भिवंडीनजीकच्या विश्वभारती फाटा ते भिनार वडपा येथील रस्त्याचा प्रश्न अखेर लागला मार्गी

26 May 2021 20:03:23

  • रखडलेल्या रस्त्याचे काम एमएमआरडीए मार्फत पूर्ण करण्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

ठाणे:  ठाणे जिल्ह्यातील भिवंडीनजीकच्या वाडा-भिवंडी रस्त्यावरील विश्वभारती फाटा ते भिनार वडपा ह्या 7.70 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम एमएमआरडीए मार्फत पूर्ण करण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यामुळे प्रदीर्घ काळ रखडलेल्या या रस्स्त्याचा विषय अखेर मार्गी लागला आहे.

bhiwandi2_1  H
 
वाडा-भिवंडी रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुप्रिम इन्फ्रा कंपनीला देण्यात आले होते. मात्र विहित मुदतीत या रस्त्याचे काम सदर कंपनी पूर्ण करू शकली नाही. दरम्यान या रस्त्यावर अनेक अपघात घडल्याने त्यात स्थानिक ग्रामस्थांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी या विषयावर अनेकदा आंदोलन केली होती. या असंतोषाची दखल घेत अखेर या कंपनीकडून हे काम काढून घेण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. मात्र कंपनीने काम अपूर्ण ठेवल्याने ते पूर्ण करण्याची मोठी अडचण निर्माण झालेली होती.
त्यावर उपाय म्हणून मनोर ते वाडा आणि वाडा ते भिवंडी या रस्ता बाह्यवळण रस्त्याद्वारे जोडण्याचा निर्णय शासन स्तरावर घेण्यात आला. त्यामुळे विश्वभारती फाटा ते वडपा जंक्शन या रस्त्याचं काम आता वेगाने पूर्ण करण्यासाठी ते एमएमआरडीए कडून पूर्ण करण्याचा निर्णय आज नगरविकास मंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या रस्त्याचा सुधारित विकास आराखडा तयार असून त्यानुसार लवकरच या रस्त्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.
विश्वभारती फाटा ते वडपा जंक्शन असा 7.70 किमी लांबीचा रस्ता पूर्ण होणार असल्याने त्याचा या परिसरातील नागरिकांना त्याचा मोठा दिलासा मिळणार आहे. चार पदरी काँक्रीट रस्ता होणार असल्याने या भागातील प्रवास अधिक वेगवान होणार असून त्याद्वारे
वाडा आणि भिवंडीमधील अंतर कमी वेळात कापणे शक्य होणार आहे.
आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत नगरविकास मंत्र्यासह ठाण्याचे जिल्ह्याधिकारी राजेश नार्वेकर, ठाण्याचे वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील, एमएमआरडीए आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0