नदीम श्रवण जोडीतील प्रतिभावंत संगीतकार श्रवण काळाच्या पडद्याआड

जनदूत टिम    26-Apr-2021
Total Views |
९० च्या दशकात आपल्या सुमधुर संगीताने रसिकांच्या मनावर भुरळ घालणाऱ्या नदीम श्रवण जोडीतील प्रतिभावंत संगीतकार श्रवण राठोड यांचे कोरोनाने नुकतेच निधन झाले. श्रवण यांची पत्नी आणि मुलगा कुंभमेळ्यात जाऊन आले होते तिथेच त्यांना कोरोनाची लागण झाली होती त्यांच्यामार्फतच श्रवण यांना कोरोनाची लागण झाली.
 
shravankumbhmela-16192320
 
श्रवण यांना मूत्रपिंडाचाही आजार होता त्यामुळे ते वाचू शकले नाही. नदीम श्रवण या संगीतकार जोडीने ९० चे दशक अक्षरशः गाजवले. या दशकात आपल्या सुमधुर संगीताने त्यांनी रसिकांवर भुरळ घातली होती. आज चाळीशीत असणाऱ्या बहुतेकांचे ते आवडते संगीतकार आहेत. त्यांनी संगीत दिलेले सर्वच चित्रपट यशस्वी झाले. नदीम श्रवण जोडीने १९७९ साली दंगल या भोजपुरी चित्रपटासाठी पहिल्यांदा संगीत दिले पण त्यांना खरी ओळख मिळवून दिली ती आशिकी या चित्रपटाने. आशिकी चित्रपटातील गाण्यांनी त्यावेळेचे सर्व रेकॉर्ड तोडले होते. आशिकी हा चित्रपट केवळ गाण्यांमुळे सुपरहिट झाला होता.
 
या चित्रपटातील सुमधूर गाणी आजही लोकप्रिय आहे. आशिकी नंतर त्यांनी संगीत दिलेले सर्व चित्रपट हिट झाले. साजन, सडक, दिल है की मानता नहीं, साथी, दिवाना, फुल और काटे, राजा हिंदुस्तानी, रंग, राजा, जान तेरे नाम, धडकन, परदेस, दिलवाले, राज, हम है राही प्यार के, अग्नीसाक्षी, जित असे त्यांनी संगीत दिलेले सर्वच चित्रपट सुपरहिट झाले. या चित्रपटातील सर्वच गाणी लोकप्रिय झाली. आजही या चित्रपटातील गाणी तितकीच लोकप्रिय आहेत. नव्वदच्या दशकात ते संगीतातील अनभिषिक्त सम्राट होते. नदीम श्रवण यांनी संगीत देणे म्हणजे गाणी कमालीची हिट होणार हे ठरलेलेच होते.
 
यशाचे दुसरे नाव म्हणजे नदीम श्रवण यांचे संगीत ही व्याख्याच त्यावेळी तयार झाली होती. संगीत आणि त्या आगळ्या वेगळ्या चालींमध्ये श्रवण जीव ओतत असे. संगीत हा त्यांचा प्राण आणि आत्मा होता. गाण्यामध्ये पूर्णपणे समर्पित चाली रचणे ही त्यांची खासियत होती. अनुराधा पौडवाल, साधना सरगम, अलका याज्ञीक, कविता कृष्णमूर्ती, पूर्णिमा, जसप्रीत नरुला, सपना मुखर्जी, एस पी बाळकृष्ण, हरिहरण, सुरेश वाडकर, पंकज उदास, मोहम्मद अझीझ, शैलेंद्र सिंग, शब्बीर कुमार, रुपकुमार राठोड, कुमार शानु, उदित नारायण, अभिजित, सोनू निगम अशा सर्व नामांकीत गायकांनी त्यांच्या चित्रपटांमध्ये गाणी म्हटली. त्या दहा वर्षात नदीम श्रवण हा ब्रँड होता.
 
नदीम श्रवण म्हणजे यश असे समीकरणच त्यावेळी बनले होते. नदीम श्रवण जोडगोळीचा हा स्वप्नवत प्रवास सुरु असतानाच संगीत व्यवसायातील दिगग्ज आणि टी सिरीज कॅसेटचे मालक गुलशन कुमार यांची अंधेरी येथे १२ ऑगस्ट १९९७ रोजी हत्या झाली. ही हत्या नदीम यांनी केल्याचा आरोप झाल्यावर नदीम यांनी लंडनला पलायन केले तेंव्हापासून ही संगीतकार जोडगोळी तुटली आणि या जोडगोळीच्या सुमधुर संगीताला रसिक मुकले. आज श्रवण यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील एक तारा काळाच्या पडद्याआड गेला. श्रवण यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीतील सुमधुर संगीताचे एक यशस्वी पर्व संपले. संगीतकार श्रवण यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
-