मुंबई शहरातील विविध विषयांच्या अनुषंगाने पालकमंत्री अस्लम शेख आणि आदित्य ठाकरे यांनी घेतली आढावा बैठक

24 May 2021 19:55:46
मुंबई : मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख आणि उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई शहरातील विविध विषयांच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली. विशेषतः तौक्ते वादळामुळे झालेले नुकसान, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची पूर्वतयारी, शहरामध्ये सुरू असलेले कोरोना प्रतिबंधक लसीकरण याबरोबरच पावसाळापूर्व करावयाची विविध कामे यांचा आढावा घेण्यात आला.
 
adityya55885_1  
 
बैठकीस मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर, उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांच्यासह मुंबई महापालिकेच्या विविध झोनचे उपायुक्त, महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यावेळी म्हणाले की, तौक्ते वादळामुळे शहरातील मच्छिमारांच्या बोटींच्या झालेल्या नुकसानीसंदर्भात त्यांना मदत करण्याची कार्यवाही सुरू आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने सर्व पातळ्यांवर सुसज्जता करावी.
 
शहरात सध्या लसीकरण सुरू असून लसीकरण केंद्रांवर कार्यालय किंवा इतर कोणत्याही प्रकारचे इतर उपक्रम सुरू ठेवू नयेत, अशा सूचना त्यांनी दिल्या. मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, शहरामध्ये मान्सूनपूर्व कामांची पूर्तता जलदगतीने करण्यात यावी, विशेषतः जिथे पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत तेथील राडारोडा हलविणे आदी कार्यवाही करण्यात यावी. कोस्टल रोड किंवा मेट्रोच्या कामामुळे पावसाळ्यात कुठे पाणी साचणार असेल तर अशा ठिकाणी पाणी साचू नये, यासाठीची व्यवस्था करण्यात यावी.
 
तसेच कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर शहरात पुरेशा आरोग्य सुविधांची उपलब्धता करणे, आयसीयू बेड्स, ऑक्सीजन बेड्स याबरोबरच पेडियाट्रिक ट्रीटमेंट सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करण्यात यावी. त्याचबरोबर कोरोनाविषयक मदतीसाठी शहरात प्रत्येक वॉर्डाकरिता सुरु करण्यात आलेल्या हेल्पलाईन क्रमांकांना त्या त्या भागात व्यापक प्रसिद्धी देण्यात यावी, अशा सूचनाही पालकमंत्री श्री ठाकरे यांनी यावेळी दिल्या.
Powered By Sangraha 9.0