ग्रामपंचायतीमध्ये मुदत संपलेले सॅनिटायजर वाटप स्थानिक नागरिक संतप्त

पारस सहाणे    04-May-2021
Total Views |
जव्हार : जव्हार तालुक्यात कोरोना वाढत असल्याने ग्रामपंचायत स्तरावर कोरोनाचा सामना करण्यासाठी ग्रामपंचायत सॅनिटायजर, मास्क, हॅन्ड वॉश,आदी सामान नागरिकांना वाटप करीत असते. मागच्या वर्षी केंद्र सरकार कडून आलेल्या निधी तुन मोठ्या प्रमाणात वस्तूंचे वाटप करण्यात आले.
 
tahsildar_1  H
 
याही वर्षी ग्रामीण भागातील पाथर्डी व न्याहाळे खुर्द ग्रामपंचायतीनी १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १००० पेक्षा जास्त सॅनिटायजर वाटप केले मात्र सॅनिटायजरवर मार्च २०२१ ची मुदत असल्याचे जागृत नागरिकांना समजले त्यांनी सोशल मीडियावर सदर बाब उघडकीस आणली व त्या सॅनिटायजरच्या तारीखेवर खाडाखोड करून मार्कर पेनने मार्च २०२२ केले असल्याचे ही दिसून आले आहे.
 
मार्कर पेनच्या सहाय्याने मुदत वाढवण्यात आली असल्याचा पुरवठादार प्रयत्न करीत असल्याचे समोर आले आहे. ५०० एम एल च्या सॅनिटायजरच्या बाटल्या वाटप करण्यात आल्या होत्या. मुदत संपलेल्या माल वाटप झाल्याचे कळल्यानंतर ग्रामपंचायतीने सदर सॅनिटायजरच्या बाटल्या परत मागून घेतल्या आहेत.
 
पाथर्डी व न्याहाळे खुर्द मधील ग्रामपंचायतीमधील हा प्रकार असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत आदिवासी एकता परिषदेचे कार्यकर्त्यांनी जव्हारचे तहसीलदार संतोष शिंदे यांना निवेदन सादर केले असून, सदर सॅनिटायजर पुरवठादार व ग्रामसेवक आदी दोषींवर कारवाई करण्यात यावी असे तक्रारदार मिलींद बरफ यांनी सांगितले. काही ठेकेदार सर्व ग्रामपंचायती आमच्या खिशात असल्याचे सांगतात त्यामुळे त्यांना धडा शिकवणार असल्याचे तक्रार करणारे यांनी सांगितले.
 
सदर वादग्रस्त पुरवठादाराला एका वरिष्ठ ग्रामसेवकांचे पुरवठादाराला पाठबळ असल्याचे सूत्रांकडून समजते. स्थानिक नागरिक याप्रकरणी संतप्त झाले आहेत.
 
सदर प्रकरणात चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल. याबाबत मी गटविकास अधिकारी यांना सूचना दिल्या आहेत.
- संतोष शिंदे, तहसीलदार, जव्हार
 
हे सॅनिटायजर जव्हार येथिल पुरवठादाराकडून खरेदी केले असून, मला पैशाचे आमिष दाखवून प्रकरण मागे घेण्यासाठी दबाव आणला जातो आहे मात्र दोषींवर कारवाई करण्यात यावी.
- मिलिंद बरफ, तक्रारदार न्याहाळे