विनोदाचा बादशहा चार्ली चॅप्लिन

- श्याम ठाणेदार, दौंड जिल्हा पुणे    15-Apr-2021
Total Views |
जगातला सर्वात लोकप्रिय अभिनेता, विनोदाचा बादशहा चार्ली चॅप्लिन याची जयंती आहे. पहिल्या महायुद्धाच्या अगोदाच्या काळात मुकपटात अभिनय करून आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीने प्रेक्षकांना मनमुराद हसावणाऱ्या चार्ली चॅप्लिन यांचा जन्म १६ एप्रिल १८८९ रोजी लंडन येथे झाला.
 
Charlie-Chaplin-5_1 
 
चार्ली चॅप्लिन यांनी आपल्या अभिनयाची सुरवात शालेय जीवनापासूनच केली. वयाच्या नवव्या वर्षी शाळेतल्या नृत्यपथकात त्यांची निवड झाली. या नृत्यपथकाद्वारे सादर होणाऱ्या कार्यक्रमात ते अभिनय आणि नृत्य करत. त्यांची आई मानसिक आजाराने त्रस्त असल्याने वयाच्या तेराव्या वर्षीच त्यांना शाळा सोडावी लागली. अर्थाजनासाठी ते लहान मोठे कामे करू लागले. घरची परिस्थिती हलाखीची असूनही त्यांनी आत्मविश्वास कमी होऊ दिला नाही. परिस्थितीने उलट त्यांना खंबीर बनवले. त्यावेळेच्या परिस्थितीबद्दल चार्ली चॅप्लिन आपल्या आत्मचरित्रात म्हणतात “मला त्या परिस्थितीचे चटके फार काळ सहन करावे लागले नाही कारण आम्ही त्या परिस्थितीतून सतत वाटचाल करत होतो आणि लहान असल्यामुळे हा त्रास मी सहज विसरून जायचो.” त्यांचा आत्मविश्वास कणखर होता छोटीमोठी कामे करूनही ते कधीही आपल्या ध्येयापासून ढळले नाहीत. मोठा अभिनेता होण्याचे ध्येय पूर्ण करण्यासाठी ते नाटक कंपन्यांना नित्यनियमाने संपर्क साधत. त्यांच्या मेहनतीला फळ मिळाले त्यांना अनेक नाटकात भूमिका मिळू लागल्या.
 
पुढे मोठया पडद्यावर देखील त्यांना संधी मिळत गेली. पडद्यावरील त्यांचे मस्तमौला आगळेवेगळे रूप प्रेक्षकांना खूप भावले. पडद्यावर त्यांची इन्ट्री झाली की प्रेक्षक खळखळून हसत. एक टाईट कोट, छोटी हॅट, मोठे शूज आणि चेहऱ्यावरील छोटीशी मिशी असं त्यांचं पडद्यावरील वेडगळ रूप प्रेक्षकांना खूप भावले. हे वेडगळ रूप प्रेक्षकांना इतकं आवडलं की पुढं हेच त्यांचं वेडगळ रूप त्यांची ओळख बनली. या व्यक्तिरेखेबद्दल ते आपल्या आत्मचरित्रात म्हणतात “ ज्या क्षणी मी तो पोशाख केला, मेकअप केला, त्याच क्षणी मी ती व्यक्तिरेखा अनुभवू लागलो. मी त्याला ओळ्खयचो आणि रंगमंचावर असेपर्यंत तो माझ्यात भिनलेला असायचा.” चार्ली चॅप्लिन यांनी आयुष्याचं सार पडद्यावर अनेक तऱ्हेने जगपुढे मांडले. खिल्ली उडवण्यासाठी दुःख हे कारण असतं. खिल्ली उडवणे म्हणजे प्रतिकार करणे निसर्गाच्या शक्तीपूढे स्वतःच्या हतबलतेतही आपण हसत राहिले पाहिजे.
 
प्रतिकुलतेचा हसत हसत सामना केला पाहिजे, नाहीतर मानसिकरीत्या खचून जाल असे ते म्हणत म्हणूनच त्यांच्या आयुष्याच्या जवळचा चित्रपट ‘ द कीड ‘ याचं ओपनिंग टायटल होतं” अ पिक्चर विथ अ स्माईल अँड परहॅप्स अ टियर.” स्वतःच दुःख विसरून आईचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी पडद्यावर वेडगळ भूमिका करुन जगभरातील प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. भाषेच्या बंधनाविना पडद्यावरून तो कुठल्याही प्रेक्षकांशी संवाद साधू शकला त्यासाठी त्यांनी वापरलेले साधन म्हणजे भरपूर हासू आणि थोडेसे आसू. चार्ली चॅप्लिन यांच्या अभिनयाचे वैशिष्ट्य म्हणजे ते प्रेक्षकांना गडबडा लोळायला लावून हसवत आणि दुसऱ्याच क्षणी डोळ्यात पाणी आणून रडवत. आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी अनेक युक्त्या करून त्या पडद्यावर साकारल्या आणि गाजवल्या. जागतिक पटलावर महानायक म्हणून ते आयुष्यभर वावरले.
 
पहिल्या महायुद्धाच्या काळातही त्यांनी लोकांना हसवण्याचे कार्य केले. २५ वर्षानंतर जागतिक मंदी आणि हिटलरच्या काळातही त्यांनी प्रेक्षकांना हसवण्याचे कार्य थांबवले नाही. लोकांना ज्याकाळात मनोरंजनाची आणि हास्याची अधिक गरज होती त्याकाळात चार्ली चॅप्लिन यांनी लोकांसाठी उत्तम भूमिका बजावल्या. २५ डिसेंबर १९७७ रोजी प्रेक्षकांना खळखळून हसवणारा हा महान अभिनेता पप्रेक्षकांना दुःख सागरात लोटून काळाच्या पडद्याआड गेला. चार्ली चॅप्लिन यांना जयंतीदिनी भावपूर्ण आदरांजली.