पंचनामे व्यवस्थित करून शासनास तातडीने अहवाल सादर करावेत - मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

जनदूत टिम    21-May-2021
Total Views |
पेण : “ताउक्ते” चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात खूपच नुकसान झाल्याचे चित्र दिसत आहे. प्रशासनाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे व्यवस्थित करून शासनास तातडीने अहवाल सादर करावेत, असे निर्देश आपत्ती व्यवस्थापन,मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्हा प्रशासनाला आज येथे दिले. रायगड जिल्ह्यात दि.17 मे 2021 रोजी झालेल्या “ताऊक्ते” चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरीता ते आज (दि.20 मे) रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते.
 
aditi55_1  H x
 
या बाबतची आढावा बैठक श्रीवर्धन येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री कु. आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, माजी आमदार माणिक जगताप, अतिरिक्त जिल्हाधिकारी अमोल यादव, प्रांताधिकारी अमित शेडगे, श्रीवर्धन तहसिलदार सचिन सूर्यवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड व इतर संबंधित विभागाचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते. मंत्री वडेट्टीवार पुढे म्हणाले की, प्रशासनातील संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी जनतेच्या तक्रारींची नोंद घेऊन नुकसान झालेल्या प्रत्येक व्यक्तीला मदत मिळायलाच हवी, यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत. नुकसान न झालेल्या व्यक्तीला चुकूनही मदत दिली जाणार नाही याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. कोणत्याही प्रकारे नागरिकांची तक्रार येता कामा नये. विशेषतः तलाठी, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी यांनी आपले काम चोख करावे. शासन स्तरावरून आपत्ती व्यवस्थापन तसेच मदत पुनर्वसन च्या दृष्टीने अनेक आवश्यक त्या सुधारणा केल्या जाणार आहेत. राज्य शासनाकडून वीजप्रतिरोधकयंत्र बसविणे, भूमिगत वीजवाहिन्या टाकणे यासारखी कामे लवकरच सुरू होतील. याशिवाय पोल्ट्रीधारकांचाही प्रश्न येत्या काही दिवसात मार्गी लावला जाईल.
 
हे शासन राज्यातील प्रत्येक गरजू व्यक्तीला त्याचा हक्क, सोयीसुविधा मिळवून देण्यास कटिबद्ध आहे,असे सांगून ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आजच्या या नुकसान पाहणी दौऱ्याचा सविस्तर वृत्तांत कळविला जाईल. मुख्यमंत्री महोदय स्वतःदेखील पुढील चार दिवसात कोकणचा नुकसान पाहणी दौरा करणार असून हे शासन नुकसानग्रस्त नागरिकांना निश्चितच योग्य व आवश्यक ती मदत देईल, कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, कोणीही गरजू नुकसानग्रस्त शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही.
 
पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे नुकसानग्रस्त नागरिकांच्या वतीने जोरदार बाजू मांडली. त्यांनी मागील वर्षी निसर्ग चक्रीवादळात झालेले नुकसान व शासनाने दिलेली भरीव मदत याबाबतची विस्तृत माहिती दिली. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर सहकारी मंत्र्यांनी केलेल्या मदतीचा आवर्जून उल्लेख करीत सर्वांचे आभार मानले. याचप्रमाणे पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या कोविड उपाययोजनाविषयी देखील मदत व पुनर्वसन मंत्र्यांना माहिती दिली.
या बैठकीत पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे विनंती केली की, राज्य शासनाकडून रायगड जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांसाठी भरीव मदत मिळावी आणि केंद्र शासनाकडेही भरीव मदत मिळविण्यासाठी प्रयत्न व्हावेत. तसेच चक्रीवादळामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, स्मशानभूमी यांच्या झालेल्या नुकसानीबाबत तातडीने मदत मिळावी.
 
आमदार अनिकेत तटकरे यांनी आपल्या मनोगतात अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन या पर्यटन व्यवसायासाठी पूरक असलेल्या भागातील “गाईडस्”च्या शाश्वत उपजीविकेचा प्रश्न मार्गी लावावा, पोल्ट्रीधारकांचे प्रश्न सोडवावेत, राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाची रायगड जिल्ह्यात कायमस्वरुपी नेमणूक व्हावी, हे मुद्दे मांडले.तसेच प्रशासनाने केलेल्या चांगल्या कामाचेही त्यांनी शेवटी कौतुक केले. माजी आमदार माणिकराव जगताप यांनी प्रत्येक नुकसानग्रस्त नागरिकास योग्य ती मदत मिळावयास हवी मात्र त्यासाठी पंचनामे योग्य रीतीने तात्काळ व्हायला हवेत, मच्छीमारांच्या प्रश्नांकडे अत्यंत गांभीर्याने पाहून ते मार्गी लावायला हवेत, असे मुद्दे मांडून जिल्हा प्रशासन करीत असलेल्या कामाची प्रशंसा केली.
 
या बैठकीदरम्यान अपर जिल्हाधिकारी अमोल यादव यांनी “ताउक्ते” चक्रीवादळात जिल्ह्यात तालुकानिहाय, विषयनिहाय झालेले नुकसान याची सविस्तर माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे सादर केली. त्याचबरोबर त्यांनी जिल्हा प्रशासनाने या चक्रीवादळाचा धोक्याचा इशारा मिळाल्यानंतर मोठी वित्तहानी व मनुष्यहानी होऊ नये, यासाठी खबरदारीचे काय उपाय केले, याबाबतची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली व प्रशासन चक्रीवादळामुळे झालेल्या संबंधित नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून शासनास लवकरात लवकर अहवाल सादर करील, अशी ग्वाही दिली.
 
दरम्यान आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिवसभरात पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्यासह माणगाव तालुक्यातील निजामपूर येथील केंद्रीय प्राथमिक शाळा, निजामपूर येथील केळीची बाग, तसेच म्हसळा तालुक्यातील चाफेवाडी आणि श्रीवर्धन तालुक्यातील भरडखोल कोळीवाडा येथे भेट देऊन तेथील नागरिकांशी संवाद साधला व त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. या पाहणीच्या वेळी जिल्हाधिकारी निधी चौधरी, तहसिलदार प्रियंका कांबळे यांची
उपस्थिती होती.