रेल्वेच्या विलगिकरण कक्षाचा वापर करावा

- श्याम बसप्पा ठाणेदार, दौंड जिल्हा पुणे    19-Apr-2021
Total Views |
राज्यात कोरोनाचा प्रकोप वाढतच चालला आहे. दररोज साठ हजार लोकांना कोरोनाची बाधा होत आहे. अशा परिस्थितीत राज्यातील आरोग्यव्यवस्था देखील अपुरी पडत आहे. वाढत्या रुग्णसंख्येपुढे प्रशासन हतबल ठरत आहे. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने रुग्णालयात बेडची संख्या अपुरी पडू लागली आहे.
 
-indian_railways_1 &
 
अनेक रुग्णांना बेड मिळत नसल्याने रुग्णालयाच्या आवारातच रुग्णांना खुर्चीवर बसवून उपचार केले जात आहेत काही ठिकाणी एकाच बेडवर दोन तीन रुग्णांना ठेवले जात आहे काही रुग्णांवर जमिनीवर गादी टाकून उपचार केले जात आहे इतके करुनही रुग्णालयात जागा नसल्याने सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना घरीच विलगिकरणात ठेवून त्यांच्यावर टेली मेडिसिनद्वारे उपचार केले जात आहे. घरीच उपचार घेणारे हे कोरोना बाधित रुग्ण सुपर स्प्रेडर ठरत आहे. एकीकडे अशी बिकट अवस्था असताना दुसरीकडे रेल्वेचे हजारो विलगिकरण कोच धूळ खात पडले आहेत. मुंबईतच असे २५०० विलगिकरण कोच धूळ खात पडले आहेत.
 
मागील वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान रेल्वे मंत्रालयाने रेल्वे गाड्यांमध्ये हजारो विलगिकरण कक्ष तयार केले होते जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत त्यांचा वापर करता येईल. रेल्वे कोचचे विलगिकरण कक्षात रूपांतर करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने करोडो रुपये खर्च केले. सध्या मध्य रेल्वेच्या सर्व विभागांमध्ये १० टक्के म्हणजे ४८ विलगिकरण कक्ष तयार आहेत. यामध्ये प्रत्येक डब्यात १६ बेड उपलब्ध आहेत ; तर पश्चिम लोहमार्गावरील १०७ विलगिकरण कक्षांमधील १ हजार ७१२ बेड म्हणजेच एकूण २ हजार ४८० बेड पडून आहेत. आता या रेल्वेच्या विलगिकरण कक्षाचा वापर करण्याची वेळ आली आहे.
 
सरकारने आतातरी या रेल्वेच्या विलगिकरण कक्षाचा वापर करावा. ज्या रुग्णांना रुग्णालयात बेड उपलब्ध होत नाही त्या रुग्णांना रेल्वेच्या या विलगिकरण कक्षात दाखल करून त्यांच्यावर उपचार केले तर ते लवकर बरे होतील तसेच आरोग्य व्यवस्थेवर पडणारा ताणही कमी होईल. रेल्वेच्या या विलगिकरण कक्षात गंभीर आजारी रुग्णांवर जरी उपचार करता आले नाही तरी कोरोनाचे सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर येथे उपचार करता येऊ शकेल त्यामुळे सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना या विलगिकरण कक्षात दाखल केले तर या रुग्णांवर घरीच उपचार करावे लागणार नाही. सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना जर या विलगिकरण कक्षात दाखल केले तर त्यांच्यापासून इतरांना होणारा धोकाही कमी होईल.