चक्रीवादळाचा कर्जत तालुक्याला ही फटका, 233 घरांचे अंशतः नुकसान तर महावितरणचे 37 पोलचे नुकसान

जनदूत टिम    19-May-2021
Total Views |
कर्जत : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा कर्जत तालुक्यालाही मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. तालुक्यातील अनेक घरांचे नुकसान होऊन, विद्युत पोल, फळबाग नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. मात्र प्रशासनाने घेतलेल्या खबरदारीमुळे कुठेही जीवितहानी झालेली नाही. अरबी समुद्रात निर्माण झालेले चक्रीवादळ हे गुजरातच्या दिशेने पुढे सरकले आहे.

cha'55_1  H x W 
 
मात्र त्यामुळे रायगड जिल्हा देखील प्रभावित झाला आहे. पैकी कर्जत तालुक्यात रविवारपासून वारे वाहायला सुरवात झाली होती. तर सोमवारच्या पहाटेपासून पावसाला सुरवात झाली. जोराच्या वाऱ्यांमुळे तालुक्यात अंबेरपाडा येथील घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर यात ग्रामपंचायत कार्यलयाचेही छत उडून गेले आहे. गावातील स्मशानभूमीचे सुद्धा मोडली आहे. तर फराटपाडा येथील केळीच्या बागेचे नुकसान झाले आहे. त्यासह तालुक्यातील काही भागात विद्युत पोल वेगाच्या वारे वाहत असल्याने वाकले आहेत. त्यामध्ये एचटी उच्चदाब वाहिनी असलेले एकूण 9 पोल व एलटी लाईनचे 28 पोलचे नुकसान झाले आहे. तेव्हा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे अधिकारी प्रकाश देवके व कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. तर तालुक्यात या वादळामुळे 233 घरांचे अंशत: नुकसान झाले असून, 48 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.
 
तसेच पावसाचे सरासरी प्रमाण 7.80 मि.मी. इतके असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या नुकसानीचा पंचनामा महसूल विभागाकडून सुरू करण्यात आला आहे. दरम्यान तालुक्यात वादळामुळे कोणतीही घटना घडू नये यासाठी महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, आपत्ती विभाग, आदी सज्ज होते. तसेच तालुक्यातील परिस्थितीचा वेळोवेळी आढावा जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडून घेतला जात होता.