वीज ग्राहकांच्या तक्रारी सोडविण्याला प्राधान्य द्या - मंत्री डॉ. नितीन राऊत

07 Apr 2021 13:05:52
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ग्राहकांनी स्वतः मीटर रिडींग पाठवुन व देयके भरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन ऊर्जामंत्री डॉ. नितिन राऊत यांनी केले आहे. मंत्रालय येथे वीज बिल व थकबाकी यासंदर्भात पार पडलेल्या बैठकीत डॉ. राऊत यांनी वीज ग्राहकांच्या तक्रारी तात्काळ सोडविण्यासाठी ग्राहक तक्रार निवारण यंत्रणेला संवेदनशील करण्याचे महावितरण व्यवस्थापनाला निर्देश दिले.
 
nitin_1  H x W:
 
ग्राहकांना ऑनलाईन व मोबाईल अॅपद्वारे तक्रार करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरीपण जे ग्राहक याचा वापर करू शकत नाही त्यांच्यासाठी स्थानिक कार्यालयात ऑफलाईन तक्रारी नोंद करून घेण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. कोरोना काळात रिडींग न घेता बिले पाठविल्याच्या ग्राहकांनी तक्रारी केल्या आहेत. म्हणुन शक्यतो मीटर रिडींग घेऊन वीज बिले पाठविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे.
 
कोरोनामुळे काही वेळा महावितरणला रिडींग घेणे शक्य होत नसल्याने ग्राहकांनी जर मोबाईल अॅपद्वारे रिडींग पाठविले तर त्यांना रीडिंगनुसार बिल उपलब्ध करून देता येईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. राज्यात विजेचे दर कमी करण्याठी कसोशीने प्रयत्न करण्यात येत असून वीज खरेदी कराराचे पुनरावलोकन करण्यात येणार आहे. वीज खरेदीसाठी पॉवर एक्सचेंजमधून दररोज साधारणतः ११०० ते १८०० मेगावॅट वीज विकत घेण्यात येते. पॉवर एक्सचेंजसोबत दरासंबंधी वेळोवेळी वाटाघाटी करून स्वस्त वीज घेण्याचा प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
 
ग्राहकांची सेवा हेच महावितरणचे ब्रीद असून ग्राहक महावितरणचे दैवत आहे. कोरोना काळात महावितरणचे कर्मचारी हे ग्राहकांना अव्याहत सेवा देत आहेत. थकबाकी वसुलीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याच्या दुर्दैवी घटना घडत असून त्या खपवून घेतल्या जाणार नाही. महावितरण व प्रशासन हे कर्मचाऱ्यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या बैठकीत ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0