बहुउपयोगी मुहाचे झाड आदिवासींसाठी ठरतेय वरदान

पारस सहाणे    30-Apr-2021
Total Views |

  • अर्थिक उत्पादनाचे साधन

जव्हार : जंगलातील अनेक वनऔषधी झाडांपासुन तसेच अन्य झाडांपासून मिळणाऱ्या फुले, फळे विकुन येथील आदिवासींना अर्थजनासाठी चांगले पैसे मिळत आहेत. या वन झाडांमध्ये मुहाच्या झाड्यापासुन मिळणाऱ्या फुले, फळे, बी, पान, साल, खोड या सर्वांमध्ये औषधी गुणधर्म असल्याने हे जंगली झाड आदिवासींसाठी वरदान ठरले आहे.
 
muha225_1  H x
 
फाल्गुन महिन्यात पानगळती झाल्यानंतर मुहाच्या झाडाला येणारी फुले (मुहा) सद्या येथील आदिवासींना अर्थिक उत्पन्न देणारी बाब ठरली आहे. मुहाच्या फुलात साखर व अल्कोहोलचे प्रमाण असल्याने या फुलांवर विशिष्ट प्रक्रिया करुन मद्य बनविले जाते. यामध्ये ‘बी’ जिवनसत्व असल्याने पोटदुखी सारख्या आजारात काही आदिवासी या मोहाच्या मद्याचा औषध म्हणून उपयोग करतात.
 
झाडावरच परिपक्व झालेल्या मुहांच्या फुलांचा सडा सकाळीच सुर्योदय होण्यापुर्वी झाडाखाली पडलेला असतो. जंगला शेजारी असलेले आदिवासी बांधव ही फुले सुकवून बाजारात विक्रीसाठी नेतात. शंभर ते सव्वाशे रुपये प्रतिकोलो या फुलांना दर मिळत असल्याने आदिवासींसाठी एक चांगले उत्पन्नाचे साधन बनले आहे. काही आदिवासी बांधवांकडून मुहाच्या फुलांपासून चांगल्या प्रकारे मद्य बनवून त्याची विक्री केली जाते. मात्र शासनाने या मद्य विक्रीला अजुनही मान्यता न दिल्याने या फुलांची बाजारात विक्री करनेच पसंत करतात.
 
muha_1  H x W:
 
मुहाच्या फळाची रुचकर अशी भाजी बनवली जाते. ही भाजीही आरोग्यासाठी चांगली असल्याने उच्चभ्रू समाजातही ती आवडीने खाल्ली जाते. अनेक आदिवासी बांधव मुहाची फळे (दोडे) बाजारपेठांमध्ये विक्री करताना दिसत आहेत.
बरेचसे आदिवासी बांधव मुहाची फळे झाडावरच परिपक्व होईपर्यंत ठेवतात. व या पिकलेल्या फळातून मिळणाऱ्या ‘बी’ पासुन बैलघाण्यातून अथवा इतर तेल गिरणीतून चांगल्या प्रकारे तेल काढले जाते. या तेलाचा उपयोग स्वयंपाकात करतात. बियांपासून तेल काढल्यावर बियांची निघणाऱ्या पेंढचा उपयोग खतासाठी केला जातो.
 
मुहू झाडाच्या खोडाला येणाऱ्या सालीपासुन रंग बनवला जातो, मुहाच्या खोडातून निघणाऱ्या पांढ-या चिकाचा उपयोग संधीवातावर उपचारासाठी केला जात असल्याचे येथील आदिवासी बांधवांनी सांगितले.
मुहाची पाने शेळी, मेंढी या पाळीव प्राण्यांसाठी उत्तम खाद्य आहे. आदिवासी या पानांपासून द्रोण, पत्रावळी तयार करतात. लग्न व सणांच्या दिवसात या पत्रावळींना चांगली मागणी असते.
 
डेरेदार असलेले मुहाचे झाड 40 ते 50 फुट उंच असते, या झाडाचे आयुर्मान 80 ते 85 वर्षांपर्यंत आहे. फळझाडे तोडण्यास मनाई असतानाही ठिक ठिकाणी जंगलातील फळझाडे सर्रास तोडून नेलेली दिसून येत आहेत.
अलिकडेच वनविकास महामंडळकडुन पालघर जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या वृक्ष तोडीमध्ये हजारो फळझाडे तोडली गेल्याचा आरोप येथील स्थानिक आदिवासींनी केला आहे.
 
जंगलातील मुहू, जांभूळ, हिरडा, बेहेडा, आवळा, बेल, पळस अशा अनेक झाडांच्या फुला, फळांमध्ये औषधी गुणधर्म आहेत. मात्र सद्या होत असलेली चोरटी तोड व जंगलांना लागणा-या वणव्यात ही औषधी झाडे नामशेष होत आहेत. या झाडांचे प्रमाण कमी होऊ लागल्याने येथील आदिवासींच्या हक्काच्या उत्पन्नावर गदा आली आहे.
 
मुहु या झाडाच्या फुलांवर प्रक्रिया केल्यास एक चांगल्या प्रकारे मद्य तयार होते. शासनाने याबाबत गांभीर्याने विचार केल्यास येथील आदिवासींना एक चांगले उत्पन्नाचे साधन मिळेल असे न्याहाळे येथील संतोष बुधर या तरुणाने सांगितले. वनविकास महामंडळाकडून जंगलातील तोडल्या जाणा-या अन्य जंगली झाडांमध्ये फळझाडेही तोडली गेली आहेत असे वाडा पंचायत समितीचे माजी सभापती अरुण गोंड यांनी सांगितले.