ग्रंथव्यवहार हाही जीवनावश्यक मानायला हवा!’

- प्रवीण दवणे    19-Apr-2021
Total Views |
जीवनावश्यक सुविधांमध्ये ग्रंथवितरण व पुस्तकांची दुकाने निदान आठवड्यातून चार दिवस, सकाळी११ ते ५ या वेळेत सुरू ठेवण्याचा पर्याय ठेवता येईल का? दोन वर्षे सारा ग्रंथव्यवहार,ठप्प झाला आहे. महाराष्ट्रभरातील प्रकाशकांची , वितरकांची, प्रसंगी कर्ज काढून केलेली गुंतवणूक मातीमोल व्हायच्या स्थितीत आहे. असंख्य छोटे पुस्तक विक्रेते, न विकल्या गेलेल्या पुस्तकांकडे बघून पोट कसे भरणार? त्यांच्याकडे नोकरीला असलेल्या ग्रंथ विक्रेत्यांना त्यांचे पगार देणार कसे? नि मुळातल्या तुटपुंज्या वेतनालाही मुकलेल्या त्यांच्या चिलापिलांचे पोट तरी कसे भरणार?
 
book_1  H x W:
 
त्याच बरोबर आणखी एक- अनेक वाचकांसाठी पुस्तके ही प्राणवायूप्रमाणे असतात. सर्वच वाचक काही ‘ऑन लाईन’ खरेदी करण्यात तरबेज नसतात. अनेकदा ग्रंथ दालनात एक पुस्तक घ्यायला जाताना ,नवीन पुस्तकांबरोबर , काही आधीची पुस्तकेही पाहिली जातात ,अभ्यासकांना संदर्भ पुस्तके घेता येतात नि यथायोग्य ग्रंथ खरेदी होते. हे क्षण सुद्धा आजच्या स्थितीत जीवनेच्छा प्रबळ करणारे ठरू शकतात.
 
बरं, ग्रंथविक्री व्यवहार हा काही, दुकानात एकदम लोंढा शिरला, ललित -वैचारिक पुस्तके घ्यायला रांगा लागल्यात, पोलिस बोलवावे लागलेत ,इतका भाग्यवंत कधीच नव्हता. दोन-तीन ,दोन -तीन वाचकग्राहक येतात ,नि बिचारे शांतपणे जातात. समजा अगदी धक्कादायक अनुभव आला, नि आलेच एकदम ६-७ ग्रंथग्राहक ; तर त्यांना “योग्य अंतरावर उभे रहा, आतले ग्राहक बाहेर गेल्यावर आत या” असे सांगता येईल. पण,दोन वर्षे अगदी कंबरडे मोडून ठप्प व दुकानबंद झालेला हा ग्रंथ विक्री व प्रकाशन व्यवहार थोडा हलेल व नियम पाळून खरेदी करणाऱ्या वाचकांना थोडा विरंगुळा तर मिळेल. (त्याच बरोबर शासकीय व निमशासकीय ग्रंथालये पुस्तक देवाण घेवाणीसाठी ,आरोग्य नियम पाळून सुरू करणे शक्य आहे. त्यांतील करारी वेतनावावर काम करणाऱ्या गरजू सेवकांचा अलक्षित प्रश्न आहेच) आपल्याकडे झुंड करू न शकणाऱ्या, संयमी गरजवंताकडे नेहमीच दुर्लक्ष करणे शास्त्यांना सोयीचे पडते. अगदी अन्न , पाणी, प्राणवायू इतकी टोकाची निकड नसेल, पण मनाला उभारी व ऊर्जा देण्यात पुस्तके ही मनाचा आधार व सोबत देणारे जिवलग ठरतात. आजच्या दडपणाच्या मन एकाकी करणाऱ्या वातावरणात पुस्तक वाचणे, विकत घेणे हाही आश्वासक झरोका ठरू शकेल.
 
“सर्वांनी घरातच बसा! घरातच बसा!” हे वारंवार सांगितले जाते; ते योग्यच! पण घरात बसून करायचे काय? हे सांगणार कोण? पडद्यावरचे व facebook, whatsapp वरील सपक मनोरंजनाने अनेक घरे हतबल झाली आहेत. वृत्तवाहिन्यांवरील अटळ अशा दडपण वाढवणाऱ्या बातम्या सतत पाहून पाहून व सर्वपक्षीय नेत्यांचे आरोप प्रत्यारोप, धडकी भरवणारी त्यांची ह्याही काळातील आक्रमकता पाहून जनतेची प्रतिकारक्षमता विकल होत नसेल का? पुढचे असंख्य प्रश्न असंतुलित मनांचे असणार आहेत. त्याकडेही जाणिवेने पहायला हवे आहे.
 
योग्य ते अंतर व सुरक्षा नियम पाळून अधिकृत फिरत्या ग्रंथ विक्रेत्यांना ,दूरध्वनीद्वारे बोलावून थेट पुस्तके घरोघरी देता येतील का? काही उपाय कदाचित आजच्या व्याधीप्रलय क्षणी अति वाटू शकतील ,पण योग्य त्या दिशेने विचार तर होऊ शकेल.
आत्ताच्या अगदी कडेलोट निर्बंधकाळात उद्याच पुस्तकदुकाने उघडावीत, प्रकाशन व्यवहार सुरू करावा असा अर्थ यातून न काढता थोडा सैलावा आला की प्राधान्य ग्रंथ व्यवहारात गुंतलेल्या व त्यावर जीविका असलेल्या मुद्रक, , बाईंडर,कागद विक्रेते, मुद्रणशोधक, चित्रकार, वितरक, श्रमजीवी सहाय्यक यांच्या प्रखरपणे न पोहोचणाऱ्या हाकेकडेही सहानुभूतीने पहावे. त्यांचे बुडते संसार वाचवावेत. त्यांचीही उमेद तेवती ठेवावी. मुळात देहात प्राण असणे व त्या साठी औषधोपचार ,अन्न,पाणी, निवारा हे अग्रक्रम आहेत, पण त्यानंतर प्रथम प्राधान्य शासनाने प्रस्तुत विनंतीला द्यावे.” ग्रंथोपजीविये, विशेषी लोकी इयें “ असे पसायदान मागणाऱ्या सुसंस्कृत नेतृत्वाने ही विनंती निदान योग्य कालावधीनंतर तरी अलक्षित करू नये ही एक वाचक व लेखक म्हणून विनंती आहे. या भूमिकेतील विचारांवर चर्चा होऊ शकेल. अधिक सुयोग्य उपाय मिळू शकतील ही आशा आहे. अनेक वाचक, साहित्यिक सोबत येतील असे वाटते.