दिबांचे नाव नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासंदर्भात मुख्यत्र्यांसमवेत बैठक आयोजित करणार- नाना पटोळे

विठ्ठल ममताबादे    27-May-2021
Total Views |

  • लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचा पुढाकार

उरण : लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत सर्वपक्षीय कृती समितीसोबत बैठक आयोजित करुन देणार असल्याचे आश्वासन सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाशी बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.
 
na44_1  H x W:
 
लोकनेते दि.बा.पाटील नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांची त्यांच्या मंत्रालय समोरील निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली यावेळी नाना पटोले बोलत होते. शिष्टमंडळात सर्वपक्षीय कृती समितीचे उपाध्यक्ष, माजी खासदार रामशेठ ठाकूर, कार्याध्यक्ष, आमदार प्रशांत ठाकूर, उद्योजक जे एम. म्हात्रे, कार्यकारिणी सदस्य जे. डी. तांडेल, काॅग्रेस प्रदेश सचिव संतोष केणे, सहचिटणीस दीपक म्हात्रे, ॲड. मनोज भुजबळ, जासईचे सरपंच संतोष घरत, मेघनाथ म्हात्रे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पदोन्नती आरक्षण व ओबीसी जनगणना संदर्भात चर्चेसाठी भेट घेणार आहे. यावेळी लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासंदर्भातली जनभावना मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालुन याविषयी सर्वपक्षीय कृती समितीसोबत त्वरीत बैठक मुख्यमंत्र्यांसमवेत आयोजित करुन देण्याबाबत आपण प्रयत्न करु. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व लोकनेते दि.बा.पाटील या दोन्ही व्यक्ती प्रतिभावंत आहेत. नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव देताना ते सन्मानाने, एकमताने, बिनविरोध द्यायला हवे. बाळासाहेबांचे कार्य सर्वव्यापी आहे तसेच दिबांनी भूमीपुत्रांसाठी दिलेला लढा अतुलनीय आहे. दिबांचे कार्य आपण जाणून आहोत. दिबांबाबतची लोकभावना लक्षात घेऊन नामकरणाचा प्रश्न सामंजस्याने सुटावा यासाठी सर्वपक्षीय कृती समितीची मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक बोलावून तोडगा काढण्यासाठी आपण पुढाकार घेऊ असेही नाना पटोळे यांनी स्पष्ट केले.
 
तत्पूर्वी नाना पटोले यांच्यासोबत चर्चा करताना सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील यांनी, दिबांनी भूमिपुत्रांसाठी दिलेला लढा, साडेबाराटक्के भूखंडाचे देशभर गाजलेले आंदोलन, श्रमजीवी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी दिलेला लढा, ओबीसी आरक्षणासाठी केलेला संघर्ष, महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न आंदोलनातील सहभाग, आणीबाणीच्यावेळी झालेली अटक, १९५८ साली विधानसभेत कुळकायद्यावर केलेले मॅरेथॉन अभ्यासू भाषण, कोकण परिसरात उभारलेल्या शाळा महाविद्यालयांचे जाळे, फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा केलेला प्रसार आदी कार्याचा उल्लेख केला. यामुळेच दिबांच्या जन्मभूमीत- कर्मभूमीत होत असलेल्या नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचेच नाव देणे सयुक्त असल्याची प्रभावी मांडणी केली.