साकेत गोखले यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार

जनदूत टिम    19-Apr-2021
Total Views |
मुंबई : रेमडिसिवर इंजेक्शन बाबत खोटी माहिती प्रसारीत केल्याबद्दल साकेत गोखले यांच्या विरोधात भाजपा उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष संजय पांडे यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. खोटी माहिती प्रसारीत करून जनतेच्या मनात घबराट निर्माण केल्याबद्दल गोखले यांच्याविरोधात भारतीय दंड विधान कलम ५०५(१), माहिती, तंत्रज्ञान कायदा २००० आणि आपत्ती निवारण कायदा २००५ अन्वये गुन्हा दाखल करावा अशी मागणी पांडे यांनी आपल्या तक्रारीत केली आहे.
 
Saket_Gokhale_1 &nbs
 
पांडे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, गोखले यांनी १७ एप्रिल २०२१ रोजी अनेक ट्विट करत मुंबई पोलिसांनी ४.७५ कोटी किमतीच्या रेमडिसिवर चा साठा जप्त केला असून भारतीय जनता पार्टीने हा साठा केला असल्याचा आरोप केला होता. देवेंद्र फडणवीस हे केंद्र सरकारच्या साथीने रेमडिसिवर चा अवैध साठा करीत असून भाजपा कार्यालयात हा साठा करण्यात आल्याचे ट्विटही गोखले यांनी केले होते.
 
गोखले यांनी ट्विट मध्ये नमूद केलेली माहिती धादांत खोटी असून जनतेच्या मनात घबराट निर्माण करणारी आहे. त्यामुळेच गोखले यांच्या विरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पांडे यांनी आपल्या तक्रारीत केली आहे. गोखले यांनी केलेले ट्विट तक्रारी सोबत जोडण्यात आले आहेत.