संतोष भोसले, जिल्हा परिषद कृषि विकास अधिकारी श्रीधर काळे, अंबरनाथ गट विकास अधिकारी शीतल कदम, जिल्हा परिषद सदस्य श्याम पाटील , सरपंच तुषार पाटील, उपसरपंच प्रशांत ठाकूर आदी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0