लॉकडाऊनमुळे दगडातून देव साकारणाऱ्या समाजावर वरवंटा

जनदूत टिम    15-Apr-2021
Total Views |

  • जाते, पाटा, खलबत्ता विक्री करणाऱ्यांनाही फटका : आधुनिकतेमुळे पारंपरिक व्यवसायांना घरघर

मुरबाड : कोरोनाचा वाढता कहर रोखण्यासाठी लॉकडाऊन गरजेचे असले तरी हा लॉकडाऊन अनेकांच्या जीवावर उठला आहे. लॉकडाऊनने अनेकांचे जगणे मुश्कील करून टाकले आहे. ज्यांचे हातावर पोट आहे, असे छोटेमोठे कारागीर, फेरीवाले, शेतकरी रस्त्यावर बसून भाज्या, फळे विकणारे यांचे हाल बेहाल झाले आहेत. जाते, पाटा, खलबत्ता, वरवंटा हा पारंपरिक व्यवसाय करणारा वडार समाजही कोरोना व लॉकडाऊनमुळे पुरता जात्यात आला आहे.
 
dagad0256_1  H
 
मिक्सर, ग्राइंडरच्या या जमान्यात आधीच हा व्यवसाय अडचणीत आला आहे. जुन्या काळी वाटणासाठी सर्रास वापरले जाणारे जाते, पाटा, खलबत्ता आदी पारंपरिक साधनांना घरघर लागली. घरोघरी गृहिणींच्या साथीला मिक्सर, ग्राइंडर आले. त्यामुळे वाटणाचे काम हलके व सोपे झाले असले तरी जात्यावर, खलबत्त्यावर काम करताना होणारी शारीरिक हालचाल व कष्ट कमी झाले. आधीच घरघर लागलेल्या जात्यांना आता लॉकडाऊनमुळे पुरता ब्रेक लागतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. पण काही असो कोरोनाचा कहर आहे.
 
परिस्थिती हाताबाहेर जाण्याच्या अवस्थेत असले तरी गावगाड्यात महत्वाचे घटक असणारे हे बारा बलुतेदार, गाव खेड्यातले या कारागिरांना लॉकडाऊनने त्यांचे जगणे मुश्कील करून टाकले आहे. या कोरोनाव लॉकडाऊनने अक्षरशः देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे. आधीच जात्यात असणाऱ्या व घरघर लागलेल्या या व्यवसायावर कोरोना व लॉकडाऊनने पुरता वरवंटा फिरवला आहे.
८०० रुपयांना जाते, पाट्याची विक्री
जाते, पाटा, वरवंटा, खलबत्ता हे तयार करण्यासाठी विशिष्ट पद्धतीने ठिसूळ नसणारा कठीण काळे दगड आणावे लागतात. याच्या खाणी मोठ्या कौशल्याने व बारकाईने हेरावे लागतात. साधारण दहा हजार रुपये प्रति ट्रॅक्टर ट्रॉली या दराने हे दगड खरेदी करावी लागतात. दिवसाला साधारण एक कारागीर दोन किंवा तीन पाटा किंवा खलबत्ता तयार करू शकतो. साधारण ७०० ते ८०० रुपयांना मोठ्या आकाराचे जाते विकले जाते. पाटा पण जवळपास त्याच किमतीत विकला जातो. खलबत्ता त्याच्या आकारानुसार तीनशे ते चारशे एवढ्या किमतीत विकला जातो.
 
आम्ही मूळचे चाळीसगावचे. जवळपास चार-पाच महिने झाले मुरबाडमध्ये व्यवसाय करतोय. मोठ्या अंगमेहनतीचे काम असताना त्याचे पुरेसे मोल मिळत नाही. आम्ही दिवसभर उन्हातान्हात छन्नी हातोड्यांनी ओबडधोबड दगडाला आकार देत असतो. दिवसाला एक व्यक्ती दोन वस्तू बनवू शकतो. मागील संपूर्ण वर्षभर आमचा व्यवसाय पूर्णपणे थांबला होता. दोन- चार महिने झाले पुन्हा नव्या दमाने व्यवसाय चालू करतो तोवर पुन्हा आमच्यावर कोरोना व लॉकडाऊनचे संकट कोसळले. धंदा पूर्णपणे बंद झाल्याने आता खायचे काय? हा प्रश्न उभा राहिला आहे.
- धोंडू धोत्रे, मुरबाड, कारागीर