कोरोनाने केली आयपीएल स्पर्धा रद्द

04 May 2021 13:30:29
देशात सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातला असताना आयपीएललाही त्याचा फटका बसला असून स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी कोलकाता संघाच्या दोन खेळाडूंना करोनाची लागण झाल्यानंतर बंगळुरुसोबत होणारा सामना पुढे ढकलावा लागला. दरम्यान चेन्नईच्याही तिघांना करोनाची लागण झाली आहे. त्यानंतर मंगळवारी हैदराबादचा वृद्धिमान साहा यालाही करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.
 
IPL_1  H x W: 0
 
या पार्श्वभूमीवर आयपीएलने स्पर्धा रद्द करत असल्याचं जाहीर केलं आहे. बायो-बबलमध्येही करोनाने घुसखोरी केल्याने आयपीएलच्या पुढील सामन्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. त्यातच बीसीसीआय सर्व सामने मुंबईत खेळण्याची तयारी करत होतं. मात्र यादरम्यान हैदराबादच्या वृद्धिमान साहा याला करोनाची लागण झाल्याचं समोर आलं. हैदराबाद आणि मुंबईमध्ये आज दिल्लीत सामना होणार होता. खेळाडूंनाही करोनचाी लागण होत असल्याने अखेर बीसीसीआयने आयपीएल स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
 
चेन्नईच्या तीन सदस्यांना करोनाची लागण झाल्यानंतर त्यांनी बुधवारी राजस्थानविरोधात होणारा सामना आपण खेळू शकणार नसल्याचं बीसीसीआयला कळवलं होतं. जोपर्यंत पॉझिटिव्ह आढळलेल्या सदस्यांच्या संपर्कात आलेले सर्व खेळाडू तिन्ही चाचण्यांमध्ये निगेटिव्ह येत नाही तोपर्यंत मैदानात उतरण्यास इच्छुक नसल्याचं चेन्नई संघाने बीसीसीआयला कळवलं होतं. नियमाप्रमाणे यासाठी सहा दिवसांचा कालावधी लागणार होता.
Powered By Sangraha 9.0