रेमडेसिवीरचा काळाबाजार होणार नाही याची खबरदारी घ्या

जनदूत टिम    07-Apr-2021
Total Views |

  • नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
  • रुग्णवाढीचा दर पाच टक्क्यांपेक्षा कमी करण्यासाठी प्रयत्न करा
  • गृह विलगीकरणातील रुग्णांवर विशेष लक्ष द्या

मुंबई : कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच रेमडेसिवीरची मागणीही वाढत आहे. त्यामुळे कृत्रिम तुटवडा निर्माण होऊन या औषधाचा काळाबाजार होणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. तसेच, कोरोना रुग्णवाढीचा दर ५ टक्क्यांपेक्षा कमी राहील यासाठी सर्व आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, गृह विलगीकरणात असलेले रुग्ण घरातच राहावेत याची काळजी घ्यावी आणि त्यासाठी आवश्यकता भासल्यास संबंधित सोसायटीचे अध्यक्ष व सचिव यांना विशेष पोलिस अधिकारी म्हणून तात्पुरते अधिकार द्यावेत, असे निर्देशही त्यांनी दिले.
 
eknath shinde0156_1 
कोकण, पुणे आणि नागपूर विभागातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिकांचे आयुक्त, तसेच नगर परिषदा आणि नगर पंचायतींचे मुख्याधिकारी यांची कोरोनाविषयक आढावा बैठक मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली. यावेळी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक उपस्थित होते.
 
नगरविकास मंत्री शिंदे म्हणाले, कोरोना रुग्णांची संख्या जास्त प्रमाणात वाढू नये यासाठी काळजी घेण्याची गरज आहे. गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांच्या हातावर शिक्का मारणे, त्यांच्या घरावर स्टीकर लावणे, परिसरात बॅनर लावणे, कंटेन्मेंट झोनमध्ये बाहेरील व्यक्ती जाणार नाही याची काळजी घेणे, रुग्णांशी नियमितपणे संपर्क साधून माहिती घेण्यासाठी कॉलसेंटर कार्यान्वित करणे आदी उपाययोजना आखण्याचे निर्देश त्यांनी दिले. मृत्युदर कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, सहव्याधी असलेल्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष
तयार करावेत.