नवीन समाजमंदिर उभारणीची नागरिकांची मागणी, किरण गायकवाड यांचे ममदापूर ग्रामपंचायतकडे निवेदन

जनदूत टिम    10-Jun-2021
Total Views |
नेरळ : कर्जत तालुक्यातील नेरळ शहरालगत असलेल्या ममदापुर ग्रामपंचायत मधील अस्तित्वात असलेले समाजमंदिर अपुरे पडत असल्याने भविष्यातील विचार करत प्रशस्त, अत्याधुनिक समाज मंदिर उभारावे अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. तर याबाबत पुढाकार घेत सामाजिक कार्यकर्ते किरण गायकवाड यांनी याबाबतचे निवेदन ग्रामपंचायतीला देखील दिले आहे.
 
karjat44_1  H x
 
कर्जत तालुक्यातील विस्ताराने आणि आर्थिक उत्पनाने तिसऱ्या स्थानावर असणाऱ्या ममदापूर ग्रामपंचायत हद्दीत विविध प्रासंगिक व सार्वजनिक कार्यक्रमांसाठी सध्या अस्तित्वात असलेले डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह समाज मंदिर ममदापूर ही वास्तू अपुरी पडत आहे. साधारण ३० पूर्वी बांधलेल्या या वास्तू आता जुनी झाल्याने याबाबत ग्रामस्थांनी अनेकवेळा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यानुषंगाने येथील युवा सामाजिक कार्यकर्ते किरण गायकवाड यांनी पुन्हा एकदा लेखी मागणीच्या आधारे ग्रामपंचायतीचे सरपंच दामोदर निरगुडा, ग्रामविकास अधिकारी संजय राठोड यांना निवेदन देऊन लक्ष वेधले आहे.
 
सध्या अस्तित्वात असलेल्या सभागृहाचे क्षेत्रफळ फारच कमी असल्याने नवीन वास्तू उभारण्याशिवाय पर्याय नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे. या ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकीकरण वाढते आहे. तेव्हा वाढत्या लोकसंख्येने भविष्यातील विचार करत प्रशस्त वास्तू उभारून त्यात वाचनालय, व्यायामशाळा, खुले चर्चासत्र होईल असे सभागृह या सुविधा असाव्यात असे मत ग्रामस्थांकडून मांडले जात आहे. तेव्हा याबाबत प्रशासन काय निर्णय घेतेय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
नागरिकांची मागणी प्राधान्याने ध्यानात घेऊन ममदापूर गावाची वाढती लोकसंख्या व शहरीकरण विचारात घेता ममदापूर ग्रामपंचायतीने स्वतःच्या मालकीतून किंवा नेरळ संकुल विकास प्राधिकरण क्षेत्रातील राखीव असणाऱ्या भूखंडातून किमान २ गुंठे जागा सदर प्रस्तावित समाजमंदिरासाठी उपलब्ध करून दिली तर वाचनालय, व्यायामशाळा, खुले सभागृह इत्यादी सुविधा निर्माण करता येतील जेणेकरून त्याचा लाभ असंख्य नागरिकांना घेता येईल.
- श्रावस्ती सचिन अभंगे, माजी सदस्या ममदापूर ग्रामपंचायत
 
सदर प्रस्तावित नवीन वास्तूसाठी जागेचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्व नागरिकांनी प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती संवर्गाकरिता असणारा विकास निधी राजिप समाजकल्याण विभाग तसेच नेरळ संकुल विकास प्राधिकरण क्षेत्रातून स्वतंत्र निधी उपलब्ध होण्यासाठी लवकरात लवकर राजिप अध्यक्षा योगिता पारधी, माजी उपाध्यक्ष आस्वाद पाटील, माजी सभापती नारायण डामसे, अर्थ व बांधकाम सभापती निलिमा पाटील यांची भेट घेऊन वरिष्ठ पातळीवरून हा प्रश्न मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न असेल.
- दत्तात्रेय निरगुडा, अध्यक्ष कर्जत तालुका विभागीय आदिवासी ठाकूर संघटना