कोरोना लसीकरण- समज आणि गैरसमज

जनदूत टिम    06-May-2021
Total Views |
ज्या कोरोना लसीची गेल्या दीड वर्षापासून संपूर्ण जग आतूरतेने वाट पाहत होतं. जी लस तयार करण्यासाठी संपूर्ण जग प्रयत्न करत होते अशी यशस्वी लस सर्वप्रथम भारताने तयार केली. याचा प्रत्येक भारतीयाने अभिमान बाळगला पाहिजे. काल माझ्या शेजारच्या काकांना मी सहज विचारले ‘काका तुम्ही कोरोनाची लस घेतली का?’ त्यांनी सरळ ‘नाही घेतली’ असे उत्तर दिले. मी त्यांना विचारले की, अद्याप तुम्ही लस का नाही घेतली? त्यावर ते म्हणाले ‘लस घेतल्याने त्रास होतो.बरीच लोक लस घेतल्यानंतर दगावली’ त्यांच्या या उत्तराने मला धक्काच बसला.
 
corona-2_1  H x
 
माझ्या कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी कोरोनाची लस घेतली आहे. लस घेतल्यानंतर पहिले दोन दिवस साधा ताप, कणकण अंगदूखी ही लक्षणे सगळयांनाच होती. मात्र त्यानंतर आमच्यापैकी कोणालाही कोणत्याही प्रकारचा त्रास झालेला नाही. या उलट कोरोना बद्दलची मनातली भिती 50 टक्के तरी कमी झालेली आहे. लस घेतल्या नंतर कोरोना होणार नाही असे नाही, मात्र चुकून कोरोना झाला तरी लस घेतल्यामुळे कोरोना विषाणू सोबत आपले शरीर लढू शकते. आपण कोरोनाला निश्चितच हरवू हा आत्मविश्वास वाढलेला आहे. हे सांगितले पाहिजे.
 
कोरोनाच्या दूसऱ्या लाटेचा सामना आपण सध्या करत आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग महत्वाचा आहे. केंद्र शासनाच्या अदेशानूसार 1 मे पासून संपूर्ण राज्यात 18 वर्षावरील सर्वच नागरीकांना लस देण्यात येणार आहे. 18 ते 44 वयोगटातील लसीकरण कार्यक्रमाचे नियोजन करताना कुठलीही अडचण येणार नाही याची काळजी घ्यावी,या वयोगटातील नागरिकांनी कोविन मोबाईल ॲपवर नोंदणी करावी, कुठेही लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये. लसीकरणाबाबत व्यवस्थित व सुस्पष्ट सूचना मिळतील अशा सुचना मा.मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला केल्या आहेत. लसीकरणाचा वेग वाढावा त्या सोबतच लसीचे उत्पादनही वाढावे यासाठी केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जैव तंत्रज्ञान विभागाच्या सहाय्याने आणि मे.भारत बायोटेक इंटरनॅशनल लि., हैद्राबाद या कंपनीकडून कोविड-19 या साथ रोगाच्या लसीचे उत्पादन तंत्रज्ञान घेऊन महामंडळाच्या परळ, मुंबई येथील जागेत रूपये 154 कोटी भांडवली खर्चाच्या कोवॅक्सिन लस उत्पादनाचा प्रकल्प सुरु करण्यास मंजूरी दिली आहे.
 
यापूर्वी फक्त 45 वर्षावरील नागरीकांना लस दिली जात होती. राज्यात तरुण वर्गाची संख्या मोठी आहे. तरुणवर्गातील मुला मुलींच्या मनात लसीकरणाबद्दल अनेक प्रश्न, गैरजमज आहेत. याबद्दलीच प्रश्न उत्तरे दिली आहेत. 
 
प्रश्न- लसीकरणासाठी नोदणी(रजीस्ट्रेशन) कसे करावे?
उत्तर-लसीकरणासाठी आपण आरोग्य सेतू ॲप किंवा कोविन पोर्टलवर सुध्दा नोंदणी करु शकतो. यामध्ये आपण आपल्या सोयीनुसार लसीकरणाची तारीख व वेळ ठरवू शकता.
 
प्रश्न- लसीकरणाच्या नोंदणीसाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता लागेल?
उत्तर-लसीकरणाच्या नोंदणीसाठी स्वत:चा पासपोर्ट साईज फोटो व कणतेही एक फोटोआयडी उदा. आधारकार्ड/पॅनकार्ड/वोटरआयडी चालेल.
 
प्रश्न- लसीकरणाच्यावेळी फोटोआयडी नेणे आवश्यक आहे का?
उत्तर-नोंदणीच्यावेळी आपण जो आपला फोटो आयडी दिला होता. तोच फोटो आयडी सोबत न्यावा लागेल.
 
प्रश्न- लसीकरणाचे एकूण किती डोस असतील व ते किती दिवसांच्या अंतरावर घ्यावे लागतील?
उत्तर-कोविशिल्ड व कोवॅक्सीन अशा दोन लसी आहेत. दोघांपैकी एक लस घ्यावी लागेल दोघांचेही दोन दोन डोस घेणे आवश्यक आहे. कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतल्या नंतर दूसरा डोस चार ते आठ आठवडयानंतर घ्यावा लागेल. तर कोवॅक्सीन लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस चार ते सहा आठवड्यांच्या अंतरावर घ्यावा लागेल.
प्रश्न- लसीच्या डोन डोस करीता वेगवेगळया वेळेस नोंदणी करावी लागेल का?
उत्तर-नाही. लसीकरणाच्या सुरुवातीला म्हणजेच पहिल्या डोसच्यावेळी नोंदणी केली असल्यास पुन्हा दूसऱ्या डोसच्यावेळी नोंदणी करण्याची आवश्यकता नाही.
 
प्रश्न -कोविशिल्ड व कोवॅक्सीन यापैकी चांगली लस कोणती?
उत्तर-वैद्यकीय चाचण्यांमध्ये दोन्ही लसी उपयुक्त असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे दोन्ही लस चांगल्या आहेत.
 
प्रश्न- दोन्ही लसींपैकी कोणतीही लस आपल्या मनाने कधीही घेऊ शकतो का?
उत्तर-नाही. आपण लसीकरण नोंदणीच्या वेळी जे लसीकरण केंद्र निवडले होते त्या लसीकरण केंद्रावर त्यावेळेस जी लस उपलब्ध असेल तीच लस घ्यावी लागेल.
 
प्रश्न- जे कोरोना बाधीत रुग्ण नुकतेच कोरामुक्त झाले आहेत व कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत त्यांनी लस घेतली पाहिजे का?
उत्तर- जे कोरोना बाधीत रुग्ण नुकतेच कोरामुक्त झाले आहेत व कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत त्यांनी सुध्दा लस घेतली पाहिजे कारण कोरानातून बरे झालेल्या बऱ्याच व्यक्तींना कोरोनाची पुन्हा लागण झालेली आहे.
 
प्रश्न- लस कोणी घेऊ नये?
उत्तर-गर्भवती महिला, बालकांना स्तनपान करणाऱ्या महिला, कोरोना बाधीत रुग्ण किंवा गंभीर आजाराने पीडीत व्यक्ती यांनी लस घेऊ नये.
 
प्रश्न- लसीकरणाचे दोन डोस वेगवेगळया लसीचे घेतले तर चालतील का? पहिला डोस कोविशिल्डचा व दुसरा डोस कोवॅक्सीनचा घेतला तर चालेल का?
उत्तर-अजिबात नाही. पहिला डोस ज्या लसीचा घेतला आहे. दूसरा डोस देखील त्याच लसीचा घेणे आवश्यक आहे.
 
प्रश्न – पहिला डोस घेतला आहे परंतु सध्याच्या लसीच्या तुटवडयाअभावी दूसरा डोस घेण्यास विलंब झाल तर ?
उत्तर – तज्ञांच्यामते लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर ॲन्टीबॉडीज तयार व्हायला 2 ते 3 आठवडे लागतात त्यामुळे काहीवेळा लसीचा पहिला डोस घेतलेल्यांना मधल्याकाळात कोरोनाची लागण झाली असल्यास घाबरण्याचे कारण नाही. कारण अशा रुग्णांची लक्षणे सौम्य असतातआणि त्यांच्यापासून इतरांना संसर्गाचा धोकाही कमी असतो. थोडक्यात पहिला डोस तुम्हाला कोरोना पासून 50 टक्के संरक्षण देतो. त्यामुळे विलंब झाला तरी दूसरा डोस हा बूस्टर डोस असल्याने तो घेणे गरजेचे आहे.

प्रश्न- लसघेतल्या नंतर सुध्दा शासनाचे नियम पाळावे लागतील का? म्हणजेच मास्क लावणे, सुरक्षित अंतर पाळणे, सतत हात धुणे यासर्व गोष्टींचे पालन करावे लागेल का?
उत्तर-हो लसीकरणानंतर सुध्दा शासनाच्या सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. मास्क लावणे, सुरक्षित अंतर पाळणे, सतत होत धुणे या सर्व गोष्टी पुर्वी प्रमाणेच पाळाव्या लागतील.
 
प्रश्न- लस घेतल्यानंतर शरीरात ॲन्टीबॉडीज कधी तयार होतील?
उत्तर-दोन्ही लसींचे डोस घेतल्यानंतर 2 ते 3 आठवड्यांच्या आत शरीरात ॲन्टीबॉडीज तयार होण्यास सुरुवात होते. त्यामुळे लस घेतल्यानंतर कमीतकमी 2 ते 3 आठवडे धुम्रपान व मद्यपान करणे टाळावे.
 
प्रश्न- लस घेतल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे आढळून येतात.
उत्तर-ज्या ठिकाणी लस घेतली आहे ती जागा थोडी दुखणार, डोकेदुखी, ताप, अस्वस्थपणा, चक्कर येणे अशी लक्षण दिसू लागतील. लस घेतल्या नंतर ही लक्षणे दिसणे अपेक्षित आहेत त्यामुळे घाबरुन न जाता डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घ्वावे.
 
प्रश्न- लस घेतल्यानंतर सुध्दा कोरोना होऊ शकतो का?
उत्तर-लस घेतल्यानंतर कोरोना होणार नाही असे नाही लस घेतल्यानंतर सुध्दा कोरोना होऊ शकतो परंतु लस घेतल्यानंतर शरीरात कोरोनाच्या विषाणू सोबत लढण्याची ताकत निर्माण होते व आपले शरीरा कोरोनाशी लढण्यास सक्षम बनते.
प्रश्न- लसीची किंमत किती आहे?
उत्तर-शासकीय रुग्णालयांमध्ये दोन्ही लसी मोफत दिल्या जात आहेत. खासगी दवाखान्यांमध्ये एका लसीचे किमान 250/- रुपये द्यावे लागतील.
कोकण विभागात ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर जिल्हयातील जिल्हा रुग्णालयांमध्ये तसेच नवी मुंबईतील वाशी, नेरुळ, ऐरोली रुग्णालयांमध्ये लस देण्यात येईल.
राज्यात लाखाच्या संख्येत दररोज बाधितांची संख्या वाढत असली तरी मोठया संख्येने रुग्ण बरे सुध्दा होत आहेत. वाढत्या रुग्ण संख्येला ऑक्सीजन, औषधे, बेड, साधन सामग्री यांची उपलब्धता करुन देताना शासनावर प्रचंड ताण पडत आहे. कोरोनाचा वाढता प्रदुर्भाव रोखण्यासाठी शासनाने राबविलेले ‘ब्रेक दि चेन’ हे अभियान यशस्वीकरण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या घोष वाक्याचे सर्व जनतेने पालन करुन जबाबदारीने लस घेणे गरजेचे आहे.
- प्रविण रा.डोंगरदिवे
माहिती सहाय्यक
विभागीय माहिती कार्यालय
कोकण विभाग, नवी मुंबई