मराठा आरक्षणावरुन संभाजीराजे कडाडले

जनदूत टिम    20-May-2021
Total Views |
मुंबई : मराठा आरक्षणाबाबत कोर्टाच्या निर्णयावर समाजात सर्वत्र नाराजी आणि अस्वस्थता आहे. समस्येवर मार्ग निघण्यासाठी मी सकारात्मक आहे. आरक्षणाबाबत मार्ग निघेपर्यंत मी गप्प बसणार नाही. छत्रपती संभाजीराजे यांनी पुण्यात माध्यमांसमोर अशी भूमिका मांडली होती. त्यानंतर, आता नाशिकमधील पत्रकार परिषदेतही संभाजीराजे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.
 
snjme_202105620266_1 
 
संभाजीराजेंनी दोन दिवसांपूर्वीच ट्विट करून आपण लवकरच मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट करणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर, आज नाशिकमध्ये बोलताना मी भाजपचा ठेका घेतला नसल्याचं त्यांनी म्हटलं. भाजपने मराठा समाजाच्या भावनेशी खेळू नये, यावर तोडगा सांगावा. मराठा आरक्षणासंदर्भात भाजपने त्यांची भूमिका घ्यावी. मी काही त्यांचा ठेका घेतलेला नाही, असे वक्तव्य संभाजीराजेंनी (sambhaji raje ) केले. गेल्या सरकारने बोगस कायदा केला का, या सरकारने सर्वोच्च न्यायालयात नीटपणे भूमिका मांडली नाही, याच्याशी आम्हाला घेणंदेणं नाही. राज्य सरकार आणि केंद्र सरकार एकमेकांवर केवळ ढकलाढकली करत आहेत. त्यामुळे आंदोलन काय असतं हे इतरांनी मला शिकवू नये. मराठा समाजाची (Maratha Reservation) दिशाभूल कराल तर हा संभाजी महाराज आडवा येईल, अशा शब्दात संभाजीराजेंनी आपली भूमिका मांडली.
तज्ज्ञांशी चर्चा करणार
मराठा समाजातील जाणकार, विद्वान आणि वकिलांशी चर्चा करूनच मार्ग काढण्यात येईल. माझी भूमिका ही सकारात्मक असेल. असेही ते म्हणाले आहेत. सध्या मराठा आरक्षणावरून राजकीय वातावरण तापले आहे. त्यामुळे मी तसे ट्विट केले, असे संभाजीराजे यांनी स्पष्ट केले. माझी भूमिका ही शिवाजी महाराज, शाहू महाराजांची भूमिका असेल. त्याच्या राजकीय पक्षांशी कोणताही संबंध नसेल. ती समस्त मराठा समाजाची भूमिका असेल, असेही संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.
 न्यायमूर्ती गायकवाड यांनाही भेटणार
अनेक राजकीय पक्ष सध्या वेगवेगळ्या प्रकारे मत व्यक्त करत आहेत. मात्र, ती माझी भूमिका नाही. मी मराठा आरक्षणासंदर्भात बराच अभ्यास केला आहे. १०२ वी घटनादुरुस्ती, ऍटर्नी जनरल न्यायालयात काय बोलले किंवा राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी का, यावर मी लवकरच बोलेन. मी आता मराठा समाजातील जाणकार, विद्वान आणि अभ्यासकांना भेटणार आहे. न्यायमूर्ती गायकवाड यांच्याशीही चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.