तब्बल ६० वर्षानंतर परटोलीकरांना मिळाली स्मशानभूमी

जनदूत टिम    17-Apr-2021
Total Views |

  • परटोली स्मशानभूमीसाठी ग्रामपंचायत जनसुविधा विशेष अनुदानातून १० लक्ष रुपये मंजूर

ठाणे : किन्हवली परिसरातली महत्वाची समजली जाणारी ग्रुप ग्रामपंचायत मुगाव - परटोली १९६१ मध्ये अस्तित्वात आली ६० वर्षे पूर्ण झालेल्या ग्रामपंचायतीत येणाऱ्या ५४६ लोकसंख्या असलेल्या परटोली गावाला स्मशानभूमीच नसल्याने गावात दुर्दैवी मृत्य झाल्यास ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते.
 
smashan_1  H x
                                                                                                              FIle Photo 
 
स्मशानभूमी नसल्याने नदिकिनारी एखाद्या खडकावर अंत्यविधी उरकावा लागत असल्याने पावसाळ्यात मृतदेह पूर्णपणे न जळाल्याने अनेकदा विटंबना होत होती. जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र विशे साहेबांच्या प्रयत्नाने दोन वर्षांपूर्वी परटोलीच्या स्मशानभूमीसाठी निधी मंजूर केला होता परंतु जागेअभावी हा निधी परत गेल्याने परटोलीकरांना वर्षानुवर्षे उघड्यावरच अंत्यसंस्कार करावे लागत होते.
 
या सर्व गोष्टींच गांभीर्य लक्षात घेऊन परटोली गावातील स्मशानभूमीचा प्रश्न पुन्हा मार्गी लागावा म्हणून सामाजिक कार्यकर्ते कु.गणेश धोंडू चौधरी व सामाजिक कार्यकर्ते पंढरीनाथ धर्मा ढमके यांनी पुढाकार घेत ग्रामपंचायतिला लेखी निवेदनाच्या माध्यमातून स्मशानभूमीची मागणी केली होती. सदर प्रश्नाची गंभीर दखल घेऊन अनेक पत्रकार बांधवांनी बातम्याही प्रसिद्ध केल्या होत्या.
 
अखेर गणेश चौधरी व पंढरीनाथ ढमके यांनी पुढाकार घेत स्मशानभूमीच्या जागेसाठी तोडगा काढत मलेगाव गटाचे कार्यसम्राट जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र विशे साहेब यांच्या अथक प्रयत्नाने ग्रामपंचायत जनसुविध विशेष अनुदानातून सन ( २०२० - २०२१ ) निधीतून १० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून दिला आहे. त्यामुळे परटोलीतील ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून राजेंद्र विशे साहेब, गणेश चौधरी, पंढरीनाथ ढमके व ग्रुप ग्रामपंचायत मुगाव परटोली यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.